- कथा; रमेश तांबे
माझं बालपण मुंबईतल्या एका कोळीवाड्यात गेलं. तिथं मिलमध्ये काम करणाऱ्या लोकांची प्रामुख्याने वस्ती होती. स्थानिक कोळी समाज आणि घाटावरचा मराठा समाज गुण्यागोविंदाने राहत होता. गरीब, निम्न मध्यमवर्गीय लोकांची वस्ती. सण-उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे करणारी बरीचशी तरुण मंडळी व्यसनांच्या अधीन झालेली! एकूणच शिक्षणाचे प्रमाण कमी आणि मानवी आयुष्य कसं जगायचं याबद्दल बऱ्यापैकी अज्ञान अशा वातावरणात आम्ही गावावरून येऊन तिथे राहू लागलो होतो.
लवकरच माझी समवयस्क मुलांशी मैत्री झाली. त्यावेळी घरोघरी मुलांची संख्या बऱ्यापैकी जास्त असायची. काही मुलांना क्रिकेट हा खेळ आवडायचा, तर काहींना वेड पत्ते खेळण्याचे. या सर्वांना माझा पहिल्यापासूनच नकार होता. कदाचित आईचा धाक त्यासाठी कारणीभूत असावा असं मला वाटतं. मग माझी गट्टी जमली गप्पा मारणाऱ्या, अभ्यास करणाऱ्या मुलांशी. मला आठवतंय मी पाचवी-सहावीत असेन. आम्हा चार-पाच मित्रांना गोष्टींची पुस्तकं वाचण्याची भारी हौस होती. त्यावेळी ‘चांदोबा’ हे मासिक मुलांमध्ये फार लोकप्रिय होते. पण ते विकत घेऊन वाचण्याची ऐपत कोणाचीच नव्हती. कारण त्याकाळी दोन रुपयांत मिळणारा ‘नवाकाळ’ हासुद्धा आठवड्यातून दोनदाच घरी यायचा. एकूणच पैसे खर्च करून वाचन केले पाहिजे ही धारणा घराघरातून नव्हती किंवा तशी आर्थिक परिस्थितीही नव्हती.
आमच्या वस्तीत दोन-चार गुजरात्यांची दुकाने होती. कोण किराणामाल विकणारा, तर कुणाचं पुस्तकाचं दुकान, कोण मेडिकलवाला तर कोण हार्डवेअरवाला. सारेच गुजराती भाषिक, पण उत्तम मराठी बोलणारे. पुस्तकाचं दुकान एक जाडा व्यक्ती चालवायचा म्हणून त्याला सगळे ‘जाड्यावाणी’ म्हणायचे. आम्ही मित्र नेहमी त्याच्या दुकानातून वह्या, पुस्तके, पेन-पेन्सिली विकत घ्यायचो. तेव्हा गोष्टींची पुस्तकं वाचण्यासाठी आम्ही मित्रांनी एक फंड तयार केला होता. प्रत्येकाने महिन्याला एक रुपया काढायचा आणि त्याची पुस्तके आणायची. त्या वेळी राक्षस-परींची आणि भुता-खेतांची छोटी छोटी गोष्टींची पुस्तके तीन रुपयांत मिळत असत आणि अशा पुस्तकांचा आम्ही मित्रमंडळी पंधरा-वीस मिनिटांत फडशा पडत असू.
मग त्यातूनच आम्हाला एक युक्ती सुचली. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या मुलांनी जाऊन पुस्तक विकत घ्यायचे. आणि मग त्या पुस्तकाचे सामुदायिक वाचन करून पाच-सहा मिनिटांतच पुस्तक संपवायचे. पुस्तक वाचून होताच धावत पळत जाऊन ते पुस्तक वाण्याला परत करायचे. “अरे हे तर वाचलेले पुस्तक आहे, बदलून दुसरे दे म्हणायचे!” मग जाड्या वाणीदेखील आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला नवीन पुस्तक द्यायचा. अशा प्रकारे आम्ही जवळजवळ तीसेक पुस्तके सहज वाचली असतील, अगदी फुकटात...!
पण एके दिवशी आमची ही बनवेगिरी मात्र पकडली गेली. मी स्वतः ‘गुहेतला राक्षस’ या पुस्तकाचं दहा मिनिटांत वाचन संपवून, हे पुस्तक वाचलेलं आहे, ते बदलून द्या म्हणून ‘जाड्या वाण्याकडे’ गेलो. मुले रोज पुस्तके बदलून का नेतात, याचा त्याला दाट संशय आलाच होता. त्यादिवशी नेमका मीच सापडलो. त्याने ते पुस्तक काळजीपूर्वक तपासले असता त्याला पुस्तकाच्या अनेक पानांना शाईचे डाग लागलेले दिसले. त्याने चटकन माझा हात पकडला आणि तो माझी बोटे बघू लागला, तर माझे हात शाईनेच बरबटलेले होते. “काय रे? पुस्तक वाचून परत आणता आणि दुसरे घेऊन जाता. मला फसवता का? शाळेत हेच शिकता का?” असे म्हणून त्यांनी माझ्या डोक्यात एक टपली मारली. मी तसाच त्याचा हात झटकून दुकानातून पळून गेलो.
मग आमच्या कट्ट्यावर जाऊन सारी हकीगत मी माझ्या मित्रांना सांगितली. तेव्हापासून आमच्या गोष्टी वाचनाला खीळ बसली ती कायमचीच! त्यानंतर घरी येणारे ‘नवाकाळ’ हे वर्तमानपत्र नजरे खालून काढणे एवढेच वाचन राहिले. पुढे अभ्यासाच्या नादात आणि घरातल्यांच्या भीतीपोटी माझी गोष्टींची पुस्तके वाचणे कायमचेच बंद झाले. पण लहानपणीचा हा वाचन संस्कार तरुण वयात पुन्हा एकदा उफाळून वर आला. आता दर आठवड्याला एक पुस्तक विकत घेऊन रोज वाचन करण्यापर्यंतची प्रगती मी साधलेली आहे. “नित्य भोजनम्, नित्य वाचनम्” हा तर माझ्या जीवनाचा मंत्रच बनला आहे.






