गोष्ट लहान, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर
मानवाच्या आयुष्यात शिक्षणाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. शिक्षण केवळ पुस्तकापुरते मर्यादित नसून, प्रत्यक्ष अनुभवातून मिळणारे ज्ञान अधिक प्रभावी आणि टिकाऊ असते. अशा अनुभवात्मक शिक्षणाचे एक महत्त्वाचे साधन म्हणजे प्रवास होय. प्रवास करताना आपण नवीन ठिकाणे, संस्कृती, भाषा, परंपरा आणि लोक यांचा परिचय करून घेतो. यामुळे ज्ञान वाढतेच, पण दृष्टिकोनही व्यापक होतो. पुस्तकात वाचलेली माहिती प्रत्यक्ष पाहताना अधिक स्पष्ट आणि लक्षात राहणारी होते.
उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीने इतिहासाच्या पुस्तकात किल्ल्यांबद्दल वाचले असेल. पण जेव्हा तो प्रत्यक्ष राजगड किंवा रायगड किल्ला पाहतो, तेव्हा त्याला त्या काळातील वास्तुशैली, संरक्षण व्यवस्था आणि ऐतिहासिक घटना अधिक चांगल्या प्रकारे समजतात. तसेच विज्ञान विषयात शिकलेल्या गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी विज्ञान केंद्र किंवा संग्रहालयाला भेट दिल्यास विद्यार्थ्यांची जिज्ञासा वाढते.
प्रवासामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन, वेळेचे नियोजन, सहकार्यभावना आणि शिस्त या गुणांचा विकास होतो. नवीन लोकांशी संवाद साधताना त्यांचा आत्मविश्वास वाढतो. तसेच, विविध संस्कृतींचा आदर करायला शिकतात. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहलींचे आयोजन करावे. यामुळे विद्यार्थ्यांना आनंद मिळतो आणि शिकण्याची प्रक्रिया अधिक रुचकर होते. पालकांनीही मुलांना प्रवासासाठी प्रोत्साहन द्यावे, कारण प्रवासातून मिळणारे ज्ञान हे आयुष्यभर उपयोगी पडते.
मनुष्याला ज्ञानप्राप्तीसाठी कोणते कोणते मार्ग अवलंबिता येतील सांगताना प्राचीन पंडित यांनी जे अनेक मार्ग सांगितले आहेत त्यापैकी एक म्हणजे ‘केल्याने देशाटन’ माणसाची ज्ञानसंपत्ती वाढते. आधुनिक शिक्षणतज्ज्ञांनी हे तत्त्व मान्य केले आहे आणि आपल्या शिक्षणात ‘प्रवासा’ ला महत्त्व दिले आहे; अभ्यासक्रमात सहलींचा समावेश केला आहे तो यासाठीच असावा.
आजच्या शालेय जीवनात आपण अनेक विषय पाठ्यपुस्तकातून शिकतो. इतिहासातील घटना आपल्याला शिक्षक सांगतात वा इतिहासातील ते प्रसंग आपण वाचतो; पण त्यामुळं ते प्रसंग आपल्या डोळ्यांसमोर नीटसे उभे राहत नाहीत. मात्र पराक्रम लक्षात येण्यासाठी तत्कालीन ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या पाहिजेत. कारण घडलेला ऐतिहासिक प्रसंग नजरेसमोर साकार करण्याचे सामर्थ्य निश्चितच स्थानांत असते.
भूगोल या विषयाच्या अभ्यासासाठी ‘प्रवास’ हे एक अत्यावश्यक साधन आहे. कोणत्याही स्थळाची निव्वळ माहिती होण्यासाठी ते स्थळ प्रत्यक्ष पाहणे केव्हाही चांगले; परंतु रोजच्या अभ्यासात आपल्याला ते शक्य नसते आणि मग बऱ्याचशा गोष्टी आपण दुसऱ्यांच्या अनुभवावरून ठरवितो. त्याकरिता दुसऱ्यांनी केलेली प्रवासवर्णने वाचावी.
काहींची वृत्ती पहिल्यापासून प्रवासाला विशेष अनुकूल नाही. त्यातल्या त्यात ‘जलप्रवास’ – ‘समुद्रपर्यटन’. दुसरेही एक कारण असे होते की, दळणवळणाची साधने नसल्यामुळे आवश्यक असेल तेव्हाच मनुष्य प्रवासाला निघे. बऱ्याच आयुष्याचा उत्तरार्धाला लागलेली माणसे देवदर्शनासाठी प्रवासास बाहेर निघत; परंतु आता या परिस्थितीत फरक पडला आहे. दळणवळणाची साधने विपुल असून आता ती सोयीची आणि सर्वसामान्य झाली आहेत. त्यामुळे प्रवासाची आवड वाढली आहे.
पुण्यातील काही विद्यार्थ्यांनी इंग्लंडपर्यंत आपल्या सहकाऱ्यांसह प्रवास केला आहे. त्यांनी प्रवासातील आपले अनुभव सर्वांना कळविले आहेत. प्रवास हे माणसाच्या धाडसी वृत्तीला आव्हानच ठरते याचा त्यांना अनेकदा अनुभव आला. प्रवासामुळे देश तसंच भौगोलिकदृष्ट्या माहितीचे होत नाहीत, तर त्या देशांतील लोकांची इतरही माहिती कळते. आपल्या भारतात अनेक राज्ये आहेत. या राज्यांतील लोकांचा पोशाख, रीतीभाती, अन्न, धर्म, सण यात केवढी विविधता आहे! प्रवासाने आपण या विविधतेची मजा प्रत्यक्ष अनुभवू शकतो.
प्रवासात मानवी मनालाही अनेक गोष्टींचे शिक्षण मिळते. आपल्या स्वभावालाही आपण मुरड घालू शकतो. इतरांशी कसे जुळवून घ्यावे ते आपणास प्रवासात कळते. इतरांच्या दुःखात, अडचणीत आपण सहभागी होऊ शकतो. त्याचप्रमाणे दुसऱ्यांच्या आनंदाने आनंदी कसे व्हावे ते शिकतो.
प्रवास निसर्गाच्या उदारतेची ओळख करून देतो, त्याचप्रमाणे मानवी कर्तृत्वाचे दर्शन घडवितो. प्रवासामुळेच वास्को-द-गामाला भारत आणि कोलंबसला अमेरिका सापडली. प्रवासाच्या या आवडीमुळेच मानव चंद्रलोकापर्यंत गेला व आता तर तो मंगळापर्यंत जाण्याचे बेत आखू लागला आहे. प्रवास हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून, तो एक प्रभावी शिक्षणाचा मार्ग आहे. “जग हेच एक मोठे पुस्तक आहे” असे म्हटले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तसेच सर्वांनीच अधिकाधिक प्रवास करून अनुभवातून शिकण्याचा प्रयत्न करावा.






