देहू : संत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज प्रसिद्ध व्याख्याते हरि भक्त परायण शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केली. शिरीष महाराज यांनी राहत्या घरी गळफास लावून घेतला. शिरीष महाराज मोरे यांचे पार्थिव पोलिसांनी शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहे. संध्याकाळी चार वाजता शिरीष महाराजांच्या पार्थिवावर देहू गावातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील.
शिरीष महाराज यांचे लग्न ठरले होते. टिळ्याचा कार्यक्रम झाला होता. यामुळे त्यांनी टोकाचे पाऊल का उचलले यावरुन चर्चेला उधाण आले आहे. पोलिसांनी आणि मोरे कुटुंबाने नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन केले आहे. आत्महत्येप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.
शिरीष महाराजांची कृती देहूकरांसाठी आणि मोरे कुटुंबीयांसाठी धार्मिक अध्यात्मिक आणि कौटुंबिक नुकसान करणारी आहे. या प्रकरणी अफवांवर विश्वास ठेवू नका, पोलीस तपासात सत्य कळेल; असे मोरे कुटुंबातील सदस्य म्हणाले.
ज्याच्या कपाळी नाही टिळा, त्याच्याकडून खरेदी करणे टाळा; असे आवाहन शिरीष महाराज मोरे यांनी काही काळापूर्वी केले होते.