Tuesday, June 2, 2026

लेह-लडाखचा प्रवास ठरला अखेरचा; युवा क्रिकेटपटू अनिकेत काळे यांच्यासह दोघांचा भीषण अपघातात मृत्यू

लेह-लडाखचा प्रवास ठरला अखेरचा; युवा क्रिकेटपटू अनिकेत काळे यांच्यासह दोघांचा भीषण अपघातात मृत्यू
महाराष्ट्रातील क्रिकेट क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे युवा क्रिकेटपटू अनिकेत काळे (Aniket kale) यांचे भीषण रस्ते अपघातात (Accident) निधन झाले आहे. लेह-लडाख येथे पर्यटनासाठी जात असताना मध्य प्रदेशातील सेंधवा टोलनाक्याजवळ त्यांच्या वाहनाला अपघात झाला. या दुर्घटनेत अनिकेत काळे आणि त्यांचे मित्र बद्रीनाथ नांगरे यांचा जागीच मृत्यू झाला, तर आणखी दोघे गंभीर जखमी झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार, अनिकेत काळे, बद्रीनाथ नांगरे, ओंकार साबणे आणि भूषण हे चार मित्र रविवारी रात्री जीपमधून लेह-लडाखच्या दिशेने निघाले होते. सोमवारी दि. १ जून पहाटे सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास मध्य प्रदेशातील सेंधवा टोलनाक्याजवळ त्यांच्या जीपने समोर असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भयंकर होती की, वाहनाचा पुढील भाग पूर्णपणे चुराडा झाला.
या भीषण अपघातानंतर चौघे जण वाहनात अडकले होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, टोल नाका कर्मचारी आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. मोठ्या प्रयत्नांनंतर अपघातग्रस्तांना वाहनातून बाहेर काढण्यात आले. मात्र, अनिकेत काळे आणि बद्रीनाथ नांगरे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. जखमी ओंकार साबणे आणि भूषण यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. अनिकेत काळे हे टेनिस बॉल आणि लेदर बॉल क्रिकेट स्पर्धांमध्ये परिचित नाव होते. त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत क्रिकेट चाहत्यांमध्ये लोकप्रियता मिळवली होती. त्यांच्या अचानक अपघाती मृत्यूमुळे क्रीडाक्षेत्रात शोककळा पसरली आहे. अपघाताची माहिती मिळताच, कुटुंबीय आणि नातेवाईक मध्य प्रदेशकडे रवाना झाले. सोमवारी सायंकाळी अनिकेत काळे आणि बद्रीनाथ नांगरे यांच्यावर त्यांच्या मूळ गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.    

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >