Wednesday, June 3, 2026

Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवला डच्चू देणार, T20 क्रिकेटसाठी नवा कर्णधार शोधणार ?

Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवला डच्चू देणार, T20 क्रिकेटसाठी नवा कर्णधार शोधणार ?
मुंबई : बीसीसीआयची निवड समिती आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमधून सूर्यकुमार यादवला कायमचा डच्चू देण्याचा विचार करत आहे. फक्त कर्णधार पदासाठी नाही तर संघात खेळाडू म्हणूनही सूर्यकुमार यादवचा विचार करू नये असा एक मतप्रवाह निवड समितीमध्ये आहे. अंतिम निर्णय लवकरच जाहीर केला जाणार असल्याचे सूत्रांकडून समजते.
आयपीएलचा अंतिम सामना ३१ मे २०२६ रोजी झाला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सलग दुसऱ्यांदा आयपीएल जिंकली. आता एकदम २६ जून रोजी भारतीय खेळाडू टी ट्वेंटी क्रिकेट खेळताना दिसणार आहेत. दोन टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना २६ जूनला आणि दुसरा २८ जूनला होणार आहे. बेलफास्ट येथे भारत विरुद्ध आयर्लंड असे दोन सामने होणार आहेत. या सामन्यांसाठी अद्याप भारतीय संघाची निवड झालेली नाही. पण आधीच सूर्यकुमार यादव संदर्भात धक्कादायक वृत्त सूत्रांकडून समजले आहे.
मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या सूर्यकुमार यादवने आयपीएल २०२६ मध्ये १३ सामन्यांमध्ये २०.७७ च्या सरासरीने आणि १४७.५४ च्या स्ट्राइक रेटने २७० धावा केल्या. त्याच्या फॉर्ममधील घसरणीची गंभीर दखल निवड समितीने घेतल्याचे समजते. मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनाने १६.३५ कोटी रुपये मोजून सूर्यकुमार यादवला संघात कायम ठेवले होते. पण २०२६ च्या हंगामात त्याची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही.
भारताने मार्च २०२६ मध्ये सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात तिसऱ्यांदा टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला. पण त्याची वैयक्तिक कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. आयपीएलमध्येही तो चमकदार कामगिरी करण्यात अपयशी ठरला. ऐन पस्तिशीत असलेल्या सूर्यकुमार यादवच्या कामगिरीत अनपेक्षित अशी घसरण झाली आहे. याच कारणामुळे बीसीसीआयची निवड समिती आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमधून सूर्यकुमार यादवला कायमचा डच्चू देण्याचा विचार करत आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >