Tuesday, June 2, 2026

कर्जातून सुटका करण्यासाठी स्वतःचाच मृत्यूचा रचला कट; जळालेल्या कारमागचं धक्कादायक हत्याकांड उघड

कर्जातून सुटका करण्यासाठी स्वतःचाच मृत्यूचा रचला कट; जळालेल्या कारमागचं धक्कादायक हत्याकांड उघड
जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात उघडकीस आलेल्या एका धक्कादायक प्रकरणाने संपूर्ण परिसर खळबळ उडाली आहे. कर्जबाजारीपणातून सुटका मिळवण्यासाठी एका व्यक्तीने स्वतःच्या मृत्यूचा खोटा बनाव रचत निष्पाप तरुणाची हत्या (Murder) केल्याचा प्रकार पोलिसांच्या तपासात समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह तिघांना अटक (Arrest) केली असून पुढील तपास सुरू आहे. (Jalna Crime News) काही दिवसांपूर्वी जाफराबाद तालुक्यातील गोपी शिवार परिसरात रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या एका कारला आग लागल्याची घटना समोर आली होती. कार पूर्णपणे जळून गेली होती आणि त्यामध्ये एका व्यक्तीचा जळालेला मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला हा अपघात असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र मृतदेहाची ओळख पटवताना काही विसंगती आढळल्याने पोलिसांनी सखोल तपास सुरू केला. पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांना धक्कादायक माहिती हाथी लागली. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, नितीन गवळी हा मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला होता. कर्जाच्या ओझ्यातून बाहेर पडण्यासाठी त्याने स्वतःचा मृत्यू झाल्याचा बनाव करण्याचा कट रचला. यासाठी त्याने आपल्या मित्रांच्या मदतीने संदीप चव्हाण या तरुणाला लक्ष्य केले आणि त्याला ठार मारायचे ठरवले. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी सर्वप्रथम संदीपचा खुन केला. त्यानंतर त्याचा मृतदेह कारमध्ये ठेवून दिला आणि वाहनाला आग लावण्यात आली. कारमधील जळालेला मृतदेह हा नितीन गवळीचाच असल्याचा आभास निर्माण करण्याचा आरोपींचा प्रयत्न होता. मात्र पोलिसांनी तांत्रिक पुरावे, गुप्त माहिती आणि विविध तपासाच्या आधारे संपूर्ण कट उघड केला. तपासात नितीन गवळी जिवंत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी नितीन गवळी, अमित फुलारे आणि आकाश गवळी या तिघांवर गुन्हा दाखल केला आणि जाफराबाद येथून तिघांना अटक केली. या घटनेमुळे जालना जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून स्वतःच्या फायद्यासाठी एका निष्पाप तरुणाचा जीव घेतल्याने संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >