स्मृतीगंध : लता गुठे
नुकताच पुस्तक दिन सर्वांनी साजरा केला. १९७२ ची गोष्ट. मी बालवाडीत जात होते. त्यावेळी महाराष्ट्रात भीषण दुष्काळ होता. बालवाडी व पहिली दोन वर्ग एकत्रच बसवले जात होते. त्यामुळे पहिलीपर्यंत चांगलं वाचता येऊ लागलं होतं. आमच्या आजूबाजूचे सर्व लोक रोजगार हमीच्या कामाला जात असत, तिथे त्यांना सुकडी मिळत असे. सुकडी म्हणजे तुपात भाजलेले गव्हाचे पीठ गूळ आणि विलायची घातलेले. आमच्या घरचे मात्र कोणी रोजगार हमीच्या कामाला जात नसल्यामुळे आम्हाला सुकडी मिळत नव्हती आणि मला सुकडी खूप आवडायची.
बालवर्ग आणि पहिली एकत्रच बसवल्यामुळे बालवाडीचा आणि पहिलीचा अभ्यास एकाच वर्षी झाला. पहिलीला डायरेक्ट बालभारती गणित आणि गोष्टीचे पुस्तक होते. लहानपणीपासूनच म्हणजे लिहायला, वाचायला यायला लागल्यापासून शाळेत जे शिकवलं जातं होतं ते शेजारच्या इतर मुलांना शिकवायचे. कारण ते खडी फोडायला रोडवर जायचे. शिकवण्याच्या बदल्यात त्यांच्याकडून सुकडी घ्यायची. नंतर दुसरी आणि तिसरीला चांदोबा आणि चंपक ही दोन मासिकं आमच्या शाळेत यायला लागली. आमचे गुरुजी वर्गात ती वाचायला लावायचे. मला चंपक मासिक फार आवडायचे. तसेच इसाबनीती, पंचतंत्रातील गोष्टी प्राणी, पक्षी, त्यांचे बोलणारे जग हे मला फार आवडायचे. अशाप्रकारे वाचनाची आवड निर्माण झाली. पुढे पाचवीला हायस्कूलला गेले. तिथे भालेश्वर हायस्कूलचे वाचनालय होते. तिथून मुलांसाठी असलेली पुस्तके मिळायची जो मुलगा किंवा मुलगी एका महिन्यामध्ये पाच गोष्टीची पुस्तकं वाचेल त्याला ‘चंपक’ मासिक प्रथम वाचायला मिळायचे. आणि माझी भरपूर पुस्तकं वाचून होत असत. कारण माझ्या काकांचा मुलगा माझ्यापेक्षा एक वर्ग पुढे होता, परीक्षा झाली की मला त्याची पुस्तकं मिळायची. उन्हाळ्याच्या सुट्टीतच सर्व वर्षभराचा अभ्यास होऊन जायचा. त्यामुळे माझ्याकडे पुस्तकं वाचायला रिकामा वेळ असायचा. चांगल्या चांगल्या लेखकांची मुलांवर संस्कार करणारी पुस्तकं मला वाचायला मिळाली. आणि माझ्या बालमनावर वाचनाचा संस्कार रुजला.
मी सातवीला गेल्यानंतर माझे छोटे काका पांडुरंग खेडकर हे पाथर्डी येथील कॉलेजवर ग्रंथपाल म्हणून रुजू झाले आणि कॉलेजमध्ये असलेले कथासंग्रह, कादंबऱ्या ते घरी घेऊन येऊ लागले. त्यांनी आमच्या भालगाव या गावात वाचनालय सुरू केले. तिथेही व. पु. काळे, ह. मो मराठे, ना. सी.फडके, विश्वास पाटील यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या अत्यंत लोकप्रिय झाल्या. विशेषतः ‘पानिपत’, रणजित देसाई यांच्या स्वामी, श्रीमान योगी यांसारख्या ऐतिहासिक कादंबऱ्या एका कोपऱ्यात कोणालाही दिसणार नाही अशा ठिकाणी बसून वाचून काढल्या. त्यामुळे या कादंबऱ्यांनी अक्षरशः वेड लावले. काही स्त्रियांची आत्मचरित्रंही वाचून काढली. काही प्रेम विषयक कादंबऱ्या किशोर वयामध्ये मृत्युंजय सारख्या कादंबरीने मनाला भुरळ घातली आणि ही आवड अशीच पुढे चालू राहिली.
