जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यात आज सोमवारी सकाळी भीषण अपघाताची घटना घडली आहे. आयशरच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्य जागीच ठार असून एक वर्षाचा चिमुकला थोडक्यात बचावला आहे. गजानन हिरामण पाटील आणि त्यांची पत्नी अश्विनी गजानन पाटील (दोन्ही रा. कोचूर, ता. रावेर, जि.जळगाव), अशी मृतांची नावे आहेत. ( Jalgaon accident )
नेमकं काय घडलं ?
पाटील दाम्पत्य हे दर्शनासाठी दुचाकीवरुन जात होते. मात्र काळ जणू त्यांची वाट पाहत होता. तालुक्यातील बेलसवाडी फाट्याजवळील मरीमाता माता मंदिरालगत आज सकाळी आठच्या सुमारास समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर गाडीने त्यांना जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यात पती-पत्नी जागीच ठार झाले. मात्र, दैव बलवत्तर म्हणून त्यांचे एक वर्षाचे बाळ या अपघातातून बचावले आहे. ( Jalgaon accident )
अपघाताची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताचा पंचनामा करुन दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात रवाना केले. या प्रकरणी अपघातास कारणीभूत ठरलेल्या आयशरच्या चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु आहे. मात्र एवढ्या कोवळ्या वयात आईवडिलांचे छत्र लेकरावरून हरवल्याने परिसरात हालहाल व्यक्त आहे.
तर दुसरीकडे वडिलांसोबत स्विमिंग पूलवर पोहण्यास गेलेल्या पाच वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे रविवारी सायंकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेत स्विमिंग पूलच्या चेंबरमध्ये बुडून पाच वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. निष्काळजीपणा तसेच पुरेशा सुरक्षेअभावी घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये हळहळ आणि संतापही व्यक्त होत आहे.






