Wednesday, August 5, 2026

Dabur India FSSAI action : डाबर इंडियाला FSSAI चा मोठा दणका! ‘१००% शुद्धतेचे’ दावे करणाऱ्या मध, तुपासह अनेक उत्पादनांच्या विक्रीवर बंदी

Dabur India FSSAI action : डाबर इंडियाला FSSAI चा मोठा दणका! ‘१००% शुद्धतेचे’ दावे करणाऱ्या मध, तुपासह अनेक उत्पादनांच्या विक्रीवर बंदी

नवी दिल्ली : ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि दाव्यांविरोधात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) आक्रमक भूमिका घेतली आहे. अन्न नियामकाने प्रसिद्ध एफएमसीजी (FMCG) कंपनी 'डाबर इंडिया'वर (Dabur India) कठोर कारवाई करत, लेबलवर ‘१००%’ असल्याचा दावा करणाऱ्या त्यांच्या विविध खाद्य उत्पादनांची विक्री तत्काळ थांबवण्याचे कडक निर्देश दिले आहेत. FSSAI च्या या धडक कारवाईमुळे डाबरच्या मध, गाईचे तूप, नारळाचे दूध यांसारख्या अनेक प्रमुख उत्पादनांना मोठा फटका बसला आहे.

‘१००%’ दावे ठरले दिशाभूल करणारे

FSSAI ने दिलेल्या माहितीनुसार, डाबर कंपनी आपल्या उत्पादनांच्या पॅकेजिंगवर आणि जाहिरातींमध्ये ‘१००%’ शुद्धतेचा दावा करत होती. यामध्ये अन्न सुरक्षा आणि मानक (जाहिरात आणि दावे) नियम, २०१८ चे थेट उल्लंघन झाल्याचे आढळून आले आहे. FSSAI च्या मते, असे ‘१००%’ चे दावे अत्यंत अस्पष्ट असून त्यांची शास्त्रीय पडताळणी करता येत नाही; त्यामुळे सामान्य ग्राहकांची दिशाभूल होण्याची मोठी शक्यता असते. नियामकाने स्पष्ट केले की, यापूर्वीही डाबरला अशा प्रकारे दिशाभूल करणारे दावे तात्काळ थांबवण्याबाबत अधिकृत नोटिसा बजावण्यात आल्या होत्या, तरीही नियमांचे पालन न झाल्याने अखेर विक्री थांबवण्याचे कडक आदेश देण्यात आले आहेत.

‘ऑरगॅनिक इंडिया’ लोगोचा अनधिकृत वापर

FSSAI ने आपल्या सोशल मीडिया (Instagram) पोस्टद्वारे या कारवाईची अधिकृत माहिती दिली आहे. डाबरने आपल्या वेबसाईटवर आणि लेबलवर ‘१००% नैसर्गिक’, ‘१००% शुद्ध’, ‘१००% सेंद्रिय’ आणि ‘१००% कोवळ्या नारळाचे पाणी’ असे अनेक दावे केले होते. विशेष म्हणजे, डाबरच्या 'हिमालयन ऑरगॅनिक ॲपल सायडर व्हिनेगर' आणि 'डाबर ऑरगॅनिक मध' या प्रॉडक्ट्सवर ‘ऑरगॅनिक इंडिया’ (Organic India) चा लोगो वापरण्यात आला होता. FSSAI नुसार, हा अनधिकृत वापर अन्न सुरक्षा आणि मानके (सेंद्रिय अन्न) नियम, २०१७ चे उल्लंघन ठरतो. त्यामुळे या सर्व दिशाभूल करणाऱ्या खाद्य उत्पादनांची विक्री रोखून, डाबरला १५ दिवसांच्या आत केलेल्या कारवाईचा अहवाल (Action Taken Report) सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

डाबरचे स्पष्टीकरण : ‘गुणवत्तेचा प्रश्न नाही, labels मध्ये सुधारणा सुरू’

FSSAI च्या कारवाईनंतर डाबर इंडियाने शेअर बाजाराला (BSE/NSE) पत्र लिहून आपली बाजू स्पष्ट केली आहे. कंपनीने दावा केला आहे की, हा वाद उत्पादनांची गुणवत्ता किंवा सुरक्षेबाबत नसून केवळ पॅकेजिंगवरील शब्दांच्या अर्थाशी संबंधित आहे. तथापि, एक जबाबदार आणि प्रस्थापित कंपनी म्हणून FSSAI ने आक्षेप घेतलेले ‘१००%’ चे सर्व दावे आपल्या उत्पादनांचे लेबल्स, जाहिराती आणि अधिकृत वेबसाईटवरून हटवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे डाबरने स्पष्ट केले आहे. FSSAI ने डाबरसारख्या बलाढ्य ब्रँडवर केलेली ही कारवाई देशातील इतर अन्न उत्पादकांसाठी एक मोठा इशारा मानली जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >