Tuesday, April 28, 2026

MLC Election BJP List : भाजपकडून परिषदेवर सुनिल कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार

MLC Election BJP List : भाजपकडून परिषदेवर सुनिल कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार

पोटनिवडणुकीत प्रज्ञा सातव यांना उमेदवारी; निष्ठवंतांना संधी, शिवसेना, राष्ट्रवादीसह मविआच्या निर्णयाकडे लक्ष

मुंबई : विधान परिषदेच्या नऊ नियमित जागा आणि एका पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने अखेर आपल्या उमेदवारांची घोषणा केली असून, यामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार यांच्या नावांवर मंगळवारी रात्री दिल्लीत शिक्कामोर्तब करण्यात आले. विशेष म्हणजे, राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या पोटनिवडणुकीच्या जागेवर पक्षाने अपेक्षेप्रमाणे प्रज्ञा सातव यांनाच पुन्हा संधी दिली आहे.

या निवडीतून भाजपने प्रस्थापित बड्या चेहऱ्यांऐवजी संघटनात्मक बांधणीत सक्रिय असलेल्या आणि ग्रामीण भागात पक्षाची पाळेमुळे घट्ट करणाऱ्या नेत्यांना विधानपरिषदेची दारे खुली करून दिली आहेत. सुरुवातीला कोअर कमिटीने पाठवलेली ३० नावांची यादी दिल्लीवरून परत आल्यानंतर १४ नावांची फेरयादी पाठवण्यात आली होती. यातून निवडलेल्या पाच नावांमध्ये प्रादेशिक आणि जातीय समीकरणांचा अचूक समतोल साधण्यात आला आहे. सुनील कर्जतकर आणि संजय भेंडे यांच्या निवडीतून पक्षाने संघटनात्मक बळकटीकरणावर भर दिला आहे. तसेच महिला मोर्चाच्या आक्रमक नेत्या माधवी नाईक, पश्चिम महाराष्ट्रातील विवेक कोल्हे आणि कोकणातील प्रमोद जठार यांच्या माध्यमातून संबंधित विभागांत भाजपची राजकीय ताकद बळकट करण्याचा प्रयत्न केला आहे.

राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष

अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस उरले असताना भाजपने आपले पत्ते उघड केले असले, तरी महायुतीमधील शिवसेना आणि अजित पवार गटाच्या कोट्यातील उमेदवारांची अधिकृत घोषणा अद्याप बाकी आहे. संख्याबळानुसार महायुतीला नऊ, तर महाविकास आघाडीला एक जागा मिळण्याची चिन्हे आहेत. महाविकास आघाडीकडे एका जागेचे संख्याबळ असल्याने तिथे कोणाची वर्णी लागते, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. भाजपने ३० एप्रिलच्या मुदतीपूर्वीच आपली नावे निश्चित करून इच्छुकांमधील संभाव्य नाराजी शमवण्याचा प्रयत्न केला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा