Saturday, April 25, 2026

Amravati Paratwada परतवाड्यात मैत्रीआडून भयंकर अत्याचार

Amravati Paratwada परतवाड्यात मैत्रीआडून भयंकर अत्याचार

वार्तापत्र : विदर्भ 

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे गेल्या तीन आठवड्यांपासून महिलांवरील कथित लैंगिक अत्याचार आणि आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. आयान अहमद आणि उजेरखान या दोन तरुणांनी हे कृत्य केल्याचे समोर आले असून, दोघेही सध्या पोलिसांच्या कोठडीत आहेत. याव्यतिरिक्त पोलिसांनी इतर काही संशयितांनाही ताब्यात घेतले असून त्यांची सखोल चौकशी सुरू आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस खात्याने तपासासाठी विशेष तपास पथक स्थापन केले आहे.

परतवाडा हे अमरावती जिल्ह्यातील एक महत्त्वाचे औद्योगिक शहर असून ते जिल्ह्यापासून ४० ते ५० किमी अंतरावर आहे. या शहराला लागूनच अचलपूर हे तालुक्याचे ठिकाण आहे. परतवाडा हे एकेकाळी कापसाच्या जिनिंग-प्रेसिंग मिल्ससाठी प्रसिद्ध होते आणि आजही येथे मोठ्या प्रमाणावर व्यापार चालतो. २०११ च्या जनगणनेनुसार, परतवाड्यात हिंदू लोकवस्ती लक्षणीय आहे, तर अचलपूरमध्ये मुस्लीम वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. अचलपुरात रोजगाराच्या संधी कमी असल्याने तिथली बहुतांश मंडळी रोजीरोटीसाठी गजबजलेल्या परतवाडा शहरात येत असतात.

आयान अहमद या १९ वर्षीय तरुणाने असंख्य हिंदू आणि मुस्लीम मुलींशी मैत्री केली होती. तरुणींवर प्रभाव पाडण्यासाठी तो महागड्या गाड्यांचा वापर करायचा. पोलिसांनी या गाड्यांचा तपास केला असता, आयानच्या वडिलांचा जुन्या गाड्यांच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय असल्याचे समोर आले. वडिलांकडे विक्रीसाठी येणाऱ्या नवनवीन महागड्या गाड्या घेऊन तो मुलींना प्रभावित करत असे. यात त्याचा साथीदार उजेरखानही सहभागी होता. हे दोघेही मुलींना जाळ्यात ओढून त्यांच्याशी अश्लील चाळे करायचे आणि त्याचे व्हिडीओ बनवायचे. त्यानंतर हे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणींना ब्लॅकमेल केले जायचे आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले जायचे, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

आयान आणि उजेर यांची चौकशी सुरू होताच या प्रकरणाला धार्मिक रंग देण्यास सुरुवात झाली. काही हिंदुत्ववादी संघटनांनी याला 'लव जिहाद'चा प्रकार संबोधत 'परतवाडा बंद'ची हाक दिली होती, ज्याला प्रतिसादही मिळाला. दरम्यान, राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारेखान यांनी एक अभ्यास गट पाठवून पीडित तरुणी या मुस्लीमच असल्याचा दावा केला. भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनीही याला दुजोरा दिला. मात्र, जाणकारांच्या मते यात हिंदू मुलीही मोठ्या प्रमाणात गुंतलेल्या आहेत.

पोलिसांनी पीडित तरुणींच्या कुटुंबीयांना तक्रार करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले असून, त्यांची ओळख गुप्त ठेवली जाईल असे आश्वासन दिले आहे. मात्र, सामाजिक बदनामीच्या भीतीने अनेक कुटुंबे पुढे येण्यास धजावत नाहीत. सध्या केवळ मुस्लीम तरुणींच्याच तक्रारी आल्याचे सांगितले जात असले, तरी सूत्रांच्या माहितीनुसार एका हिंदू अल्पवयीन मुलीच्या आईनेही तक्रार दाखल केली असून त्याची चौकशी सुरू आहे. गावात अशी चर्चा आहे की, हे अश्लील व्हिडीओ विकून आयान आणि उजेर पैसे कमवत होते. मात्र, पैशांच्या वाटपावरून किंवा इतर कारणावरून दोघांमध्ये खटके उडाले आणि उजेरनेच हे बिंग फोडले. त्यानंतरच या धक्कादायक प्रकरणाचा उलगडा झाला. सध्या हिंदुत्ववादी संघटना या विषयात प्रचंड आक्रमक आहेत. अमरावतीत विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी काही पत्रकारांना या प्रकरणाशी संबंधित सुमारे २०० अश्लील व्हिडीओ दाखवल्याचे वृत्त आहे. यावर खासदार डॉ. अनिल बोंडे आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी आक्रमक भूमिका घेत हा 'लव जिहाद'चा प्रकार असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणाची पाळेमुळे खोदून काढण्याची मागणी त्यांनी केली आहे. दुसरीकडे, अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारेखान या प्रकरणावर पांघरूण घालत असल्याचा आरोप होत असून जनसामान्यांमध्ये त्याबद्दल नाराजी आहे. परिस्थिती चिघळू नये म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व राजकीय नेत्यांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.

आरोपी तरुण अवघ्या १९-२० वर्षांचे असून त्यांनी एका मित्राच्या फ्लॅटवर नेऊन हे अश्लील कृत्य केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी तो फ्लॅट सील केला असून मालकाचीही चौकशी सुरू आहे. काल पोलिसांनी आरोपींची शहरातून पायी धिंड काढली. काही पीडित मुलींचे जबाब गावात नोंदवल्यास पुन्हा चर्चेचा विषय होईल, या भीतीने पोलिसांनी त्यांना गुप्तपणे अंजनगाव सुर्जी येथे नेऊन दंडाधिकाऱ्यांसमोर त्यांचे जबाब नोंदवले आहेत. सध्या शांत असलेल्या या परिसरात प्रचंड तणाव असून, राष्ट्रीय माध्यमांनीही या प्रकरणाची दखल घेतली आहे. आता एसआयटीच्या तपासात काय निष्पन्न होते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

अविनाश पाठक

Comments
Add Comment