Wednesday, June 3, 2026

New MIDC : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गालगत नवी एमआयडीसी; मावळ तालुक्यात १,१०० एकरांवर औद्योगिक प्रकल्प

New MIDC : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गालगत नवी एमआयडीसी; मावळ तालुक्यात १,१०० एकरांवर औद्योगिक प्रकल्प
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गालगत औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी मावळ तालुक्यात नव्या एमआयडीसीची (MIDC) उभारणी करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी बऊर, करंज आणि ब्राह्मणवाडी परिसरातील सुमारे १,१०० एकर जमीन निश्चित करण्यात आली असून सर्वेक्षण आणि मोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता भूसंपादनाच्या कामालाही सुरुवात झाली आहे या नव्या औद्योगिक क्षेत्रामुळे परिसरातील रोजगाराच्या संधी वाढण्यास मदत होणार असून औद्योगिक गुंतवणुकीलाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे. द्रुतगती मार्गालगत असलेल्या कोरडवाहू जमिनींची निवड या प्रकल्पासाठी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही एमआयडीसी द्रुतगती मार्गाच्या दोन्ही बाजूंना विकसित केली जाणार आहे.

उद्योग विभागाने २००७ मध्ये बऊर एमआयडीसीसाठी क्षेत्र अधिसूचित केले होते. त्यानंतर २०१७ मध्ये या परिसरातील जमिनींच्या खरेदी-विक्रीवर निर्बंध घालण्यात आले होते. आता प्रकल्पाच्या अंमलबजावणीला वेग देण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. एमआयडीसी प्रशासनाकडून भूसंपादनाचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवले जात आहेत.

प्रस्तावित औद्योगिक क्षेत्रामध्ये बऊर आणि करंज येथील सुमारे ५०० एकर, तर ब्राह्मणवाडी येथील सुमारे ६०० एकर जमिनीचा समावेश आहे. प्राथमिक स्तरावर जमिनीची किंमत प्रतिएकर सुमारे ८४लाख रुपये निश्चित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकल्पासंदर्भात संबंधित विभागांच्या संयुक्त बैठका पार पडल्या असून भूसंपादनाची प्रक्रिया लवकरच अधिक वेगाने राबवली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. नव्या एमआयडीसीमुळे मावळ तालुक्यात औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >