मुंबई : पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या गोशाळा विस्तारासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला जमिनीचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. यमाई तलावाजवळील ३.१२ हेक्टर जमीन मंदिर समितीच्या नावे करण्याबाबत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून, या संदर्भातील सुधारित प्रस्ताव १५ दिवसांच्या आत सादर करण्याचे स्पष्ट आदेश प्रशासनाला दिले आहेत.
मंत्रालयात महसूलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत पंढरपूर संस्थानचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्यासह सोलापूरचे जिल्हा प्रशासन आणि महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मंदिर समितीच्या सध्याच्या १२ हेक्टर जागेवरील गोशाळेची वाढती गरज लक्षात घेता अतिरिक्त जागेची मागणी २००८ पासून प्रलंबित होती.
या ३.१२ हेक्टर जमिनीच्या आरक्षणाबाबत काही तांत्रिक अडचणींमुळे हा प्रस्ताव रखडला होता. मूळ आरक्षणात 'पिकनिक स्पॉट' आणि 'टँक डेव्हलपमेंट' असे उल्लेख असल्याने ही जागा मंदिर समितीला हस्तांतरित करण्यात कायदेशीर पेच निर्माण झाला होता. मात्र, महसूलमंत्र्यांनी या बैठकीत जुन्या तांत्रिक वादात न अडकता विकासाला प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत. जुन्या आरक्षणाच्या त्रुटी शोधण्यापेक्षा 'पिकनिक स्पॉट' विकसित करण्याच्या दृष्टीने तातडीने नवा आणि सुधारित प्रस्ताव तयार करण्याचे आदेश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.
भक्तांसाठी आणि गोवंशासाठी सोयीसुविधा
हा सुधारित प्रस्ताव पुढील १५ दिवसांत शासनाकडे सादर झाल्यानंतर तातडीने जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. यामुळे गोशाळेचा विस्तार होऊन तिथे गोवंशासाठी अधिक चांगल्या सोयीसुविधा निर्माण करता येतील. तसेच, मंदिर समितीच्या माध्यमातून भक्तांसाठी उपयुक्त प्रकल्प राबवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.






