महाभारतातील मोतीकण - भालचंद्र ठाकूर
पृथ्वीवरील जीव अनेक प्रकारची कर्मे करतो. कर्माचेही सात्त्विक राजस व तामस असे प्रकार आहेत. त्यांना अनुसरून त्यांना मिळणाऱ्या नरक यातनातही फरक असतो. श्रीमद्भागवतात नरकांचे प्रकार व त्यानुसार मिळणाऱ्या नरक यातनांची माहिती आहे. यमलोकाची देवता यमराज मनुष्याच्या मृत्यूनंतर जीवात्म्याला त्याच्या बऱ्या वाईट कर्मानुसारत्याच्याशी संबंधित नरकात आपल्या कर्माची फळे भोगण्यासाठी पाठवितात.नरकांचे काही प्रकारनरकांचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी भागवतानुसार नरकाचे काही २८ प्रकार पुढील प्रमाणे आहेत. तामिस्त्र, अंधतामिस्त्र, रौरव, महारौरव, कुंभीपाक, कालसूत्र, असिपत्रवन, सुकरमुख, अंधकूप, कृमीभोजन, सदंश, तप्तसुर्मी, वज्रकंटकशाल्मली, वैतरणी, पूयोद, प्राणरोध, शासन, लालाभक्ष, सारमेयादन, अवीची, अय:पान, तसेच क्षारकर्दम, रक्षोगणभोजन, शूलप्रोत, दन्दशुक, अवटनिरोधन, पर्यावर्तन व सूचिमुख अशा प्रकारचे नरकांचेही काही प्रकार आहेत. नारद पुराणत नरकांचे काही प्रकार सांगितले आहेत. नरक यातना इतरांची धन चोरी करणे, संतान किंवा स्त्रियांचे अपहरण करणे, अशांना यमदूत तामिस्त्र नावाच्या नरकात पाठवितात. त्या ठिकाणी त्याला मारहाण करणे, भीती दाखवणे, आदी पिडा दिल्या जातात. त्यामुळे तो मुर्छित होतो. दुसऱ्याच्या स्त्रीचा उपभोग घेणाऱ्याला अंधतामिस्त्र नावाच्या नरकात पाठविले जाते. तेथील मिळणाऱ्या वेदनामुळे तो मूर्छित होतो. त्याला काहीच कळत नाही म्हणून त्याला अंधता मिस्त्र म्हणतात. माझे माझे असे करून दुसऱ्यांचा द्वेष करणारा रौरव नरकात जातो. या पृथ्वीवर ज्याने इतरांना तसेच प्राण्यांना कष्ट दिले, ते सर्व प्राणी या ठिकाणी रुरु नावाच्या सापापेक्षा क्रूर रूपात त्या जिवात्म्याला त्याच प्रकारचे कष्ट देतात. पशुपक्ष्यांची हत्या करून त्यांना शीजवून खाणाऱ्यांना यमदूत कुंभीपाक नावाच्या नरकात पाठवितात. तेथे त्याला उकळत्या तेलात शिजविले जाते. माता पिता तसेच ब्राह्मण यांना त्रास व कष्ट देणाऱ्याला कालसूत्र नरकात टाकल्या जाते. येथे गरम तांब्याच्या मैदानात त्याला पळविले जाते. विना आपत्ती आपला स्वतःचा वैदिक धर्म सोडून अन्य धर्मात जाणाऱ्यांना यमदूत असिपत्रवन नरकात नेतात व चाबकाने मारतात हा मार वाचविण्यासाठी तो जीव झाडातून पळतो. तेव्हा तलवारी सारखे पाते असलेल्या त्या झाडांच्या पानांमुळे त्याचे तुकडे तुकडे होतात. तेव्हा तो वेदनेने मेलो मेलो ओरडत बेशुद्ध पडतो. निरपराध माणसाला तसेच ब्राह्मणाला त्रास देणारा राजा अथवा राजाचा सेवक सुकरमुख नावाच्या नरकात टाकला जातो. यात त्याला उसाच्या चरख्यात टाकून वेदना देतात. या भुतालावर डास, माशा, उवा, ढेकूण यांना ईश्वरानेच दुसऱ्याचे रक्त पिऊन उपजीविका करावयास सांगितले आहे. त्यामुळे आपण दुसऱ्यांना कष्ट देतो याचे त्यांना भान नसते. मात्र अशा प्राण्यांना मारून त्यांना कष्ट देणाऱ्या मनुष्याला मात्र याचे ज्ञान असते म्हणून अशांची हत्या करणाऱ्याला अंधकूप नावाच्या नरकात जावे लागते. तेथे त्याने त्रास दिलेले हे जीव त्याला सर्व बाजूंनी चावतात व त्यांच्यापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी सुरक्षित जागा न मिळाल्याने हा जीव तडफडत राहतो. भूतदया न करणाऱ्याला कृमीभोजन नरकात जावे लागते. या ठिकाणी एका लांबरुंद किड्यांच्या कुंडात त्याला टाकतात आणि त्याच्या पापाचे पूर्ण प्रायश्चित्त होईपर्यंत किडे त्याला चावतात व त्याला किडेच खावे लागतात. या भुलोकवर चोरी करणाऱ्यांना संदेश नरकात टाकले जाते. तिथे त्याला गरम लोखंडी गोळ्यांनी चटके देतात व चिमट्याने कातडी उपटतात. व्यभिचार करणाऱ्यांना तप्तसूर्मी नरकात जावे लागते. येथे तापलेल्या लोखंडी स्त्री-पुरुषांच्या पुतळ्याला कर्माप्रमाणे अलिंगन करवितात. पशु बरोबर संभोग करणाऱ्यांना मृत्यूनंतर वज्रकंटक-शाल्मली नरकात टाकतात व काटेरी झुडपावर चढवून ओढतात. या भूलोकावर उच्च कुळात जन्म घेऊनही जे धर्म मर्यादेचे उल्लंघन करतात त्यांना नरकाचा खंदक समजल्या जाणाऱ्या वैतरणी नदीत टाकतात. या नदीत मलमूत्र, पू, रक्त, केस, हाडे, चरबी, इत्यादी घाणेरड्या वस्तू भरलेल्या असतात. निती संमत आचार विचारांचा त्याग करणारा तसेच शूद्र स्त्रीशी संबंध ठेवणाऱ्यांना मूत्र, विष्टा, कफ लपूने भरलेल्या पूयोद नामक नरकात टाकतात व अशाच वस्तू त्याला खाव्या लागतात. इतरांच्या घरांना आगी लावून त्यांना लुटणारे, व्यापाऱ्यांना लुटणारे, इतरांना विष देणारे अशांना सारमेयादन नावाच्या नरकात वज्रासारख्या दाढा असणारे यमदूत कुत्री बनवून चावतात. खोटे बोलणारे अथवा खोटे बोलून दानधर्म घेणारे अविचीमान नामक नरकात जातात. तिथे दगडी जमीन काचेप्रमाणे दिसते म्हणून याला अवीचीमान नरक म्हणतात. येथे त्या जीवाला उंच पहाडावरून खाली डोके वर पाय असे करून वारंवार सोडले जाते. मद्यपान करणाऱ्याला अय:पान नरकात यमदूत नेऊन त्याच्या तोंडात उकळता लोखंडी रस टाकतात. जो आपल्या वरिष्ठांचा आदर करीत नाही त्याला यमदूत क्षारकर्दम नावाच्या नरकात उलटे टाकतात. जे लोक नरवळी राक्षस, भैरव आदींची पूजा करतात त्यांना रक्षोगणभोजन नरकात बळी गेलेले पुरुष कसायाप्रमाणे त्यांचे हात पाय तोडून त्यांचे रक्त पितात. जे लोक पशुपक्ष्यांना पकडून त्यांना दोरीने बांधून काट्यांनी टोचून खेळ करतात, त्यांना शुलप्रोत नावाच्या नरकात यमदूत शुळांनी टोचतात. तसेच कंक व वटवाघुळसारखे पक्षी तीक्ष्ण चोचीने त्यांना टोचतात तेव्हा आपण केलेली पापी त्यांना आठवतात. जे रागीट पुरुष इतरांना पिडा कष्ट देतात त्यांना चंद्रशुक नामक नरकात अनेक तोंडे असणारे सर्प उंदराप्रमाणे गिळतात. इतरांना अंधाऱ्या खड्ड्यात, गुहेत टाकणाऱ्यांना यमदूत यमलोकात अशाच ठिकाणी टाकून विषारी आगीच्या धुरात घुसमवटतात म्हणून त्या नरकाला अवटनिरोधन असे म्हणतात. घरी आलेल्या अतिथी अथवा पाहुण्याकडे रागाने पाहणाऱ्यांना पर्यावर्तन नावाच्या नरकात कंक कावळे होले सारखे पशुपक्षी कठोर चोचीने टोचून त्यांचे डोळे काढून घेतात. पैशाच्या धुंदीत इतरांना तुच्छ मानणारा, त्यांच्यावर संशय घेणारा, स्वतःच्या धनाची कंजूसीने रक्षण करणारा व पैशासाठी निरनिराळे पाप कृत्य करणारा सूचीमुख नरकात जातो. तेथे अर्थपिशाच त्याचे शरीर शिंप्याप्रमाणे सुई दोऱ्याने शिवतात. अशा प्रकारे आपापल्या कर्माप्रमाणे निरनिराळे नरक भोगून पापी जीवात्म्याचे पाप कमी होते तसेच पुण्यात्म्याचेही स्वर्ग भोगून पुण्यक्षीण होते. तेव्हा शिल्लक राहिलेले पाप पुण्य रूपी कर्म घेऊन तो जीव पुन्हा इहलोकी जन्म घेतो असे श्रीमद् भागवतात सांगितले आहे.





