Thursday, May 21, 2026

Bengaluru Airport : बंगळूरु विमानतळावर मोठा अपघात टळला! लँडिंगवेळी एअर इंडियाच्या विमानाची धावपट्टीला धडक, १७९ प्रवासी थोडक्यात बचावले

Bengaluru Airport : बंगळूरु विमानतळावर मोठा अपघात टळला! लँडिंगवेळी एअर इंडियाच्या विमानाची धावपट्टीला धडक, १७९ प्रवासी थोडक्यात बचावले

बंगळुरू : दिल्लीहून बंगळूरुला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात लँडिंग करताना तांत्रिक बिघाड झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एअर इंडियाचे फ्लाइट AI2651 बंगळूरु विमानतळावर लँडिंग करत असताना विमानाच्या शेपटीचा भाग (Tail Section) धावपट्टीला घासल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर विमानतळावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, विमान सुरक्षितपणे उतरले असले तरी लँडिंगदरम्यान तांत्रिक अडचण निर्माण झाली. विमानाचा मागील भाग धावपट्टीला स्पर्श झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून विमान तातडीने जमिनीवरच थांबवण्यात आले. त्या वेळी विमानात प्रवासी आणि कर्मचाऱ्यांसह एकूण १७९ जण उपस्थित होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झाली नाही.

घटनेनंतर विमानातील सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. काही प्रवासी सुरुवातीला घाबरले होते, मात्र विमानतळ प्रशासन आणि एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली. विमानतळावरील आपत्कालीन यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आल्या होत्या.

एअर इंडियाने या घटनेनंतर संबंधित विमानाची सखोल तांत्रिक तपासणी सुरू केली आहे. एअरलाइनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, विमानाचे सर्व सुरक्षा निकष तपासल्यानंतरच ते पुन्हा सेवेत दाखल केले जाईल. “प्रवाशांची सुरक्षितता हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे,” असे एअर इंडियाने आपल्या निवेदनात स्पष्ट केले.

दरम्यान, या घटनेचा परिणाम पुढील उड्डाणांवरही झाला. बंगळूरुहून दिल्लीकडे जाणारे फ्लाइट AI2652 रद्द करण्यात आले. त्यामुळे अनेक प्रवाशांची गैरसोय झाली. विमान रद्द झाल्यानंतर एअर इंडियाने पर्यायी उड्डाणांची व्यवस्था करण्यास सुरुवात केली असून, काही प्रवाशांना हॉटेल आणि इतर आवश्यक सुविधा पुरवल्या जात आहेत.

बंगळूरु विमानतळावर एअर इंडियाचे ग्राउंड स्टाफ आणि तांत्रिक कर्मचारी मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले असून, प्रवाशांना मदत करण्याचे काम सुरू आहे. घटनेनंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) देखील या प्रकरणाची माहिती घेत असल्याचे समजते.

प्राथमिक माहितीनुसार, लँडिंगच्या वेळी हवामान, तांत्रिक बिघाड किंवा विमानाच्या कोनातील त्रुटीमुळे हा प्रकार घडला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, अधिकृत तपास अहवाल आल्यानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

या घटनेमुळे पुन्हा एकदा विमान सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला असून, प्रवाशांमध्येही काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, वैमानिकाच्या सतर्कतेमुळे आणि तातडीच्या निर्णयामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे बोलले जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >