मुंबई: भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी मुंबईतील सर्व सार्वजनिक, शासकीय तसेच खासगी विहिरी आणि कूपनलिकांची अद्ययावत माहिती तातडीने जमा करून त्यांची कार्यस्थिती तपासण्याचे निर्देश मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी दिले आहेत. सन २००९ मध्ये अल्प पर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या काळात महानगरपालिकेने सार्वजनिक वापराच्या विहिरींची दुरुस्ती करून नागरिकांना पाणी उपलब्ध करून दिले होते. त्या धर्तीवर सद्यस्थितीत सर्व विहिरींची कार्यक्षमता तपासून, ज्या विहिरी तात्काळ कार्यान्वित करता येऊ शकतात, त्यांना प्राधान्याने सुरू करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी करावी अशा सूचना महापौरांनी केल्या आहे. शिवाय याचे पाणी केवळ बागकाम किंवा स्वच्छतेपुरता मर्यादित वापर न ठेवता, चाचण्यांच्या आधारे या विहिरींमधून सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा कितपत वापर करता येईल, याचाही अभ्यास करून त्यानुसार नियोजन करावे, असेही निर्देश महापौर तावडे यांनी दिले आहेत.
उन्हाळ्याची वाढती तीव्रता, जलसाठ्यांवरील वाढता ताण तसेच पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांकडून प्राप्त होत असलेल्या तक्रारींची दखल घेत, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी महानगरपालिका जल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत सविस्तर चर्चा केली आहे. सद्यस्थितीत उपलब्ध जलसाठ्याचे सुयोग्य व्यवस्थापन करून मुंबईकरांना अखंडित व सुरळीत पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी अधिक परिणामकारक उपाययोजना राबविण्याचे निर्देशही महापौरांनी दिले आहेत.
मुंबईतील वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची मागणी सातत्याने वाढत आहे. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पर्जन्यमानातील अनिश्चितता लक्षात घेता पाणीपुरवठा व्यवस्थापन अधिक शाश्वत व बहुआयामी पद्धतीने करणे अत्यावश्यक झाले आहे. त्यातच, सद्यस्थितीत उन्हाळ्याची तीव्रता देखील वाढू लागली आहे. या अनुषंगाने, पारंपरिक जलस्त्रोतांचे पुनरुज्जीवन, पर्यायी जलस्रोतांचा शोध तसेच नागरिकांच्या सक्रिय सहभागाद्वारे पाणी बचत व संवर्धनासाठी व्यापक प्रयत्न करण्यावर भर देण्याची आवश्यकता महापौरांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, मुंबईतील पाण्याच्या वाढत्या मागणीचा विचार करता, खासगी गृहनिर्माण संस्थांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवून प्रशासनास सहकार्य करणे आवश्यक आहे. गृहनिर्माण संस्थांनी त्यांच्या परिसरातील विहिरी व कूपनलिकांची नियमित देखभाल, दुरुस्ती व स्वच्छता करून आवश्यक त्या जलशुद्धीकरण यंत्रणा बसवाव्यात. तसेच भूजलाचा उपसा करताना तो नियमानुसार व शाश्वत मर्यादेत राहील, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी पावसाच्या पाण्याचे संकलन व पुनर्भरण (रेन वॉटर हार्वेस्टींग) ही अत्यंत महत्त्वाची उपाययोजना असून, सर्व गृहनिर्माण संस्थांनी आपल्या परिसरात अशी यंत्रणा कार्यान्वित करावी. यामुळे भूजल पातळी स्थिर राखण्यास मदत होईल तसेच दीर्घकालीन जलसुरक्षेसाठी हा उपाय प्रभावी ठरेल, असे आवाहन महापौर तावडे यांनी केले आहे.
महापौरांच्या इमारतीत रेन वॉटर हार्वेस्टींग, मुंबईकरांना त्यांनी केले आवाहन
"घाटकोपर येथे मी राहत असलेल्या गृहनिर्माण संकुलामध्ये पावसाचे पाणी पुनर्भरण करणारी यंत्रणा, कूपनलिकेचे पाणी पिण्यायोग्य शुद्ध करून सर्व सदनिकांमध्ये पुरवठा करणारी यंत्रणा, हे सर्व आधीपासूनच कार्यान्वित केले आहे. त्याचे अनुकरण इतरांनीही करावे," असे आवाहन महापौर तावडे यांनी केले आहे.
पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी करावयाचे प्रयत्न हे सर्वसमावेशक स्वरूपाचे असणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासनासोबत नागरिक, गृहनिर्माण संस्था व उद्योग क्षेत्र यांचा समन्वयित सहभाग आवश्यक आहेअसेही त्यांनी आवाहन केले आहे.






