Wednesday, August 5, 2026

Amruta Khanvilkar Himanshu Malhotra : अमृता खानविलकर आणि हिमांशू मल्होत्रा यांच्यात बिनसलं? १८ महिन्यांपासून राहतात वेगळे; ११ वर्षांच्या संसारानंतर काडीमोड घेणार ?

Amruta Khanvilkar Himanshu Malhotra : अमृता खानविलकर आणि हिमांशू मल्होत्रा यांच्यात बिनसलं? १८ महिन्यांपासून राहतात वेगळे; ११ वर्षांच्या संसारानंतर काडीमोड घेणार ?

मुंबई : ग्लॅमर आणि झगमगाटाने वेढलेल्या सिनेसृष्टीतील कलाकारांचे वैयक्तिक आयुष्य खरोखरच तितके सुखी आणि चमकदार असते का? असा प्रश्न सध्या पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्याला कारणही तसेच आहे, ते म्हणजे सेलिब्रिटी जोडप्यांच्या घटस्फोटाचे दिवसेंदिवस वाढणारे प्रमाण. कामाचा प्रचंड ताण, शूटिंगचे व्यग्र वेळापत्रक, सोशल मीडियावरील सततची नजर आणि वैयक्तिक आयुष्यातील मतभेद यामुळे गेल्या काही वर्षांत अनेक लोकप्रिय सेलिब्रिटींचे संसार मोडले आहेत. काहींनी लग्नानंतर अनेक वर्षांनी वेगळे होण्याचा मार्ग निवडला, तर काहींनी सुरुवातीलाच आपापल्या वाटा वेगळ्या केल्या. आता याच मालिकेत मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील आणखी एका लोकप्रिय जोडप्याचे नाव जोडले जाण्याची शक्यता निर्माण झाली असून चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मराठी चित्रपटसृष्टीची 'चंद्रमुखी' म्हणजेच अभिनेत्री अमृता खानविलकर आणि तिचा पती, अभिनेता हिमांशू मल्होत्रा यांच्या वैवाहिक आयुष्यात दुरावा आल्याच्या चर्चांनी सध्या चांगलाच जोर धरला आहे. एकेकाळी सिनेसृष्टीतील ‘पॉवर कपल’ म्हणून ओळखले जाणारे हे जोडपे आता थेट घटस्फोटाच्या उंबरठ्यावर उभे असल्याचे बोलले जात आहे.

व्लॉग्समधून हिमांशू गायब आणि चाहत्यांच्या शंका

अमृता आणि हिमांशू यांच्यात दुरावा आल्याच्या बातम्या यापूर्वीही अनेकदा समोर आल्या होत्या. मात्र, आता हे प्रकरण केवळ औपचारिक चर्चेपुरते मर्यादित राहिलेले नसून ते विभक्त होण्याच्या मार्गावर असल्याचे म्हटले जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून हे दोघेही एकमेकांपासून वेगळे राहत असून, अमृताच्या कोणत्याही सोशल मीडिया व्लॉगमध्ये हिमांशू कुठेही दिसत नाही. चाहत्यांनीही या गोष्टीची नोंद घेत कमेंट्सद्वारे अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तरीही, या संपूर्ण वादावर किंवा घटस्फोटाच्या बातम्यांवर अमृता किंवा हिमांशू या दोघांनीही अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

नक्की काय आहे या नात्याचे सत्य?

अमृता आणि हिमांशू ११ वर्षांच्या संसाराचा काडीमोड घेणार अशा चर्चा रंगल्या असतानाच, त्यांच्या जवळच्या सूत्रांनी यावर एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. प्राप्त माहितीनुसार, दोघांनीही अजून अधिकृतपणे घटस्फोट घेतलेला नाही. ते अजूनही एकमेकांशी जोडलेले आहेत; परंतु त्यांनी परस्पर संमतीने आणि विचारांती काही काळ 'वेगळे राहण्याचा' (Trial Separation) निर्णय घेतला आहे. दोघांच्या कामाचे स्वरूप, वेगवेगळ्या शहरांमधील शूटिंगच्या वेळा आणि आपापल्या कुटुंबांप्रती असलेल्या वैयक्तिक जबाबदाऱ्यांमुळे त्यांना हा निर्णय घ्यावा लागला आहे. वेगळे राहत असूनही त्यांच्यातील मैत्री आणि संवाद आजही कायम आहे. वैयक्तिक तसेच व्यावसायिक आयुष्यातील निर्णय घेताना ते आजही एकमेकांचा सल्ला घेतात. सध्या ते या नात्याला आणि एकमेकांना पुरेसा वेळ देत असून, भविष्यात पुन्हा एकत्र राहायचे की अधिकृतपणे विभक्त व्हायचे, याचा अंतिम निर्णय ते येणारा काळच ठरवेल असे सांगण्यात येत आहे.

उर्मिला कानेटकर आणि आदिनाथ कोठारे यांच्याही वाटा वेगळ्या

दरम्यान, मराठी सिनेसृष्टीतील आणखी एका प्रसिद्ध जोडप्याने काही दिवसांपूर्वीच आपल्या लग्नाला पूर्णविराम दिला आहे. ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांचा मुलगा आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री उर्मिला कानेटकर यांनी कायदेशीररीत्या घटस्फोट घेतला आहे. अनेक वर्षांच्या सुखी संसारानंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. या दोघांना एक मुलगी असून, त्यांच्या घटस्फोटाच्या बातमीनेही चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. आता अमृता आणि हिमांशूच्या बाबतीत काय घडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा