इतिहासाच्या पाऊलखुणांनी आणि पराक्रमाच्या गाथांनी पावन झालेल्या या भूमीचा वारसदार असणं, यासारखं थोर भाग्य नाही. आपल्या पूर्वजांचे विचार आणि त्यांनी रचलेला इतिहास हा केवळ भूतकाळ नसून, आपल्याला सतत नवनिर्मितीची प्रेरणा देणारा एक जिवंत स्त्रोत आहे. हा अमूल्य वारसा केवळ पोथ्यांमध्ये किंवा संग्रहालयात बंदिस्त न ठेवता, आपल्या बुद्धीच्या आणि प्रतिभेच्या जोरावर आधुनिक परिभाषेत विश्वाच्या पटलावर मांडण्याची वैचारिक क्रांती प्रत्येकालाच साधत नाही. मात्र, काही जण याकडे अतिशय वेगळ्या दृष्टीने पाहतात. आजच्या वेगवान युगात मोबाईल गेम्सच्या आहारी गेलेली आणि पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावाखाली वावरणारी नवी पिढी पाहून दादरच्या युवा साहिलराजे शिर्के यांच्या मनात एक वेगळीच खंत निर्माण झाली. ‘आपल्या देशासाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी काहीतरी वेगळं करावं, त्यांना आपल्या सनातनी जीवनमूल्यांची पुन्हा ओळख करून द्यावी,’ हीच तीव्र इच्छा घेऊन त्यांनी आयटी क्षेत्रातील करिअर बाजूला सारलं आणि एका नव्या प्रवासाची सुरुवात केली. भारतीय संस्कृतीत खेळांना अतिशय समृद्ध आणि वैभवशाली इतिहास लाभलाय. आपल्याकडे खेळ हे केवळ विरंगुळ्याचे साधन नव्हते, तर ते जीवन जगण्याची कला शिकवणारे माध्यम होते. आपल्या याच प्राचीन संस्कृतीची आणि खेळांच्या इतिहासाची प्रेरणा घेऊन साहिलराजेंच्या वैचारिक धडपडीतून ‘मुमुक्षु’ हा बोर्ड गेम आकारास आला आहे. सध्या देशभर चर्चेत असलेला हा खेळ केवळ मनोरंजनाचं साधन नाही, तर जुन्या काळातील खेळांचा गौरवशाली वारसा आधुनिक पद्धतीने मांडत नव्या पिढीच्या मनात भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि जीवनतत्त्वज्ञानाची मूल्यं पेरणारा एक अप्रतिम प्रयोग आहे. ‘मुमुक्षु’ म्हणजे मोक्षप्राप्तीची तीव्र इच्छा बाळगणारा साधक. या नावाभोवतीच संपूर्ण खेळाचा आशय विणला गेलाय. हा एक अनोखा ‘लाईफ सिम्युलेशन गेम’ असून, खेळाडूला आयुष्यातील विविध टप्प्यांतून प्रवास करत आदर्श आणि संतुलित जीवन जगण्याचा अनुभव देतो. चार आश्रमांच्या संकल्पनेवर आधारित या खेळात फासा टाकल्यावर पडणाऱ्या अंकानुसार खेळाडूचा प्रवास सुरू होतो. प्रत्येक खेळाडूला एक ‘लोकेशन कार्ड’ दिलं जातं, ज्यावर त्याचं ध्येय लिहिलेलं असतं. या खेळात फक्त पैसा कमावणं महत्त्वाचं नाही, तर ‘कृपा पॉइंट्स’ मिळवणं गरजेचं आहे. खेळ आपल्याला शिकवतो की ‘कृपा’ या शब्दातच आपली कर्म करण्याची पद्धत दडलेली आहे. खेळाडूच्या कर्माचे वैयक्तिक फायदे, कौटुंबिक जबाबदाऱ्या, अध्यात्मिक प्रवास, समाजाप्रती आणि देशाप्रती कर्तव्ये असे पाच महत्त्वाचे पैलू यात मांडले गेले आहेत. १२ वेगवेगळ्या कला शैलींमध्ये तयार केलेल्या पटलावर खेळताना खेळाडू भारतातील शक्तिपिठे, ज्योतिर्लिंगे आणि अनेक ऐतिहासिक-सांस्कृतिक स्थळांना भेटी देतो. त्यामुळे खेळत-खेळता भारतीय संस्कृतीचा आणि देशाच्या वैभवशाली परंपरेचाही परिचय होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘इंडियन नॉलेज सिस्टम’ या संकल्पनेवर साहिलराजे यांचा नेहमीच भर राहिलाय. आपल्या प्राचीन ज्ञानपरंपरेचा वैज्ञानिक दृष्टिकोन नव्या पिढीसमोर मांडणं हाच त्यांचा मुख्य उद्देश आहे. आजची पिढी हिंसक व्हिडीओ गेम्सच्या आहारी जाऊन संस्कारांपासून दूर जात चालली आहे. हे चित्र बदलण्यासाठी आणि मोबाईल बाजूला ठेवून मुलांनी कुटुंबासोबत खेळावं, संवाद साधावा, मूल्यांची जाणीव ठेवावी यासाठी ‘मुमुक्षु’ हा एक उत्तम पर्याय ठरतो. ‘माया’, ‘मोक्ष’, ‘कर्म’ यांसारख्या तत्त्वज्ञानातील क्लिष्ट वाटणाऱ्या संकल्पना हा खेळ अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगतो. म्हणूनच, हा खेळ केवळ मनोरंजनापुरता मर्यादित राहत नाही, तर विचारशील, सुसंस्कृत आणि समृद्ध पिढी घडवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरतो. कुटुंब, समाज आणि राष्ट्र यांच्याप्रती असलेलं आपलं कर्तव्य ओळखून निर्णय घेणं, हाच या खेळाचा खरा गाभा आहे. मात्र, अशा गहन विषयांचा इतक्या बारकाईने अभ्यास करून ती संकल्पना प्रत्यक्षात उतरवणं अजिबात सोपं नव्हतं. मुंबईतून बिझनेस मॅनेजमेंट पूर्ण केल्यानंतर साहिलराजेंनी स्वतःचा टेक स्टार्टअप उभारला, तर दुसऱ्या एका नामांकित स्टार्टअपमध्ये ‘सीओओ’ म्हणून जबाबदारी सांभाळली. रशियातील ‘ब्रिक्स’ परिषदेत भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या साहिलराजेंना भू-राजकारण, इतिहास, वेदांत आणि ‘फिफ्थ जनरेशन वॉरफेअर’ या विषयांचा सखोल अभ्यास आहे. ते या विषयांवर सातत्याने लेखनही करतात. केवळ व्यवसाय नाही, तर सामाजिक भानही त्यांनी जपलं. दहिसर परिसरात ‘सुभिक्षा’ या अन्न आणि शिक्षण उपक्रमाद्वारे त्यांनी समाजकार्य उभं केलं, तर ‘भारतम् रीअवेकनिंग’ या व्यासपीठातून तरुणांना वैचारिकदृष्ट्या जोडण्याचं काम सुरू ठेवलं. ‘मुमुक्षु’सारखा खेळ उभारण्याचा प्रवास आर्थिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या आव्हानात्मक होता. मध्यमवर्गीय कुटुंबात राहून दोन-अडीच वर्षं करिअर बाजूला ठेवून संशोधन करणं ही मोठी जोखीम होती. या काळात साहिलराजेंच्या आई-वडिलांनी आपल्या मुलाच्या स्वप्नासाठी स्वतःला झोकून दिलं. आर्थिक ओढाताण, समाजाचे प्रश्न आणि अनिश्चित भविष्य या सगळ्यांचा सामना करत त्यांनी मुलाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं धैर्य दाखवलं. त्यांच्या त्यागामुळे आणि साहिलराजेंच्या अथक परिश्रमांमुळे ‘मुमुक्षु’चा हा प्रवास यशस्वी झाला. आज या प्रयोगाला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसतोय. आयआयटी दिल्ली, नामांकित विद्यापीठे, विचारवंत आणि उद्योजकांकडून या कल्पनेचं तोंडभरून कौतुक होत आहे. विविध शहरांमध्ये झालेल्या चाचण्यांमध्ये लोकांनी या खेळाला भरभरून प्रतिसाद दिला. सध्या हा खेळ डिजिटल आणि फिजिकल अशा दोन्ही स्वरूपांत जगभर पोहोचवण्यासाठी साहिलराजे शिर्के यांची धडपड सुरू आहे. आजच्या डिजिटल युगात तरुणाईला झटपट गोष्टींची भुरळ पडली आहे. एका क्लिकवर सगळं मिळवण्याच्या सवयीमुळे संयम, विचारशक्ती आणि संवाद हळूहळू कमी होत चालले आहेत. अशा काळात ‘मुमुक्षु’सारखा विचार घराघरांपर्यंत पोहोचवणं ही मोठी अग्निपरीक्षा आहे; परंतु मोबाईलच्या स्क्रीनमध्ये अडकलेल्या मुलांना आपल्या मातीची खरी ओळख करून देण्यासाठी अशा धाडसी उपक्रमांची आज नितांत गरज आहे. हा खेळ कोणत्याही एका धर्मापुरता मर्यादित नाही, तर संपूर्ण भारतीय जीवनदृष्टी आणि मानवी मूल्यांचा व्यापक परिचय करून देतो. मनोरंजनाच्या माध्यमातून विचार, संस्कार आणि जीवन जगण्याचं तत्त्वज्ञान शिकवणारा हा खेळ नव्या पिढीला योग्य दिशा दाखवणारा ठरेल, यात शंका नाही. थोडक्यात सांगायचं तर, ‘मुमुक्षु’ हा केवळ एक बोर्ड गेम नाही, तर तो आपल्या संस्कृतीचा आधुनिक रूपातला एक सशक्त आविष्कार आहे. आपल्या प्राचीन ज्ञानपरंपरेला आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या परिभाषेत जगासमोर मांडण्याचा युवा विचारवंत साहिलराजे शिर्के यांचा हा प्रामाणिक प्रयत्न खरोखरच प्रेरणादायी आहे.






