Saturday, April 25, 2026

अनेकदा पहावं जरूर ‘एकदा पहावं करून

अनेकदा पहावं जरूर ‘एकदा पहावं करून

 पाचवा वेद : भालचंद्र कुबल

परवा एक मराठी नाटक बघितलं आणि थेट डोक्याला शॉट लागला. आता अशा नाटकाबद्दल टीकात्मक निरीक्षण लिहायचे म्हणजे आपणही नकळत नकारात्मकतेकडे झुकत असतो. ती निगेटीव्हिटी घालवायला पुन्हा दुसरे नाटक पहावे लागले आणि या लेखाच्या लिखाणाला लागलो. नाटक होतं "एकदा पहावं करून...!"

हे नाटक मराठी रंगभूमीवर तिसऱ्यांदा अवतरतेय. १९९२ साली पहिल्यांदा प्रकाशित झाले तेव्हा माझ्या बघण्यात आले नव्हते मात्र दुसऱ्यांदा आले तेव्हा कुठल्या तरी संस्थेच्या मदतनिधीसाठी पाहिलेले आठवते. मात्र परवा एका नाटकामुळे लागलेल्या शॉटवर उतारा म्हणून एकदा पहावं बघून म्हणूनच हे नाटक पाहून आलो. कुणी कितीही खोदून खोदून विचारलं तरी मी त्या शॉट लागलेल्या नाटकाचं नाव घेणार नाही, फक्त निर्माता गाववाला मित्र असल्याने त्याला केवळ एकच सल्ला देईन की सव्वाशे नाटकांचा दिग्दर्शकीय अनुभव, एन.एस.डी.मधील प्रशिक्षण, पुणेरी लेखकांच्या संहिता, मराठीतील एकेकाळची आघाडीची चित्रतारका, क्राईम सस्पेंस स्टोरी प्लॉट हे सारे घटक नाटक चालवू शकतात, ह्या अंधश्रद्धा आहेत. प्रेक्षकांना हल्ली कंटेंट लागतो. तरुण प्रेक्षकवर्गाला तर फक्त एंटरटेनमेंट लागते. तो एलिमेंट नसेल तर नाटक कितीही 'वजनदार' असो, नाटक पडणे अपरिहार्यच असते. असो. "एकदा पहावं करून" आदल्या दिवशी आलेल्या निराशेवरचा उपाय ठरला.

एकदा पहावं करून हा रत्नाकर मतकरी लिखित धावपळीचा फार्स आहे. हा विनोदी नाट्यप्रकारातला एक उपप्रकार आहे, जो अतिशयोक्तीपूर्ण, हास्यास्पद आणि क्लृप्तींनी भरलेला असतो. मराठी नाट्यसाहित्यात फार्सला स्वतंत्रपणे प्रहसन म्हणून ओळखले जाते आणि त्याचे स्पष्ट असे अनेक उपप्रकार नमूद केलेले नाहीत. मात्र इंग्लिश विनोदी साहित्यातील वैशिष्ट्यपूर्ण फार्समधे पळापळ, वेशांतर, फसवाफसवी आणि विडंबन यांचा वापर होतो, ज्यामुळे प्रेक्षकांना हमखास हास्याचे खाद्य मिळते. हा सुखात्मिकेचा प्रकार असला तरी तो वेगळा ओळखला जातो, कारण यात विनोदाची तीव्रता जास्त असते तर कधी कारुण्याची झालरही असू शकते. नाट्यप्रकारातील स्थावर नाटकाचे प्रमुख चार प्रकार म्हणजे शोकात्मिका, सुखात्मिका, मेलोड्रामा आणि फार्स (प्रहसन). फार्सला एक स्वतंत्र प्रकार मानले जाते, पण संस्कृत परंपरेत दशरूपकांमध्ये प्रहसन हा एक आहे आणि पाश्चात्त्य फार्समध्ये तो विविध शैलीत अवतरतो, असे असले तरी मराठीत तो एकच मुख्य प्रकार म्हणून प्रहसनाकडे पाहिले जाते.

