Tuesday, April 28, 2026

Summer Vacation : शाळा सुटली, उन्हाळी सुट्टी जाहीर

Summer Vacation : शाळा सुटली, उन्हाळी सुट्टी जाहीर

मुंबई : राज्यातील उकाड्याचे प्रमाण वाढले आहे. या वाढलेल्या तापमानात विद्यार्थी शाळेत येण्याच्या निमित्ताने घराबाहेर पडल्यास उन्हात वावरतील. यामुळे मुलांच्या तब्येतीवर परिणाम होण्याचा धोका आहे. हीच बाब विचारात घेऊन राज्याच्या शिक्षण विभागाने शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार राज्यातील सर्व शाळांना शनिवार २ मे २०२६ पासून उन्हाळी सुट्टी जाहीर झाली आहे. ही सुट्टी १४ जून २०२६ पर्यंत असेल. शाळा १५ जून २०२६ पासून पुन्हा सुरू होणार आहेत. पण काही जिल्ह्यांमध्ये उकाड्याचा त्रास वाढल्यामुळे शाळांनी सोमवार (२७ एप्रिल २०२६) पासूनच उन्हाळी सुट्टी दिली आहे.

राज्याच्या शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार जाहीर झालेली उन्हाळी सुट्टी राज्यातील सर्व सरकारी, निमसरकारी, अनुदानित, खासगी अशा प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळांसाठी लागू आहे. राज्य शिक्षण मंडळ तसेच सीबीएसई, आयसीएसई आणि ओआरएस अशा सर्व बोर्डांच्या महाराष्ट्रातील शाळांना हा निर्णय लागू असेल. शिक्षण क्षेत्रात एकवाक्यता राखण्यासाठी हा सर्वसमावेशक निर्णय घेण्यात आला आहे.

वेधशाळेने (हवामान विभागाने) राज्यातील अनेक जिल्ह्यांना वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर यलो किंवा ऑरेंज अलर्ट दिला आहे. अनेक ठिकाणी दुपारी ४० ते ४५ अंशांदरम्यान तापमानाची नोंद होत आहे. वाढत्या उकाड्यामुळे दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. या परिस्थितीत शाळेसाठी मुलांना बोलावल्यास त्यांच्या तब्येतीवर परिणाम होण्याचा धोका आहे. यामुळेच राज्य शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्रातील सर्व शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर केली आहे.

याआधी राज्यातील शाळा सकाळी ६.३० ते सकाळी १०.३० अशा भरवण्याचे नियोजन होते. पण उकाड्याचा त्रास वाढू लागल्यामुळे राज्याच्या शिक्षण विभागाने शाळांना तातडीने उन्हाळी सुट्टी जाहीर केली आहे. या सुट्टीमुळे पुढील नियोजीत शैक्षणिक वेळापत्रकात थोड्या बदलाची शक्यता आहे.

Comments
Add Comment