१९८४ मध्ये मुंबईत आले आणि जिथे जिथे आम्ही राहिलो तिथे तिथे आधी लायब्ररी शोधू लागले. ह्या वाचनाच्या वेडामुळे अपूर्ण शिक्षणही मुंबईत आल्यानंतर पूर्ण केले. एका एका वाक्याने माझ्या जीवनातील अनेक बदल घडत गेले ते असे... मदर तेरेसाच्या एका पुस्तकांमध्ये वाचले “एखाद्या गरजू व्यक्तीला आपल्या हाताबरोबर आपलं काळीजही देता आलं पाहिजे.” त्या वेळेला मी शाळेमध्ये शिक्षिका होते.
अनेक गरजू मुलांना मदत करत होते. यातून खूप आनंद मिळायचा. एक दिवस सावरकरांचे पुस्तक वाचताना एक वाक्य वाचलं गेलं ते असं होतं, ‘देहाकडून देवाकडे जाताना मध्ये एक देश लागतो आणि त्याचे आपण देणे लागतो’ तेव्हापासून सामाजिक कार्याकडे वळले.
एक दिवस स्टेशनवर विलेपार्ले येथे पुस्तकाच्या दुकानासमोर उभी असताना मुलांसाठी चांदोबा आणि चंपक ही मासिकं मागितली तेव्हा तो दुकानवाला म्हणाला, “ही मासिकं कधीच बंद झाली आहेत.” तेव्हा माझ्या तोंडून सहज वाक्य बाहेर पडले,” मग मुलांनी काय वाचायचे? तो म्हणाला, “मी काय सांगू? त्याचा विचार तुम्ही करा.” घरी आले दोन-तीन दिवस याच विचाराने भारावली गेले आणि बालसाहित्यिकांना, पार्ल्यातील साहित्यिकांना भेटले. त्यांच्यातून मला बऱ्याच जणांनी आम्ही लहान मुलांसाठी लिहू असे सांगितले. मी स्वतः निर्णय घेतला, मुलांसाठी एक छानसं मासिक काढायचं. सर्व चांगल्या कुटुंबातील मुलं इंग्रजी माध्यमात आहेत आणि त्यांच्या आई-बाबांना मुलांना मराठी गोष्टी गाणी ऐकायला, ऐकवायला आवडतं. हा विचार केल्यानंतर इंग्रजी आणि मराठी दोन्हीही माध्यमातील मुलांसाठी ‘चेरीलँड’ नावाचे मासिक सुरू केले आणि ते आधुनिक पालकांना खूप आवडले. एक वर्षभर मासिक चालवल्यानंतर आणि त्याआधी माझे एक पुस्तक प्रकाशित झाले होते, म्हणजेच लिखाणाचा अनुभव होता. चांगल्या, वाईट साहित्याची जाण वाचनाने निर्माण झाली होती, त्यामुळे एक वर्षभर ‘चेरीलँड’ नावाचे मासिक काढले. माझ्या एक गोष्ट लक्षात आली होती, की मला हे काम चांगले जमते, त्यामुळे मोठ्यांसाठी ‘ताऱ्यांचे जग’ नावाचा दिवाळी अंक त्याच वर्षी सुरू केला. ही दोन्हीही शीर्षकं दिल्लीवरून मिळाल्यानंतर एकाच वेळेला सुप्रसिद्ध संगीतकार यशवंत देव यांच्या हस्ते माझ्या प्रकाशनाचे पहिले पुस्तक माझेच ‘मी आहे तिथे’ नावाचा काव्यसंग्रह त्याचबरोबर ‘धम्माल मस्ती’ मुलांसाठी दिवाळी अंक व ‘ताऱ्यांचे जग’ दिवाळी असे प्रकाशित केले.
बी. एड् नंतर एम. ए. केले. त्या वेळेला महत्त्वाचे लेखक कवींच्या विविध साहित्याचा अभ्यास केला गेला आणि पुन्हा वाचनाकडे वळले. त्या वेळेला ना. धों. महानोर, सुरेश भट, इंदिरा संत, नामदेव ढसाळ यांच्या कविता वाचण्यात आल्या आणि आता पीएच.डी. करताना भरपूर साहित्य मी वाचून काढले. मधल्या काळामध्ये अनेक लेखकांची पुस्तके प्रकाशित झाली. वाचन, लेखन, प्रकाशन यामुळे मी साहित्य क्षेत्रामध्ये माझं नाव मिळवू शकले याचा मला सार्थ अभिमान आहे. एकच जाता जाता सांगेन, पालकांनी, शिक्षकांनी मुलांना वाचनाची सवय लहानपणीपासूनच लावली, तर नक्कीच त्याचा मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर चांगला परिणाम होऊ शकतो.