फार्स नाट्यप्रकाराचा उगम पाश्चात्त्य युरोपमध्ये इसवी सन पूर्व पाचव्या शतकात झाला, जेव्हा ग्रीक सुखात्मिकांबरोबर हास्योत्पादक लघुनाटके रचली जात होती. 'Farcire' या लॅटिन शब्दापासून (ज्याचा अर्थ 'कोंबून भरणे') ही संज्ञा उदयास आली आणि मध्ययुगीन 'मायस्टेरे' नाटकांमधून ती विकसित झाली. प्रबोधन काळात (१७वे शतक) फार्सला बहर आला, विशेषतः फ्रान्समध्ये मॉलियर सारख्या नाटककारांमुळे, ज्यांनी व्यंग आणि विसंगतींवर आधारित फार्स रचले. १९व्या शतकात फ्रान्स, जर्मनी, रशिया आणि ब्रिटनमध्ये त्याचा प्रसार झाला, जिथे अतिशयोक्तीपूर्ण विनोद आणि क्लृप्तीला प्राधान्य मिळाले. मराठी रंगभूमीवर फार्स १८५६ मध्ये अमरचंद वाडीकर नाट्यमंडळाने इंग्रजी अनुकरणात पौराणिक नाटकांच्या जोडीने प्रथमतः सादर हा लौकिक जीवनचित्रण करणारा विनोदी प्रकार होता, जो नंतर विनायक त्र्यंबक मोडक (१९०२, 'प्रणय विवाह नाटक') आणि श्रीपाद कृष्ण कोल्हटकर (१९१८, 'संगीत सहचारिणी') यांसारख्या नाटककारांमुळे समृद्ध झाला. रत्नाकर मतकरी हे मराठी साहित्याला लाभलेले एक चतुरस्त्र लेखक होते. इंग्रजी साहित्याचे अफाट वाचन आणि त्यातून हाताळले गेलेले वेगवेगळे साहित्यातील फॉर्म्स, आपल्या साहित्यातून त्यांनी रंगभूमीवर आणले. त्यांच्या 'एकदा पहावं करून’ ह्या फार्सशी संलग्न असलेल्या नाट्यामध्ये हेच विविध नाट्यप्रकार दिग्दर्शक विजय केंकरे यांनी हाताळले आहेत.

हे नाटक दोन मध्यमवयीन पुरुषांभोवती फिरते - एक बाप्पाजी धरसोड (ब्लॅक मनी बनवणारा गुंड मवाली) आणि दुसरा बबनराव बकरे (भित्रा वकील), ज्यांचे परस्परविरोधी विचार, हास्याची निर्मिती करतात. वकिलाची मुलगी आणि गुंडाचा मुलगा यांच्या प्रेमाला सफल-असफल करण्याची धडपड आणि भूतकाळातील दोघांच्याही विवाहबाह्य संबंधाची गफलत म्हणजेच अतिशयोक्तीचा हा धावपळ फार्स आहे. वैभव मांगले आणि आनंद इंगळे यांच्या प्रमुख भूमिका असलेले हे नाटक प्रेमळ नातेसंबंध आणि हास्याचा सुरेख संगम आहे. तर मर्डरवाले कुलकर्णी या नाटकातील आंगीक अभिनयाने लक्ष वेधून घेणाऱ्या भार्गवी चिरमुलेने अत्यंत सहज फार्सिकल लाऊड अभिनय केला आहे ( ही कॉम्प्लिमेंट आहे, टीका नाही). नाटकातील प्रत्येक पात्र ज्यावेळी हशे वसूल करण्यासाठी प्रयत्न करते तेव्हाच ते नाटक फार्सच्या प्रवासाला लागलेले असते. यातील सर्वच कलाकार आता इतके एकमेकात मिश्रीत झालेत की एका अर्थी बरं झालं मी नाटक उशिरा बघितलं. शिवाय विजय केंकरेंशी बोलताना एक कळले की या नव्या आवृत्तीत "मी, राजन भिसे आणि मतकरी, एवढेच फक्त रिपिट झालो आहोत..!" त्यामुळे नव्या संचातील हा प्रयोग एकदा तरी पहावा जरूर..!

(छायाचित्र सौजन्य : संजय पेठे)

Comments
Add Comment