Monday, August 10, 2026

Minister Rajnath Singh : ‘सिंदूर महारक्तदान यात्रा’ उत्साहात संपन्न; दिल्लीत ८०० शिवसैनिकांचे ‘महारक्तदान’; संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांकडून रक्तवीरांचा गौरव

Minister Rajnath Singh : ‘सिंदूर महारक्तदान यात्रा’ उत्साहात संपन्न; दिल्लीत ८०० शिवसैनिकांचे ‘महारक्तदान’; संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांकडून रक्तवीरांचा गौरव

- सैनिकांसाठी महाराष्ट्रातून १६ हजार जणांची नोंदणी

नवी दिल्ली : भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम आणि जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने नवी दिल्लीतील बेस हॉस्पिटल, दिल्ली कॅन्टोन्मेंट येथे ‘सिंदूर महारक्तदान यात्रा व शिबिरा’चे आयोजन करण्यात आले. क्रांतिदिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात शिवसैनिक, खेळाडू आणि मल्लांसह ८०० जणांनी रक्तदान केले.

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Minister Rajnath Singh) आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. ‘डबल महाराष्ट्र केसरी’ चंद्रहार पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या महारक्तदान शिबिरात शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही प्रत्यक्ष रक्तदान केले.

राजनाथ सिंहांकडून महाराष्ट्रातील रक्तदात्यांचे कौतुक : 

यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्रातून दिल्लीत येऊन जवानांसाठी रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचे आणि शिवसैनिकांचे कौतुक केले. ‘ऑपरेशन सिंदूर’ने जगासमोर भारतीय सैन्याचे अतुलनीय शौर्य आणि पराक्रम सिद्ध केला, तर ‘सिंदूर महारक्तदान यात्रा’ ही सेवाभाव, मानवी संवेदनशीलता आणि राष्ट्रप्रेमाचे प्रतीक आहे, असे सिंह यांनी नमूद केले. (Minister Rajnath Singh)

महाराष्ट्रातून शेकडो किलोमीटरचा प्रवास करून सैनिकांसाठी रक्तदान करण्यासाठी दिल्लीत येणे ही अत्यंत कौतुकास्पद बाब असल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतून आलेल्या रक्तदात्यांनी शौर्य आणि करुणेचा वारसा जपल्याचेही त्यांनी गौरवाने नमूद केले.

रक्तदान हेच खरे महादान असल्याचे सांगत, या शिबिरातून संकलित होणारे रक्त आपत्कालीन परिस्थितीत जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वासही राजनाथ सिंह (Minister Rajnath Singh) यांनी व्यक्त केला.

१६ हजार रक्तदात्यांची नोंदणी; मात्र ८०० जणांचे रक्तदान : 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसैनिक आणि रक्तदात्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाचे कौतुक केले. गेल्या वर्षी या उपक्रमासाठी महाराष्ट्रातून ९ हजार रक्तदात्यांनी नोंदणी केली होती, तर यंदा हा आकडा तब्बल १६ हजारांवर पोहोचला, अशी माहिती शिंदे यांनी दिली. रक्तदानासाठी मोठ्या संख्येने रक्तदाते उपस्थित होते. मात्र, लष्करी रुग्णालयाची उपलब्ध क्षमता आणि नियोजन लक्षात घेऊन प्रत्यक्षात ८०० जणांचेच रक्तदान करून घेण्यात आले, असे त्यांनी स्पष्ट केले.

‘रक्तवीर हेही खरे योद्धे’ :

सीमेवर बंदूक हातात घेऊन जागणाऱ्या जवानांमुळे देशातील नागरिक शांतपणे झोपू शकतात, असे सांगत एकनाथ शिंदे यांनी रक्तदात्यांचा गौरव केला. “सीमेवर लढत नसले, तरी रक्तदान करणारे हे रक्तवीरही खरे योद्धे आहेत,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले. सैनिकांच्या सन्मानासाठी रक्तदान करणे ही केवळ सामाजिक जबाबदारी नसून राष्ट्रसेवाच असल्याचेही शिंदे यांनी यावेळी सांगितले.

वरिष्ठ लष्करी अधिकारीही उपस्थित :

या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, राज्यसभा सदस्या डॉ. ज्योती वाघमारे यांच्यासह व्हाइस ॲडमिरल आरती सरीन, लेफ्टनंट जनरल रणजीत सिंग, लेफ्टनंट जनरल नीरज सेठी आणि लेफ्टनंट जनरल अविनाश दास यांच्यासह वरिष्ठ लष्करी अधिकारी उपस्थित होते. रक्तदान करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना लष्करी रुग्णालयाच्या वतीने प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ आणि ‘जय महाराष्ट्र’च्या जयघोषात ‘सिंदूर महारक्तदान यात्रा’चा उत्साहात समारोप झाला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >