मराठी चित्रपटसृष्टीत सतत काही ना काही घडत असते आणि त्यायोगे हे क्षेत्र कायम 'समथिंग हॅपनिंग' या पद्धतीत मोडते. मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एक नवीन ट्रेंड रुळला आहे आणि तो म्हणजे चित्रपटांचे 'सिक्वेल्स'; अर्थात गाजलेल्या चित्रपटाचा दुसरा भाग. एखादा मराठी चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरला की त्याचा सिक्वेल काढायचा, अशी सध्या मराठी चित्रपटसृष्टीत पद्धत सुरू झाली आहे. चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित झाल्यानंतर, साहजिकच त्याची तुलना त्या चित्रपटाच्या पहिल्या भागाशी केली जाते आणि मग कोणता भाग अधिक चांगला, अशा चर्चांनाही उधाण येते. आतापर्यंत आलेल्या काही चित्रपटांचे सिक्वेल्सही गाजलेले आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत सन २०१५ मध्ये एक चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि तो म्हणजे 'देऊळ बंद'. हा चित्रपट प्रदर्शित होताच मराठी सिनेशौकिनांनी तो डोक्यावर घेतला. अध्यात्म आणि विज्ञान यांच्या माध्यमातून फुलणारी कथा, हा या चित्रपटाचा गाभा होता. त्या पद्धतीने ही गोष्ट पडद्यावर मांडण्यात आली होती आणि रसिकांना ती 'अपील' झाली. आजही या चित्रपटाची मोहिनी रसिकांवर कायम आहे. आता ११ वर्षांनंतरही जेव्हा घरातल्या छोट्या पडद्यावर हा चित्रपट लागतो; तेव्हा त्याचा मनसोक्त आनंद रसिक घेताना दिसतात. आता याच 'देऊळ बंद'चा दुसरा भाग; अर्थात सिक्वेल मे महिन्यात प्रदर्शित होऊ घातला आहे. हा 'देऊळ बंद २' सादर करताना 'आता परीक्षा देवाची' असे या चित्रपटाचे सांगणे आहे आणि या 'सब हेडिंग'ने रसिकांची उत्सुकता वाढवली आहे. अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालत श्री स्वामी समर्थ महाराज आणि वैज्ञानिक मंडळी यांच्याभोवती फेर धरणाऱ्या मूळ 'देऊळ बंद' चित्रपटाने रसिकांच्या हृदयात स्थान निर्माण केले होते आणि तेव्हाच या चित्रपटाचा दुसरा भाग यावा, अशी इच्छा अनेकांची होती. याला प्रमाण मानत लेखक व दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी या चित्रपटाचा सिक्वेल काढण्याचे नक्की केले आणि आता तो प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे शीर्षक 'देऊळ बंद २' असे असले, तरी आता हे 'देऊळ' लवकर उघडले जाणार आहे.






