Saturday, May 30, 2026

अधिक मास : आध्यात्मिक आणि वैज्ञानिक पर्व

अधिक मास : आध्यात्मिक आणि वैज्ञानिक पर्व

स्मृतीगंध-लता गुठे

आजही ग्रामीण भागामध्ये ‘अधिक मासा’ला विशेष महत्त्व दिले जाते. भारतीय संस्कृतीत प्रत्येक सण, व्रत आणि परंपरेमागे काही ना काही तत्त्वज्ञान दडलेले आहे. अधिक मासात आजही गावांमध्ये मंदिरात ग्रंथांचे वाचन, पारायणे केली जातात. त्याचबरोबर जप, तप, दान, व्रत, उपवास आणि ईश्वरभक्ती यांना विशेष महत्त्व दिले जाते. या महिन्यामध्ये मुलगी आणि जावयाला घरी जेवायला बोलवून त्यांना कपडे व सुवर्णदान केले जाते. त्यामुळे अधिक मास हा केवळ अतिरिक्त महिना नसून आत्मशुद्धी आणि अध्यात्मिक चिंतनाचा काळ मानला जातो. अधिक महिन्याला ‘पुरुषोत्तम मास’ असेही म्हटले जाते. हा महिना साधारणतः तीन वर्षांतून एकदा येतो.लहानपणी आजी अधिक मासची गोष्ट सांगायची ती अशी, बारा महिन्यांतील प्रत्येक महिन्याला काही ना काही महत्त्व होते; परंतु अधिक मासाला कोणतेही विशेष महत्त्व नव्हते. लोक त्याला ‘मलमास’ म्हणून हिणवत असत. त्यामुळे दुःखी होऊन अधिक मास भगवान विष्णूंकडे गेला आणि त्यांना आपली व्यथा सांगितली. भगवान विष्णूंनी त्याला आपले पुरुषोत्तम हे नाव दिले आणि सांगितले की, “जो मनुष्य या महिन्यात भक्ती, दान आणि सत्कर्म करेल, त्याला विशेष पुण्य मिळेल.” तेव्हापासून अधिक मास ‘पुरुषोत्तम मास’ म्हणून ओळखला जाऊ लागला. एकदा अधिक मासामध्ये गावी गेले असता तिथे समजले की, बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील ‘पुरुषोत्तमपुरी’ येथे गोदावरीऔ नदीच्या काठावर भगवान विष्णूंचे भारतातील एकमेव प्राचीन ‘पुरुषोत्तम मंदिर’आहे.आणि खूप दूर दूरवरून लोक अधिक महिन्यांमध्ये दर्शनाला येतात. हे मंदिर पाहण्याची मलाही उत्सुकता होती.या मागची पौराणिक कथा अशी आहे, शार्दुल नावाचा राक्षस या परिसरात लोकांना त्रास देत होता. त्याचा वध करण्यासाठी भगवान विष्णूंनी ‘पुरुषोत्तम’ अवतार धारण केला आणि राक्षसाचा वध केल्यानंतर सुदर्शन चक्र गोदावरी नदीत धुतले. या ठिकाणाला ‘चक्रतीर्थ’ असे म्हणतात, जिथे भाविक स्नान करतात. मंदिराशेजारीच त्रिवेणी संगम मंदिर आहे, जिथे चार फूट उंच वरदविनायकाची मूर्ती, माता पार्वतीच्या पादुका आणि महालक्ष्मी-महादेवाचे शिवलिंग एकाच गाभाऱ्यात आहे. अशा या पावन पुण्य ठिकाणाचे दर्शन घेण्यासाठी अधिक मासामध्ये अनेक भाविक तिथे दर्शनाला येतात.खरं तर माझ्याप्रमाणेच अनेकांना उत्सुकता असते अधिक मासाची निर्मिती कशी झाली असेल याची. मला जी माहिती मिळाली ती अशी... भारतीय पंचांग हे चंद्र-सौर पद्धतीवर आधारित आहे. चंद्राच्या गतीनुसार महिने ठरवले जातात, तर सूर्याच्या गतीनुसार ऋतू निश्चित होतात. चांद्रवर्ष साधारणतः ३५४ दिवसांचे असते, तर सौरवर्ष ३६५ दिवसांचे असते. म्हणजेच दोन्ही वर्षांमध्ये सुमारे ११ दिवसांचा फरक पडतो. हा फरक दरवर्षी वाढत जातो. साधारण तीन वर्षांनी तो जवळपास ३० दिवसांपर्यंत पोहोचतो. ही तफावत भरून काढण्यासाठी भारतीय पंचांगात एक अतिरिक्त महिना जोडला जातो. हा महिना म्हणजे ‘अधिक मास’ होय. अधिक मास हा भक्ती, संयम आणि साधनेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात विष्णुसहस्रनाम, भगवद्गीता, हरिपाठ, रामरक्षा, पुरुषोत्तम मासाची कथा, श्रीमद्भागवत यांचे पठण केले जाते. सतत नामस्मरण केल्याने मन शांत होते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते.दानधर्म करण्यासाठी आपल्या धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे.अधिक मासात अन्नदान, वस्त्रदान, जलदान आणि गरिबांना मदत करण्याला विशेष महत्त्व आहे.ग्रामीण भागात अधिक मासामध्ये अनेक स्त्रिया इतर सुहासिनींना बोलावून त्यांना वाण देतात. वाणामध्ये फळे, धान्य, सुपारी, हळद-कुंकू देतात. ग्रामीण भागात अधिक मासाला ‘धोंड्याचा महिना’ असेही म्हटले जाते; परंतु अधिक मासात विवाह, गृहप्रवेश, मुंज, वास्तुशांती अशी शुभकार्ये टाळली जातात.अधिक मास ही केवळ धार्मिक कल्पना नाही, तर त्यामागे वैज्ञानिक विचारही आहे. इंग्रजी कॅलेंडरमध्ये जसे ‘लीप वर्ष’ येते, त्याचप्रमाणे भारतीय पंचांगात अधिक मास येतो.पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी ३६५ दिवस आणि काही तास लागतात. त्यामुळे इंग्रजी कॅलेंडरमध्ये दर चार वर्षांनी एक दिवस वाढवला जातो. त्याच प्रकारे चांद्र आणि सौर वर्षातील फरक भरून काढण्यासाठी अधिक मासाची योजना करण्यात आली आहे. यावरून प्राचीन भारतीयांना खगोलशास्त्राचे सखोल ज्ञान होते, हे स्पष्ट होते. आजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस मानसिक ताणतणावाने ग्रासलेला आहे. पैसा, स्पर्धा आणि भौतिक सुखांच्या मागे धावताना मनःशांती हरवत चालली आहे. अशा वेळी अधिक मास माणसाला थांबून स्वतःकडे पाहण्याचा संदेश देतो.
Comments
Add Comment