Sunday, May 10, 2026

मथुरेतील कृष्णलीला व कंस वध

मथुरेतील कृष्णलीला व कंस वध

महाभारतातील मोतीकण; भालचंद्र ठोंबरे

कृष्णाकडून आपला मृत्यू होणार अशी देववाणी झाल्यानंतर कंसाने श्रीकृष्णाला ठार मारण्याचे अनेक प्रयत्न केले. मात्र ते सर्व निष्कळ झाल्यावर त्याने बाल श्रीकृष्ण व बलरामाला मथुरेत धनुष्य यज्ञ तसेच मथुरा पाहण्याच्या निमित्ताने बोलावून आपल्या पहिलवानाकडून कुस्तीच्या माध्यमातून ठार करण्याचे कारस्थान रचले व आपला एक नातलग अक्रूर याला श्रीकृष्ण बलरामांना आणण्यासाठी गोकुळात रवाना केले. अक्रूर हा कंसाचा नातलग असला तरी तो कृष्णभक्त होता व श्रीकृष्णांचा काका होता. कंस हा श्रीकृष्णाचा मामा होता. अक्रूर गोकुळात पोहोचताच त्याचे यथोचित स्वागत करण्यात आले. अक्रुराने राजांज्ञे प्रमाणे बलराम श्रीकृष्ण मथुरेला नेण्यासाठी आल्याचे सांगितले. दुसऱ्या दिवशी अक्रूर बलराम कृष्णांना रथात बसवून मथुरेच्या दिशेने निघाला. वाटेत मध्यान्यकाळी यमुना काठावर रथ थांबवून स्नान संध्या करण्यासाठी पाण्यात उतरला. तेव्हा त्याला पाण्यात बलराम व श्रीकृष्णाचे शंखचक्रधारी चतुर्भज रूप दिसले. बलराम कृष्ण रथात असतानाही येथे कसे वाटून त्याने पाण्याबरोबर उठून पाहिले असता श्रीकृष्ण बलराम रथात बसले होते. पुन्हा पाण्यात पाहता ते त्याला पाण्यात दिसले. भगवंताची ही लीला पाहून अक्रुराने त्यांची स्तुती केली. अक्रूर त्यांना घेऊन मथुरेत आला. बलराम कृष्णांनी त्याला आपणास मथुरा पाहावयाची असल्याने आपण नगरात फेरफटका मारून येतो असे सांगून रथातून उतरले. अक्रूर रथ घेऊन निघून गेला.

मथुरेत नगरात वाटेतून जाताना त्यांना कपडे घेऊन जाणारा एक धोबी दिसला. तो कंसाचे कपडे घेऊन जात होता. श्रीकृष्णांनी त्याला वस्त्रे मागितली. त्याने वस्त्रे देण्याऐवजी दुरुत्तरे दिली. हे पाहून श्रीकृष्णांनी त्याला हाताने मार दिला, असता तो गतप्राण झाला. त्याच्या वस्त्रामधून बलरामाने निळे व श्रीकृष्णाने पिवळे वस्त्र घेऊन ते एका शिंप्याकडून नीटनेटके करून घेतले. पुढे एक माळी भेटला. त्याच्याकडून फूल मागितले असता माळ्याने आदराने त्यांना हार-फुले अर्पण केली. त्यामुळे प्रसन्न होऊन बलराम व कृष्णाने माळ्याला आचंद्रसूर्य धनवान राहण्याचा आशीर्वाद दिला.

पुढे मार्गात त्यांना पाठीवर कुबडे असलेली एक वृद्ध स्त्री दिसली. तिचे नाव अनेकवक्रा असे होते. ती राजासाठी सौंदर्यप्रसाधने नेत होती. तिने कृष्ण बलरामांनाही त्यातील काही सौंदर्य साधने दिली. श्रीकृष्णांनी तिची हनवटी उजव्या हाताने वर उचलून एक हलकासा झटका दिला. त्याबरोबर तिची कुबडे नाहीशी होऊन तिचे रूपही पालटले व एका सुंदर रमणीमध्ये रूपांतर झाले.

फिरत फिरत राम-कृष्ण यज्ञ मंडपात आले. तेथे ठेवलेले धनुष्य उचलून त्याला प्रत्यंच्या चढवण्याचा प्रयत्न करताच ते प्रचंड आवाज करीत तुटले. हे पाहून काही पहारेकरी त्यांच्यावर धावून गेले. श्रीकृष्ण बलरामांनी त्यांचा वध केला. दुसऱ्या दिवशी बलराम कृष्ण राज्यसभेच्या ठिकाणी जाण्यास निघाले असता एक कुवलयापीड नावाचा हत्ती माहुताने त्यांच्या अंगावर घालून त्यांना ठार करण्याचा प्रयत्न केला. हा आपल्याला घातपात करण्याचा डाव आहे हे जाणून श्रीकृष्णाने त्या हत्तीची सोंड धरून त्याला खेळण्यातला हत्ती फिरवावा तसे गोल फिरवून त्याला जमिनीवर आदळले व त्याचा दात तोडून माहुतावर प्रहार केला आणि हत्ती व माहुताला ठार केले.

तेव्हा कंसाने पूर्वनियोजितपणे आपले चाणूर व मुष्टीक नावाचे दोन पहिलवान यांच्याशी कुस्ती खेळण्यासाठी समोर पाठविले. कृष्णाने चाणुराशी तर बलरामाने मुष्टिका बरोबर दंद्व सुरू केले. आडदंड असलेल्या दोन्ही पहिलवान सोबत थोड्या वेळ कुस्ती खेळून राम-कृष्णानी त्यांना पायाला धरून गोल फिरवून जमिनीवर आदळून ठार केले. यानंतर चालून आलेल्या शल, कूट आणि तोशल नावाच्या राक्षसांनाही त्यांनी ठार केले. हे पाहून कंसाने आपल्या सैनिकांना त्यांना ठार करण्याची आज्ञा दिली; परंतु या सैनिकांनाही ठार करून श्रीकृष्णांने कंसाला सिंहासनावरून खाली खेचले व त्याला जमिनीवर पाडून गळा दाबून ठार केले. कंसाच्या मृत्यूनंतर धावून आलेल्या त्याच्या आठ बांधवांनाही बलरामाने ठार केले व आपल्या माता-पित्याला व आजोबा उग्रसेनाला कंसाच्या कारागृहातून बंधन मुक्त करून आजोबा उग्रसेन यांचा राज्याभिषेक केला.

Comments
Add Comment