Saturday, May 2, 2026

इथे सगळेच रंगकर्मी...

इथे सगळेच रंगकर्मी...

राजरंग : राज चिंचणकर

ट्यगृहात सर्वसाधारणतः रंगमंच आणि प्रेक्षागृह, असे दोन भाग असतात. रंगमंचावर रंगकर्मी नाटक सादर करतात आणि प्रेक्षागृहात बसून रसिक त्याचा आस्वाद घेतात; परंतु काही वेळा रंगमंच व प्रेक्षागृह यातली सीमारेषा पुसली जाते आणि नाट्यगृहात सगळेच रंगकर्मी असल्याची अनुभूती येते. आता हे सांगण्यासाठी निमित्त म्हणजे अलीकडेच नाट्यसृष्टीत सुरू झालेला 'नाट्य निरंतर' हा नाट्य विषयक उपक्रम...! 'मराठी नाटक समूह' आणि 'अभिषेक थिएटर्स' यांनी मिळून ही नाट्य चळवळ सुरू केली आहे आणि अल्पावधीतच या उपक्रमाला रसिकांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. प्रायोगिक रंगमंचाच्या कॅनव्हासवर विविधतेने रंगणाऱ्या या उपक्रमात, उपस्थित रसिकही रंग भरतात आणि इथे सगळेच रंगकर्मी असल्याचे रंगलेपन होत जाते.

या उपक्रमाकडे दृष्टिक्षेप टाकताना इथे सादर होणारी कला, रंगमंच आणि प्रेक्षागृह यातली सीमारेषा ओलांडून 'या हृदयीचे त्या हृदयी' अशा पद्धतीने थेट पोहोचत असल्याचे स्पष्ट होत आहे आणि ही या उपक्रमाला मिळालेली पसंतीची पावती आहे. दर महिन्याला खास विषय घेऊन त्यावर रंगकर्मींच्या माध्यमातून नाट्यसदृश आविष्कार मंचित करून घेणे आणि त्यायोगे नाट्यविषयक जाणिवांचे आदानप्रदान होणे, हे या नाट्य चळवळीचे वैशिष्ट्य ठरले आहे. अवघ्या तीन प्रयोगांमध्ये 'नाट्य निरंतर'ची चर्चा नाट्यसृष्टीत सुरू झाली असून, या निमित्ताने प्रायोगिक रंगकर्मींसाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध झाले असल्याचे नाट्यक्षेत्रात बोलले जात आहे. या उपक्रमाला प्रायोगिकतेचे कोंदण असले, तरी या उपक्रमात कार्यकर्त्यांपासून आयोजकांपर्यंत अनेक व्यावसायिक रंगकर्मी सहभागी आहेत. साहजिकच या उपक्रमात कला सादर करणे, हे उदयोन्मुख कलाकारांना महत्त्वाचे वाटू लागले आहे. अलीकडच्या प्रयोगात तर या उपक्रमाचे सत्र युवा रंगकर्मींसाठी राखून ठेवले होते. यात 'नॉट टूडे' (प्रशस्ती कुमुद), 'भ्रमण मंडळ' (ऋषिकेश धामापूरकर), 'लेडी मॅकबेथ' (सायली देशमुख), 'भाव खाऊ' (राजस सुळे), 'अयोध्येची छाया' (प्रणव शेडगे) यांचे एकल नाट्यप्रवेश; 'अशी पाखरे येती' (अभिनय बेर्डे) हे नाट्य अभिवाचन; सीकेटी (स्वायत्त) महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे 'कलाकार' आणि 'सृजन द क्रिएशन'चे 'मनःशांती केंद्रात नटी' ही प्रहसने; 'सारी रात' (सायली देशमुख, प्रतीक शेठ) हा द्विपात्री नाट्यप्रवेश आदी कलाप्रकार सादर झाले. युवा रंगकर्मींची मोठी फळी यात सहभागी झाली होती. थक्क करणारे आविष्कार सादर करत या रंगकर्मींनी 'नाट्य निरंतर'चा उद्देश सफल केला. नजीकच्या काळात ही नाट्य चळवळ अधिक जोमाने कार्य करेल आणि रंगकर्मींना व्यासपीठ मिळवून देण्यात मोठा हातभार लावेल, असे स्पष्ट चित्र दिसून येत आहे.

Comments
Add Comment