अदानी ग्रुप कांदिवलीत १,००० खाटांचे मल्टी-सुपर-स्पेशालिटी रुग्णालय उभारणार!
मुंबई : गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील ऊर्जा आणि पायाभूत सुविधा समूहाने मुंबई आणि अहमदाबाद येथे दोन (Multi Super Specialty Hospital) रुग्णालयांच्या उभारणीसाठी ६,००० कोटींची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. या आरोग्य संकुलांना ‘अदानी हेल्थ सिटीज’ (Adani Health Cities) असे नाव देण्यात आले आहे.
अदानी समूहाने जाहीर केले आहे की, ते अमेरिका स्थित मेयो क्लिनिकसोबत भागीदारीत मुंबई आणि अहमदाबाद येथे १,००० खाटांचे रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय उभारणार आहे. हे आरोग्य संकुल मुंबईतील कांदिवली आणि अहमदाबादमध्ये स्थापन केले जाणार असून, या उपक्रमासाठी ६,००० कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे.
PM Kisan Yojana : तारीख ठरली! ‘या’ दिवशी बळीराज्याच्या खात्यात जमा होणार २ हजार रुपये
कांदिवली येथे प्रस्तावित रुग्णालय मुंबईतील सर्वात मोठे खासगी रुग्णालय असेल. सध्या, अंधेरी पश्चिमेतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालय आणि वैद्यकीय संशोधन संस्था ७५० खाटांसह मुंबईतील सर्वात मोठी वैद्यकीय सुविधा आहे. तसेच, अंधेरी पूर्वेतील सेवनहिल्स रुग्णालय १,५०० खाटांपर्यंत विस्तार करण्याची क्षमता आहे. परंतु राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणातील वादामुळे सध्या केवळ ४०० खाटांचे संचालन करत आहे.
अदानी समूह भारतभर विविध शहरांमध्ये अशी वैद्यकीय संकुले उभारण्याचा विचार करत आहे. एका अधिकृत निवेदनानुसार, ही रुग्णालये परवडणारी, जागतिक दर्जाची वैद्यकीय सेवा आणि वैद्यकीय शिक्षण पुरवतील. हा प्रकल्प समूहाच्या ना-नफा तत्वावर कार्यरत असलेल्या आरोग्यसेवा शाखेद्वारे राबविला जाणार आहे.
या प्रत्येक आरोग्य संकुलात १,००० खाटांचे मल्टी-सुपर-स्पेशालिटी रुग्णालय, १५० पदवीधर विद्यार्थी, ८० हून अधिक निवासी डॉक्टर आणि ४० हून अधिक संशोधकांना वार्षिक प्रवेश असलेले वैद्यकीय महाविद्यालय, संक्रमण काळातील व टप्प्याटप्प्याने पुनर्वसन करणाऱ्या सुविधा आणि अत्याधुनिक संशोधन सुविधा असतील.