Friday, May 22, 2026

Virat Kohli : “मी मानसिकदृष्ट्या थकलो होतो”; विराट कोहलीने सांगितला इंपोस्टर सिंड्रोमचा संघर्ष

Virat Kohli : “मी मानसिकदृष्ट्या थकलो होतो”; विराट कोहलीने सांगितला इंपोस्टर सिंड्रोमचा संघर्ष

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याने नुकताच आपल्या करिअरबाबत भावनिक खुलासा केला. अनेक वर्षे मैदानावर यश मिळवूनही तो ‘इंपोस्टर सिंड्रोम’शी झुंज देत असल्याचं त्याने सांगितलं. कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळताना तो मानसिकदृष्ट्या पूर्णपणे थकून गेला होता. सततचा ताण, अपेक्षांचं ओझं आणि परफॉर्म करण्याचा दबाव यामुळे क्रिकेट खेळण्याचा आनंदच हरवला होता, असं कोहलीने स्पष्ट केलं. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊया इंपोस्टर सिंड्रोम म्हणजे नेमकं काय आणि त्याचा व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो.

इंपोस्टर सिंड्रोम म्हणजे काय?

इंपोस्टर सिंड्रोम ही कोणतीही मानसिक आजाराची अधिकृत श्रेणी नसून ती एक मानसिक अवस्था मानली जाते. या अवस्थेमध्ये व्यक्ती स्वतःच्या यशावर विश्वास ठेवू शकत नाही. कितीही मोठं यश मिळालं तरी “मी खरंच इतका सक्षम नाही”, “हे यश माझ्या मेहनतीमुळे नाही, तर नशिबामुळे मिळालं” अशी भावना सतत मनात निर्माण होत राहते. स्वतःला पात्र असूनही अपात्र समजणं, स्वतःच्या क्षमतांवर शंका घेणं आणि सतत स्वतःला कमी लेखणं ही या सिंड्रोमची मुख्य लक्षणं आहेत.

विशेष म्हणजे, हा अनुभव फक्त सामान्य लोकांनाच नाही तर जगातील अनेक प्रसिद्ध आणि यशस्वी व्यक्तींनाही आला आहे. अल्बर्ट आईनस्टाईन  (Albert Einstein) आणि (टॉम हँक्स ) Tom Hanks यांसारख्या दिग्गजांनीही स्वतःला कधी ना कधी ‘फ्रॉड’ असल्यासारखं वाटल्याचं मान्य केलं आहे.

इंपोस्टर सिंड्रोमची लक्षणं कोणती?

या मानसिक अवस्थेची काही ठळक लक्षणं दिसून येतात. एखादी व्यक्ती चांगलं काम करूनही त्याचं श्रेय घेण्यास टाळाटाळ करते. सतत अपयशाची भीती वाटते. स्वतःची तुलना इतरांशी केली जाते आणि “मी पुरेसा चांगला नाही” अशी भावना मनात निर्माण होते. प्रत्येक कामात परफेक्शन आणण्याच्या प्रयत्नात व्यक्ती स्वतःवर अति ताण घेते. आत्मविश्वास कमी होतो, स्वतःविषयी नकारात्मक विचार वाढतात आणि अनेकदा अति काम करून व्यक्ती मानसिक व शारीरिकदृष्ट्या थकून जाते. विशेष म्हणजे, मोठं यश मिळाल्यानंतरही अनेक लोक ते स्वीकारण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष करतात.

या अवस्थेतून बाहेर कसं पडावं?

तज्ज्ञांच्या मते, या मानसिक अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःशी सकारात्मक संवाद साधणं. स्वतःच्या मेहनतीची आणि यशाची दखल घेणं आवश्यक आहे. प्रत्येकवेळी परफेक्ट असणं शक्य नसतं, हे स्वीकारणं गरजेचं आहे. चुका होणं म्हणजे अपयश नव्हे, तर शिकण्याची संधी आहे, ही भावना मनात रुजवणं महत्त्वाचं ठरतं.

याशिवाय, इतरांशी सतत तुलना करण्याची सवय कमी करणंही गरजेचं आहे. विशेषतः सोशल मीडियावर दिसणारं परफेक्ट आयुष्य अनेकदा मानसिक दबाव वाढवतं. आवश्यक वाटल्यास समुपदेशन किंवा थेरेपीची मदत घेणंही फायदेशीर ठरू शकतं. स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवणं आणि यशाला नशिब नव्हे तर मेहनतीचं फळ मानणं, हीच या सिंड्रोममधून बाहेर पडण्याची पहिली पायरी मानली जाते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा