Tuesday, April 28, 2026

नक्षत्रांचे देणे

नक्षत्रांचे देणे

आशय : वीणा सानेकर

रक्ताच्या नात्यांमध्ये खूपदा अहंकार डोकावतात. त्यात मालमत्तेची गणिते असतात. हक्कांचे वाद असतात.सोन्या नाण्याच्या वाटण्या असतात. आताची कुटुंबे पाहिली की जुना काळ आठवतो. एकत्र कुटुंब पद्धतीचा तो जमाना! एकाच घरात खूप माणसे कशी जगायची? लहान लहान मुलांना अनेकदा आईपेक्षा जास्त काकूचा लळा असायचा. आजोबांचा प्रेमळ धाक असायचा. आजीची साखरसाय नि मायेची पाखर म्हणजे सुरक्षिततेचे कवच वाटायचे. गावातली अशी कौलारू घरे किंवा चौसोपी वाडे आणि त्या घरांमधली माणसे अनेकदा साहित्यातून भेटतात तेव्हा गंमत वाटते.

मुंबई नगरीमधल्या घरांच्या तर खूप गोष्टी आहेत. ‘मुंबईचा जावई ‘ सारख्या चित्रपटाची गोष्ट आठवते. गावाकडे मोठ्या घरात राहण्याची सवय असलेली एक मुलगी लग्न करून मुंबईतील खुराडे वजा घरात येते. मुंबईत चाळीवजा लहान घरांमधून कित्येक संसार वसले आहेत. पागडीची घरे, भाड्याची घरे, ओनरशिपची घरे एक ना दोन... घर म्हणजे नुसत्या भिंती नाहीत. जी माणसे इथे राहतात, ती एकमेकांशी सुख दुःखाच्या धाग्यांनी बांधलेली असतात. हिंदीतले एक सुंदर गाणे आहे, ये तेरा घर, ये मेरा घर किसीको देखना हो घर तो पहले आके मांग ले, तेरी नजर मेरी नजर…. माझे घर जर कुणाला पहायचे असेल तर त्याने आधी ते पहायला माझी नजर मागून घ्यावी किती खरे आहे! घर पहाताना ते पहायची दृष्टी हवी. घरांवर जणू काही तिथे रहायला येणाऱ्या माणसांचे नाव कोरलेले असते. मी मुलुंडला राहायला आले तेव्हा एका आजींचे घर मला खूप आवडले.योगायोग म्हणजे त्यांचा आणि माझा जन्म एकाच दिवशीचा! कुठे कसे सूर जुळले ठाऊक नाही पण त्यांचे घर मलाच विकायचे, हे आजींनी जणू काही ठामपणे ठरवले होते. आजींसाठी मी नि माझ्यासाठी त्या नव्या होत्या, पण घराचा तो ‘सुयोग’ आम्ही दोघींनी जमवलाच. ऋणानुबंधाच्या चुकून पडल्या गाठी भेटीत तृप्तता मोठी ‘भेटीत तृप्तता मोठी’ अशी तृप्तता आयुष्याच्या कोणत्या टप्प्यावर मिळेल, सांगता येत नाही. कधी कधी रक्ताच्या नात्यांना जे जमत नाही ते जुळून आलेली नाती सहज शक्य करून दाखवतात. या नात्यांमध्ये कोणताच हिशोब नसतो. निखळ पारदर्शक अशी ही नाती खूप काही देऊन जातात.

मला विंदा करंदीकरांची एक छोटीशी कविता आठवते आहे:

कधी वाटते वाटते तुला द्यावे असे काही ज्यात लपेल आकाश लोपतील दिशा दाही असे काही तुला द्यावे भाबडे नि साधे भोळे राधेचीही पड़ो दृष्ट द्रौपदीचे दिपो डोळेदेण्याच्या भावनेत दडलेला ओतप्रोत अर्थ या दोन कडव्यांमध्ये दाटून आला आहे. असे देणे अमूल्य असते. ते फेडता येत नाही म्हणून कवी आरती प्रभूंनी लिहिले असावे…...

गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे… नक्षत्रांच्या देण्याची परतफेड करणे शक्य नसतेच. त्याची फेड करण्याचा अट्टाहास न करता प्रामाणिकपणे कोणतेही नाते जगणे, यातच नात्याची सार्थकता आहे.

Comments
Add Comment