Saturday, May 2, 2026

पश्चाताप बदल घडवितो

पश्चाताप बदल घडवितो

- गोष्ट लहान, मोठा अर्थ; शिल्पा अष्टमकर

मानवी जीवनात चुका होणे स्वाभाविक आहे. कोणीही परिपूर्ण नसतो; परंतु त्या चुका लक्षात येऊन मनात निर्माण होणारी खंत, जाणीव आणि सुधारण्याची भावना म्हणजे पश्चाताप. हा पश्चाताप जर योग्य प्रकारे स्वीकारला, तर तो व्यक्तीच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणतो.

पश्चाताप म्हणजे केवळ दुःख व्यक्त करणे नाही, तर आपल्या चुकीची जाणीव होऊन ती पुन्हा न करण्याचा दृढ निश्चय करणे होय. जेव्हा व्यक्ती आपल्या चुकांची जबाबदारी स्वीकारते, तेव्हा ती स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहू लागते. यामुळे आत्मपरीक्षणाची सवय लागते आणि व्यक्तिमत्त्व अधिक मजबूत होते. पश्चातापामुळे माणूस नम्र होतो. अहंकार कमी होतो आणि इतरांच्या भावनांची कदर करायला शिकतो. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीने चुकीमुळे दुसऱ्याला दुखावले असेल, तर पश्चातापामुळे तो माफी मागतो आणि नातेसंबंध सुधारण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारे पश्चाताप समाजात सौहार्द निर्माण करतो. तसेच, पश्चाताप हा प्रगतीचा मार्गही दाखवतो. आपल्या चुकांमधून शिकून माणूस अधिक सावध आणि जबाबदार बनतो. विद्यार्थी अभ्यासात दुर्लक्ष करून अपयशी ठरला, तर त्याला पश्चाताप होतो आणि पुढील वेळी तो अधिक मेहनत घेऊन यश मिळवतो. म्हणजेच, पश्चाताप हा अपयशाला यशात बदलण्याची ताकद देतो.

परंतु, केवळ पश्चाताप करून थांबणे उपयोगाचे नाही. त्यासोबत कृतीही आवश्यक आहे. चुकीची पुनरावृत्ती टाळणे, योग्य निर्णय घेणे आणि सकारात्मक वर्तन ठेवणे हे खरे बदलाचे लक्षण आहे.

शेवटी असे म्हणता येईल की, पश्चाताप हा माणसाच्या जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. तो आपल्याला स्वतःची ओळख करून देतो आणि योग्य दिशेने वाटचाल करण्याची प्रेरणा देतो. योग्य पश्चाताप माणसाला अधिक सजग, संवेदनशील आणि यशस्वी बनवतो.

रात्रंदिवस करी श्रवण । न सांडी आपुले अवगुण । स्वहित आपले आपणां | नेणे तो एक पढतमूर्ख ।। – समर्थ रामदास मराठीमध्ये एक म्हण आहे – “कळतं पण वळत नाही.” वर्षानुवर्षे आई, वडील, गुरूजन आपल्याला चांगल्या गोष्टी सांगत असतात. सारे काही आपल्याला ठाऊक असते. खरे बोलावे, कुणाशी भांडू नये, वडीलधाऱ्यांचा मान राखावा, नियमित अभ्यास करावा, परीक्षेत कॉपी करू नये हे सारे आपल्याला ठाऊक असते. पण वागताना आपले घोडे कुठे पेंड खाते ते कळत नाही. आपल्या वागण्यात सुधारणा व्हायला हवी. केवळ शिक्षेने किंवा रागावल्याने माणूस सुधारत नाही. त्यासाठी त्याला स्वतःला मनापासून सुधारण्याची इच्छा निर्माण व्हायला हवी.

एका राजाकडे दरबारात मोठी अफरातफर झाली. या प्रकरणात तिघे सामील होते. राजाचा प्रधान, शिपाई आणि एक व्यापारी. या तिघांनी मिळून तो गुन्हा केला होता. राजाने त्या शिपायाला तीन वर्षांसाठी तुरुंगात टाकले. व्यापाऱ्याला हद्दपार केले आणि चोवीस तासांच्या आत देश सोडून जाण्यास सांगितले. प्रधानाला त्याने काहीही शिक्षा सुनावली नाही. राजा त्याला फक्त म्हणाला – “तूसुद्धा यामध्ये सामील होतास. तुला लाज वाटायला हवी.” त्याने प्रधानाला काहीच शिक्षा केली नाही. ज्याला तुरुंगात टाकले होते त्या शिपायाला दोन-चार दिवस वाईट वाटले. पण नंतर त्याने तुरुंगातील इतर कैद्यांशी मैत्री केली. तो झाले गेले विसरून गेला व तुरुंगात मजेत राहू लागला.

ज्याला हद्दपार केले होते त्या व्यापाऱ्यानेही नवीन देशात आपला जम बसविला. तेथील भ्रष्टाचाऱ्यांबरोबर त्याने मैत्री केली व आपले नवेच उद्योग सुरू केले. थोडक्यात शिपाई आणि व्यापारी यांच्यात शिक्षेमुळे काहीच सुधारणा झाली नाही. प्रधान मात्र राजाचे बोलणे बसल्यामुळे अंतर्मुख झाला. त्याने राजीनामा दिला. त्याला विलक्षण पश्चाताप झाला. त्याने स्वतःमध्ये आमूलाग्र बदल घडविला. काही दिवसांनी राजाने त्याला पुन्हा प्रधान म्हणून नेमले.

आपल्या हातून ज्या चुका होतात त्याचा आपल्याला मनापासून पश्चाताप झाला पाहिजे. त्याच त्या चुका पुन्हा करीत राहणे आणि कोडग्याप्रमाणे सगळ्यांची बोलणी खात राहणे हे काही शहाणपणाचे लक्षण नाही. “सुज्ञास अधिक सांगणे न लगे” या म्हणीप्रमाणे आपण जो उपदेश ऐकतो तो जीवनात उतरविण्यासाठी मनापासून प्रयत्न केला पाहिजे. अन्यथा आपली गणना पढतमूर्खामध्ये होईल. आपली चूक लक्षात येताच संबंधित व्यक्तीची माफी मागून चूक कबूल करावी.

Comments
Add Comment