जामसूत गावच्या संतोष साळवींचा सन्मान
भाषेच्या संस्कृतीसाठी अमेरिकेत सुरु केल्या सात मराठी शाळा
गुहागर : अमेरिकेत नुकत्याच झालेल्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षातर्फे उमेदवारी लढविलेल्या गुहागर तालुक्यातील जामसूत येथील सुपुत्र संतोष दिनकर साळवी हे बोस्टन जवळील न्यू हम्पशेअर स्टेटचे पहिले मराठी आमदार (Marathi MLA in America) झाले आहेत. एका मराठी माणसाने अटकेपार झेंडा रोवून ऐतिहासिक विजय मिळविल्याने त्यांचा जामसूत ग्रामस्थ, ग्रामपंचायत, ग्रामदेवता देवस्थान व गुहागर तालुका मराठा समाजातर्फे सन्मान करण्यात आला.
भारतात शैक्षणिक संस्कारात वाढलेले संतोष साळवी हे फायनान्समधील पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. येथे नोकरी करीत असतानाच त्यांना अमेरिकन क्षितिज खुणावू लागले. १९९४ ला ते अमेरिकेत गेले व सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत झाले. खूप कष्ट करून प्रगतीच्या नवनव्या वाटा शोधू लागले. मुळातच समाजसेवेची आवड असल्याने साळवी येथील भारतीय आणि अमेरिकन समाजाशी चांगलेच एकरूप झाले.
Multi Super Specialty Hospital : मुंबईतील सर्वात मोठे खासगी रुग्णालय कांदिवलीत होणार!
दरम्यान, त्यांचा सॉफ्टवेअर इंजिनिअरचा जॉब गेला. पण खचून न जाता त्यांनी नवी वाट चोखळली ती इतरांना योग्य वाट दाखवण्याची. त्यांनी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सुरू केली. अमेरिकेत राहून करिअर करीत असतानाच अमेरिकेतील जे लोक वयाच्या चाळीशीमध्येच योग्य त्या ज्ञानाअभावी नोकरी गमावून बसतात, पदरी लहान मुले असताना बेकार होतात त्यांना धीराचा हात देऊन आवश्यक ते शिक्षण देऊन नव्या तंत्रज्ञानाची ओळख करून देण्याचे काम त्यांनी सुरु केले. त्यांना नोकरी मिळवण्यायोग्य बनविण्याचे कसब त्यांनी मिळवून हजारो अमेरिकन लोकांचे आयुष्य पुन्हा मार्गस्थ करून दिले.
इन्स्टिट्यूटचा पसारा वाढू लागला. पुणे, मुंबई, कॅनडा, बहरिन सर्वत्र आयटी स्टाफ ट्रेनिंग जोमात चालू झाले. या जोडीनेच सामाजिक कार्यदेखील वेगात चालू होते. ते इंडियन असोसिएशनचे प्रेसिडेंट झाले. रक्तदान शिबिरे आयोजित करून ब्लड बँक चालवणे, गरजू रुग्णांना तत्परतेने रक्त पुरवणे असे उपक्रम राबविणे सुरु केले. सुमारे १२० गरीब लोकांना त्यांची समाजसेवी संघटना फ्री लंच देते. गेली २० वर्षे संतोष साळवी जॉब ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चालवत आहेत. ते बृहन्महाराष्ट्र अमेरिका संस्थेचे खजिनदार आहेत. या संस्थेतर्फे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम व सर्व सण उत्साहाने साजरे करण्यात येतात. अमेरिका, कॅनडामधील सर्वोच्च असणाऱ्या या संस्थेचे खजिनदार म्हणून ते चांगलेच लोकप्रिय आहेत. ते अमेरिकेत सात मराठी शाळा चालवत आहेत. अमेरिकेतील आपल्या मराठी मुलांवर मराठी भाषेचे, संस्कृतीचे सर्वोत्तम संस्कार व्हावे यासाठी ते झटत आहेत. त्यांच्या या समाजसेवेची दखल अमेरिकन सरकारने देखील घेतली.
त्यांना सर्वोच्च अशा व्हाईट हाऊसमधून मानाची निमंत्रणे येऊ लागली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीप्रसंगी विशेष निमंत्रित म्हणून बोलावले जाऊ लागले. भारतातून अमेरिकेत एम. एस. करायला येणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या समितीत ते काम करू लागले.
अमेरिकेची विश्वचर्चित निवडणूक घोषित झाली आणि साळवी यांना ती निवडणूक लढविण्यासाठी आग्रह होऊ लागला. आयुष्याची वाटचाल करताना ज्या धाडसाने आणि निर्भयपणे त्यांनी पावले टाकली तशीच त्यांनी या निवडणुकीत देखील पावले उचलली आणि ते यशस्वी झाले व अमेरिकेतील पहिले मराठी आमदार झाले.