मुंबई : मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे आणि दक्षिण आफ्रिकेच्या शिष्टमंडळामध्ये आज जहाजबांधणी, मत्स्य व्यवसाय, किनारी पायाभूत सुविधा आणि सागरी व्यापारवृद्धी संदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाली. दोन्ही देशांना लाभलेला विस्तीर्ण सागरी किनारा आणि विद्यमान व्यापारी संबंध विचारात घेता, तंत्रज्ञान देवाण घेवाणचा योग्य वापर करून आणखी मोठी उद्दिष्टे साध्य करता येतील, असा विश्वास श्री. राणे यांनी यावेळी व्यक्त केला.
📍 २८ एप्रिल २०२६ | मंत्रालय, मुंबई दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताकाचे नवी दिल्ली येथील उच्चायुक्त प्रो.अनिल सुकलाल यांच्या नेतृत्वात आलेल्या शिष्टमंडळाने आज मंत्रालयातील माझ्या दालनात भेट घेतली. या भेटीदरम्यान जहाजबांधणी, मत्स्य व्यवसाय, किनारी पायाभूत सुविधा आणि सागरी… pic.twitter.com/nIiZ9ThnQK
— Nitesh Rane (@NiteshNRane) April 28, 2026
दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताकाचे नवी दिल्ली येथील उच्चायुक्त प्रो. अनिल सुकलाल यांच्यासह सेड्रिक सी. क्रॉली व गेडियन लाबाने यांनी मंत्री श्री राणे यांची मंत्रालयात भेट घेतली. यावेळी मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
मंत्री राणे म्हणाले की, महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक वेगाने प्रगती करणारे राज्य आहे. बंदर विकासासाठी राज्य सरकारने आवश्यक धोरणे वेळोवेळी राबविली आहेत. बंदरांचा विस्तार, आधुनिक लॉजिस्टिक्स व्यवस्था, डिजिटायझेशन आणि सागरी पायाभूत सुविधांच्या उभारणीत महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याने मच्छीमारांना शेतकऱ्यांप्रमाणे विविध योजनांचा लाभ मिळू लागला असल्याचे त्यांनी सांगितले. जलमार्ग आणि जलवाहतुकीच्या विकासावर भर देण्यात येत असून या माध्यमातून वाहतूक खर्चात बचत होऊन रस्ते वाहतुकीस जल वाहतूक सक्षम पर्याय निर्माण होणार आहे.
मंत्री राणे म्हणाले की, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील व्यापार व औद्योगिक सहकार्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. अनेक वर्षांपासून विविध क्षेत्रांत दोन्ही देशांमध्ये मजबूत व्यावसायिक संबंध असून, सागरी आणि मत्स्य क्षेत्रातही ते पुढील काळात अधिक दृढ करण्यास वाव असल्याचे ते म्हणाले.






