Thursday, March 27, 2025
Homeसाप्ताहिककोलाजस्माईल प्लिज...

स्माईल प्लिज…

हलकं-फुलकं – राजश्री वटे

खिंच मेरी फोटो’’…
हे सिनेमातील गाणं रेल्वे स्टेशन, मार्केट आणि बऱ्याच ठिकाणी शूट केले आहे… पण हे नुसते सिनेमांतच दिसत नाही, तर जिकडे पाहावे तिकडे जो तो मोबाईलमध्ये फोटोच काढतांना दिसतो… कारण आता चोवीस तास हातात मोबाईल असतो प्रत्येकाच्या…

सेल्फी, स्टेटस, डीपी, फेसबुक, इंस्टाग्राम आणि काय काय… जिकडे तिकडे फोटो टाकायला जागा उपलब्ध झाली आहे… नुसते टाकायलाच नव्हे, तर दुसऱ्याचे बघायला सुद्धा!! त्यावरून कोण कुठे फिरत आहे, काय खरेदी केले आहे, कुठे पार्टी करत आहे याची माहिती दुसऱ्याला कळली पाहिजे… पण ही माहिती चुकीच्या ठिकाणी पण जाते बरं का! याचे परिणाम पोटदुखी होते… मी पण आता असंच करणार म्हणून धडपड… इतकी चढाओढ वाढली आहे की ज्याचं नाव ते!!
जमिनीपासून आकाशापर्यंत… तर पाण्यापासून डोंगरापर्यंत कुठून कुठे रील बनवत जायचे… त्यांना
“इनफ्लूएन्सर’’ म्हटलं जातं. मीडिया तर अग्रेसर… या फोटोच्या नादात… अहो, काय सांगायचं, मारामारी, अपघात यासारख्या प्रसंगाचे पण मदत करण्याआधी व्हीडिओ काढले जातात… आता काय म्हणावे बरे?
पूर्वी बरे होते… ब्लॅक अँड व्हाईट फोटो काढले की झालं, आता तर फोटो काढण्याच्या किती तऱ्हा… असता त्यापेक्षा वेगळंही दिसता येतं!

लग्न कार्यात तर विचारू नका! किती फोटोग्राफर अन् किती फोटो… नुसती धूम… भटजी ताटकळत राहिले तरी चालतील… आधी फोटो!! आता तर प्री-वेडींग शूट असते… कानाकोपऱ्यात जाऊन वेगवेगळ्या थीम घेऊन व त्याप्रमाणे पोजेस घेऊन फोटो काढणे…
एक दिव्य त्या फोटोग्राफरचे! त्यांनाही नवीन कल्पना करून फोटो काढावे लागतात तरच त्यांची डिमांड वाढते. सेल्फीच्या नादात तर… तोंडाचा चंबू करून (हसू नका), वाकडी मान करून फोटो काढतात… पण कित्येकदा अंगाशी येतं… जीवसुद्धा गमावला आहे… काय करणार? अरे, दोन दिवस लोकं तो फोटो पाहतात, कमेंट्स करतात पण त्यासाठी जीवाची बाजी लावायची…
कमाल करतात!

“ दिसते मी भारी दादा, फोटो माझा काढ’’…
असं म्हणत काय काय, कुठे कुठे अन् किती किती…
विचारायलाच नको…!
आणि गंमत कशी असते, एक जण फोटोला उभा राहतो, मग दुसरा ‘मी पण’ म्हणत येऊन उभा राहतो, मग तिसरं… मग चौथं… एकाचा फोटो काढता काढता कॅमेरात मावणार नाही एवढे जमा होतात… मुख्य कार्यक्रमात कोणाला इंटरेस्ट नसतो… स्वतःच्या फोटोत बिझी होऊन जातात!
पण काही असो… फोटोग्राफीसुद्धा एक सुंदर कला आहे, प्रोफेशन आहे… फोटोत सुंदर दाखवणं ही फोटोग्राफरची कमाल आहे, समोरच्याला खूष करावं लागतं… त्यातच त्याचं कसब दिसतं!
मग काय जळी, काषठी, पाषाणी म्हणत राहायचं…
“ तू खिंच मेरी फोटू’’…

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -