Saturday, May 30, 2026

‘कोकणात आहे माहेर माझं...’

‘कोकणात आहे माहेर माझं...’

नॉस्टॅल्जिया -श्रीनिवास बेलसरे काळ होता ६०च्या दशकातला म्हणजे आजपासून सुमारे ६५ वर्षांपूर्वीचा! भौतिक प्रगती फार झालेली नसल्याने प्रवासाच्या साधनांची कमतरताच होती. खासगी मालकीची वाहने तर फारच कमी होती. राज्य परिवहन महामंडळाच्या लाल-पिवळ्या, लेकुरवाळ्या बस आणि शेतीभाती असलेल्यांकडच्या बैलगाड्या. सामान्य माणसाच्या आवाक्यातली एवढीच वाहने. जरा बरी आर्थिक परिस्थिती असलेल्यांकडे हर्क्युलस किंवा अॅटलास कंपनीच्या सायकली असत. रेल्वेचे जाळे तर आजच्याइतके मुळीच पसरलेले नव्हते. त्यामुळे आवश्यक असेल तेव्हाच लोक प्रवास करत. त्यावेळचा कृषीवल समाज आहे त्यात समाधानी होता, त्यामुळे साध्या बैलगाडीत केलेला प्रवास ही सुद्धा मोठी मौज वाटायची. कोकणातल्या एका नवविवाहित युगुलाच्या अशाच बैलगाडीतल्या प्रवासावर गीतकार साहेबराव कोकाटे यांचे एक गाणे त्याकाळी खूप लोकप्रिय झाले होते.प्रल्हाद शिंदेंनी गायलेले हे लोकगीत जरी कोकणातल्या प्रवासाबद्दल असले तरी मराठी बोलणाऱ्या सर्वच प्रांतात ते मोठ्या आवडीने ऐकले जाई. गावात होणाऱ्या कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमापूर्वी किंवा निवडणूक प्रचारातील सभेच्या आधी लाऊडस्पीकरवरून मोठ्या आवाजात जी गाणी ऐकवली जात असत त्यात या गाण्याचा समावेश ठरलेलाच होता. गाण्याला छान ठेकेबाज संगीत दिले होते मधुकर पाठकांनी!

प्रल्हाद शिंदे म्हणजे रेडिओचे सुपरस्टारच! आकाशवाणीवर रोज सकाळी ११.३० वाजता लागणाऱ्या ‘कामगार सभा’ या लोकप्रिय गाण्यांच्या कार्यक्रमात शनिवारी प्रल्हाद शिंदेंच्या आवाजातले गाणे लागले नाही, असे कधीच होत नसे. बावनकशी खणखणीत आवाज, कवितेच्या भावनेशी समरस होऊन गाण्याची सवय आणि जबरदस्त ठेका असलेल्या गाण्यांची निवड यामुळे प्रल्हाद शिंदे जनतेचे अतिशय लाडके गायक होते.कोकणच्या सौंदर्याबद्दल, तिथल्या माणसांबद्दल मराठी साहित्यात जेवढे संदर्भ आहेत तेवढे इतर प्रांतांबद्दल क्वचितच आढळतील. अर्थात ते स्वाभाविकच आहे कारण महाराष्ट्रात निसर्गसौंदर्याने इतका नटलेला दुसरा प्रदेश नाही. हिरवीगार झाडी, वळणावळणाच्या वाटा, डोंगर-दऱ्यांची रेलचेल, महाराष्ट्रात इतर भागात कधीच न दिसणारी दुर्मीळ झाडे... यामुळे कोकणातला प्रवास म्हणजे मोहक निसर्गाचा काही वेळ मिळालेला रोमँटिक सहवासच असतो. साहेबराव कोकाटेंच्या गाण्यातही अलगदपणे सूचित केलेला रोमांस होता पण तो वेगळा!कोकणातली नववधू नवऱ्याबरोबर पहिल्यांदाच माहेरी चालली आहे. तिच्या प्रेमात वेडावलेला पती तिच्याबरोबर स्वत:च्या बैलगाडीतून चालला आहे. त्या नववधूच्या मनातले भाव व्यक्त करणारे हे लोभस गाणे! गीतकार कोकाटेंचे साधेसरळ शब्द होते - ‘गाडी चालली घुंगराची, वाट बाई डोंगराची.वेळ कडक नि बाराची, वाट बाई डोंगराची.’सकाळी न्याहरीबिहारी करून दुपारी आरामात या स्वाऱ्या त्या युवतीच्या माहेरी निघाल्या आहेत. माहेरी जायचा आनंद तिच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहतो आहे. लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी जायला मिळते म्हणून ती इतकी खुशीत आहे की, बिचारीला बैलगाडीच्या प्रवासाची अपूर्वाई वाटतेय. ती म्हणते ‘मी आज पहिल्यांदाच गाडीत बसले आहे.’ या कोकणकन्येचे सासर बहुधा देशावरचे असल्याने ती अभिमानाने सांगते, ‘माझे माहेर हिरव्यागार कोकणातले आहे.’ तिचे आई-बाप रोज समुद्रावर मासे पकडायला जाणारे दर्यावर्दी असल्याने ती म्हणते, ‘माझे आई-बाप तर दर्याचे राजे आहेत. आमच्या गावात बंदर आहे. मलाही त्याच परिसराची सवय आहे. डोंगरातल्या या वळणावळणाच्या वाटेने बैलगाडीतून मात्र मी पहिल्यांदाचजाते आहे.’‘पहिल्यानं गाडीत बसले मी आज,कोकणात आहे माहेर माझं. आई-बाप माझं दर्याचं राजं,मला सवय बंदराची, वाट बाई डोंगराची.’गाण्यातले खरे गंमतीशीर कथानक पुढच्या कडव्यापासून सुरू होते. नवीनच लग्न झालेले असल्याने दोघांमधले शृंगारिक आकर्षण जोरात आहे. त्यात कन्या कोकणची म्हणजे गोरीपान असणारच. पती बिचारा देशावरचा म्हणजे काळासावळा! त्याला तिला एकटे सोडावेसेच वाटत नाही. म्हणून माहेरी पोहोचवण्याचे निमित्त करून तो सोबतच आला आहे. तिच्या अगदी शेजारी खेटून बसला आहे.आता गाण्यातील या सुंदर नायिकेच्या लटक्या तक्रारी सुरू होतात. ती म्हणते, ‘रस्ताभर किती खड्डे, वळणे आहेत. मला सारखे धक्के बसताहेत.’ त्यावेळी खानदानी घरात हल्लीसारखे नवऱ्याला नावाने बोलवायची पद्धत नव्हती. पूर्वी तर पतीचा उल्लेख ‘इकडची स्वारी’ असा करत. ‘अहो, जाहो’ सुद्धा त्यानंतर आले! ती म्हणते ‘तिकडच्या स्वारीला’ माझी काही काळजीच नाही. धक्क्याने गाडी सारखी हलते आहे, मला संकोचल्यासारखे होतेय पण शेजारीच बसलेल्या पतीला काहीच संकोच नाही. त्याला चांगलेच वाटतेय! इकडे मला आजूबाजूची घनदाट झाडी बघून जंगलातून चालल्याने भीती वाटतीये पण यांचे तिकडे लक्षही नाही.‘दणक्यावर दणका बसतो गं बाई,दणक्यानं जीव हा व्याकूळ होई.तिकडच्या स्वारीला पर्वाच नाही,या भयाण जंगलाची,वाट बाई डोंगराची.’नवीन लग्न झालेल्या जोडीच्या गंमतीचे वर्णन करताना गीतकार खूप संयतपणेच त्यांच्या रोमान्सची कल्पना श्रोत्यांना देतात. सासरी असताना नवरा जसा सतत तिच्याजवळ राहायचा प्रयत्न करायचा, तिला क्षणभरही एकटे सोडायचा नाही, तसेच त्याचे आताही सुरू आहे अशी तिची तक्रार आहे. ती म्हणते ‘पुरुषांची जात फार उतावीळ असते बाई! काहीतरी लबाडी करून ते त्यांना हवे ते मिळवतातच. याकामी त्यांना ना दिवस ना रात्र, ना कसला संकोच!’ ‘घरात वागे तशी दारात, रात्रीचा दिसं करी, दिसाची रात. भारी उताविळ ही पुरुषाची जात, आहे लबाड मुलखाची, वाट बाई डोंगराची.’ आता प्रवास संपत आलाय. नववधूचा गाव जवळ आलाय. गावातून येणारा-जाणारा वाटसरू दिसू लागलाय. ते पाहून तिला अजूनच लाज वाटते. रस्ताभर पतीच्या खोड्यांकडे आपण दुर्लक्ष केले, पण ‘आता तरी पतीने लोकलज्जेस्तव गप्प बसावे. मलाही नीट सावरून बसू द्यावे’ अशी तिची अपेक्षा आहे. पण हा बाब्या काही हट्ट सोडत नाही. शेवटी ती स्पष्टच म्हणते, ‘अहो, आता तरी हे ‘पदराशी खेळणे’ बंद करा. ही ‘ओढाताण’ थांबवा. आपण गावाजवळ आलोय. लोक पाहतील तर काय म्हणतील?’ ‘समोर दिसतंय्‌ आपुलं गाव, कसं वाटंना तुम्हाला भ्यावं, पुरे पुरे आता भास्करराव, ओढाताणी ही पदराची.वाट बाई डोंगराची.’लोकगीतातला हा मोकळेपणा, रांगडेपणा सामान्य लोकांना सहज भावून जायचा. तेव्हा धसमुसळा मानला गेला असता अशा शृंगाराचे उल्लेखही किती संयमित असायचे हे पाहिले आणि हल्लीच्या गाण्यातली दृश्ये, शब्द पाहिले की पटू लागते ‘जुने ते सोनेच’.
Comments
Add Comment