Tuesday, May 26, 2026

Diesel Saving in ST : एसटीमध्ये डिझेल बचतीसाठी राज्यव्यापी मोहीम ; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश

Diesel Saving in ST : एसटीमध्ये डिझेल बचतीसाठी राज्यव्यापी मोहीम ; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश

- जागतिक इंधन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय

मुंबई : जागतिक पातळीवर जाणवणाऱ्या इंधन तुटवड्याची झळ एसटी महामंडळाला बसू नये आणि वाढत्या इंधन खर्चावर नियंत्रण मिळवता यावे, यासाठी राज्यभरात 'इंधन बचत... म्हणजेच इंधन निर्मिती' ही व्यापक मोहीम हाती घेण्यात येणार आहे. एसटी महामंडळाचा दैनंदिन खर्च कमी करण्यासाठी आता प्रत्येक आगारनिहाय डिझेल बचतीचे उद्दिष्ट निश्चित केले जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक (Transport Minister Pratap Sarnaik) यांनी मंगळवारी दिली. (Diesel Saving in ST)

मंत्रालयातील आपल्या दालनात आयोजित एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विशेष आढावा बैठकीत मंत्री सरनाईक यांनी वाढत्या इंधन खर्चाबाबत चिंता व्यक्त करत हे महत्त्वपूर्ण निर्देश दिले. एसटी महामंडळाच्या सद्यस्थितीचा आढावा घेताना परिवहन मंत्र्यांनी सांगितले की, लालपरीला सध्या दररोज सरासरी १०.८७ लाख लिटर डिझेलची आवश्यकता भासते. त्यामुळे इंधन खर्च कमी करणे ही काळाची गरज बनली आहे. एसटीच्या प्रत्येक आगाराने दररोज किमान ५ लिटर डिझेल बचतीचे जरी उद्दिष्ट ठेवले, तरी संपूर्ण राज्यातून रोज १ हजार लिटर डिझेल वाचू शकते. सध्याच्या डिझेलच्या दरानुसार ही बचत दररोज जवळपास १ लाख रुपयांपर्यंत जाईल. लहान बचतीतूनच मोठी आर्थिक शिस्त निर्माण होते," असे त्यांनी स्पष्ट केले. (Diesel Saving in ST)

वाहन चालविण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे ज्या चालकांच्या बसचे के.पी.एल. (किलोमीटर प्रति लिटर) प्रमाण कमी भरते, अशा चालकांचे समुपदेशन करून त्यांना पुनर्प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने वेग नियंत्रण, योग्य गिअरचा वापर, विनाकारण इंजिन सुरू न ठेवणे आणि सर्वोत्तम ब्रेकिंग पद्धती या तांत्रिक बाबींचे विशेष प्रशिक्षण चालकांना दिले जाईल. (Diesel Saving in ST)

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या चालकांना प्रोत्साहन भत्ता :

डिझेल बचतीमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या चालकांचा महामंडळातर्फे विशेष सत्कार करण्यात येईल, तसेच त्यांना प्रोत्साहनपर भत्ता देण्याची योजना सुरू करण्यात येणार आहे. एसटीचा चालक हा संस्थेच्या अर्थकारणाचा शिल्पकार आहे. त्यामुळे निश्चित उद्दिष्टांपेक्षा जास्त बचत करणाऱ्या आगारांना दरमहा विशेष आर्थिक पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल, असे सरनाईक यांनी सांगितले. (Diesel Saving in ST)

कार्यशाळांना तांत्रिक तपासणीचे आदेश :

गाड्यांच्या देखभालीकडेही महामंडळाकडून विशेष लक्ष दिले जाणार आहे. टायरमधील हवेचा दाब (टायर प्रेशर), इंजिन ट्युनिंग, ऑईल गळती आणि ब्रेक प्रणाली यांमधील त्रुटींमुळे इंधनाचा अपव्यय होतो. त्यामुळे बसेसची दैनंदिन तांत्रिक तपासणी आणि वेळेवर दुरुस्ती करण्याचे आदेश कार्यशाळांना देण्यात आले आहेत. (Diesel Saving in ST)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >