नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे एसओयुएल (सोल) लीडरशिप कॉन्क्लेव्हच्या पहिल्या वर्षीच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी ते उपस्थितांना संबोधित देखील करतील. या कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित असलेले भूतानचे पंतप्रधान दाशो त्शेरिंग तोब्ग्ये यांचे या प्रसंगी बीजभाषण होणार आहे.
दिनांक २१ आणि २२ फेब्रुवारी या कालावधीत होणारी ही दोन दिवसीय सोल लीडरशिप कॉन्क्लेव्ह एक असा प्रमुख मंच म्हणून कार्य करेल, जेथे राजकारण, क्रीडा, कला आणि माध्यमे, अध्यात्म विश्व, सार्वजनिक नीती, व्यापार आणि सामाजिक क्षेत्र अशा वैविध्यपूर्ण क्षेत्रांमध्ये कार्यरत प्रमुख व्यक्ती आपापला प्रेरणादायी जीवनप्रवास सामायिक करतील आणि नेतृत्वाशी संबंधित विविध पैलूंवर चर्चा करतील. तरुण प्रेक्षकांना प्रेरित करण्याच्या दृष्टीने ही परिषद यश आणि अपयश अशा दोन्हीतून शिकवण मिळवणे सुलभ करत सहयोग आणि विचारी नेतृत्वाच्या परिसंस्थेची जोपासना करेल.
स्कूल ऑफ अल्टीमेट लीडरशिप ही गुजरातमध्ये उदयाला येत असलेली नेतृत्वविषयक संस्था प्रामाणिक नेत्यांना सार्वजनिक हिताच्या दिशेने आगेकूच करण्यास सक्षम करेल. औपचारिक प्रशिक्षणाच्या माध्यमातून भारतातील राजकीय नेतृत्वाच्या परिदृष्याचा विस्तार करणे तसेच केवळ राजकीय वंशावळीचा वापर करणाऱ्या नव्हे तर गुणवत्ता, बांधिलकी आणि लोकसेवेची आवड यांच्या जोरावर पुढे येणाऱ्यांना यामध्ये समाविष्ट करून घेणे हा या संस्थेचा उद्देश आहे. आजच्या जगात नेतृत्वासंदर्भात उभ्या राहणाऱ्या गुंतागुंतीच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी गरजेचे ठरणारे विचार, कौशल्ये आणि नैपुण्य देण्याचे कार्य ही संस्था करते.