नवी दिल्ली : भाजपाच्या रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर परवेश साहेब सिंह वर्मा यांनी दिल्लीच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. रेखा गुप्ता यांच्या मंत्रिमंडळाचे सदस्य म्हणून परवेश साहेब सिंह वर्मा यांच्या व्यतिरिक्त आशिष सूद, मनजिंदर सिंग सिरसा, रवींदर इंद्रराज सिंग, कपिल मिश्रा आणि पंकज कुमार सिंग यांनी शपथ घेतली.
रेखा गुप्ता या एनडीए शासित १८ राज्यांतील एकमेव महिला मख्यमंत्री आहेत. त्यांनी दिल्लीत २०२५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शालीमार बाग विधानसभा मतदारसंघांत आम आदमी पार्टीच्या वंदना कुमारी यांचा २९ हजार ५९५ मतांनी पराभव केला .
पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत झाला शपथविधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिल्लीच्या मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. हा सोहळा दिल्लीच्या रामलीला मैदानावर झाला.
विधानसभा निवडणुकीत भाजपाचा विजय
फेब्रुवारी महिन्यात दिल्लीच्या विधानसभेसाठी निवडणूक झाली. विधानसभेच्या ७० पैकी ४८ जागा भारतीय जनता पार्टीने आणि २२ जागा आम आदमी पार्टीने जिंकला. काँग्रेस पक्ष सलग तिसऱ्यांदा दिल्लीच्या विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीत एकही जागा जिंकू शकलेला नाही. दिल्लीत सत्तेत असलेल्या आम आदमी पार्टीचा पराभव करणाऱ्या भाजपाने दणदणीत विजय मिळवला. भाजपाने १९९३ नंतर पहिल्यांदाच दिल्लीत सत्ता स्थापन केली आहे. त्यांनी मागील १० वर्षांपेक्षा जास्त काळापासून सत्तेत असलेल्या आम आदमी पार्टीचा पराभव केला आहे. यामुळे भाजपासाठी दिल्लीतल्या विजयाला विशेष महत्त्व आहे.
कोण आहेत रेखा गुप्ता ?
जन्म : १९ जुलै १९७४, जुलाना, हरियाणा
दिल्ली विद्यापीठाच्या दौलत राम महाविद्यालयातून पदवी शिक्षण (बी कॉम)
मेरठच्या चौधरी चरणसिंग विद्यापीठाच्या आयएमआयआरसी कॉलेज ऑफ लॉ भाईना, गाझियाबाद येथून कायद्याचे शिक्षण
राष्ट्रीय स्वयंसेक संघाच्या सक्रीय कार्यकर्त्या
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सक्रीय कार्यकर्त्या
दिल्ली विद्यापीठात १९९६ – ९७ दरम्यान विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा
तीन वेळा दक्षिण दिल्ली महापालिकेच्या नगरसेविका आणि एकदा दक्षिण दिल्ली महापालिकेच्या महापौर
भाजपा महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा
भाजपाच्या दिल्ली सरचिटणीस
गुरुवार २० फेब्रुवारी २०२५ पासून दिल्लीच्या मुख्यमंत्री