टर्निंग पॉइंट – युवराज अवसरमल
लेखक व दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे प्रभू श्रीरामाची महती सांगणारा व विचार मांडणारा ‘मिशन अयोध्या’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आले आहेत. अयोध्यातील श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेला झालेल्या वर्षपूर्तीच्या वेळी या चित्रपटाचे महत्त्व अजून वाढलेले आहे. श्री पार्टनर, शुभमंगल सावधान, जजमेंट व भोजपुरी चित्रपट नचनिया हे त्यांनी दिग्दर्शित केलेले सिनेमे आहेत.
त्यांचे शालेय शिक्षण शारदाश्रम शाळेतून झाले. शाळेत असताना त्यांना सांस्कृतिक कार्यक्रमात काम करण्याची संधी मिळाली नाही. पुढे त्यांचे शिक्षण कीर्ती महाविद्यालयात झाले. तिथे त्यांनी कला शाखेत इतिहास विषयामध्ये पदवी घेतली. तिथे त्यांना एका मित्राने सांगितले की आपण नाटकात काम करू, त्यांना आवड होती; परंतु इच्छा नव्हती. पुढे तो मित्र नाटकातून गायब झाला व ते नाटकाशी जोडले गेले. त्यामुळे त्यांच्या जीवनाला एक वेगळी दिशा मिळाली. अजित भगत, निर्मल पाण्डे हे गुरू त्यांना लाभले. सुरुवातीला त्यांना ॲक्शन चित्रपट आवडायचे; परंतु नाटकात गेल्यापासून त्यांना आर्ट फिल्म्स आवडू लागले. कॉलेजमध्ये असताना त्यांनी काही एकांकिकेमधून अभिनय केला होता; परंतु त्यांना त्यांच्या अभिनयातील मर्यादा जाणवल्या. त्यांना सृजनशील काम आवडू लागले. त्यामुळे त्यांनी दिग्दर्शनाकडे आपला मोर्चा वळविला. इंडियन नॅशनल थिएटर मध्ये होणाऱ्या एकांकिकेचे दिग्दर्शन केले.
पुढे लेखक, निर्माता, अभिनेता, दिग्दर्शक देवेन वर्माकडे त्यांनी साडेतीन वर्षे सहाय्यकाचे काम केले. त्यांच्या सिनेमाविषयीच्या जाणिवा विकसित होत गेल्या. नंतर त्यांनी सौरभ शुक्लासोबत लेखन व दिग्दर्शनासाठी सहाय्यक म्हणून काम केले. नंतर निर्मल पाण्डे सोबत नाटकात काम केले. अशा प्रकारे त्यांना अनुभव मिळाला. नंतर स्वतंत्र दिग्दर्शक व निर्माता म्हणून त्यांनी काम केले. लेखक व. पु. काळे यांच्या पार्टनर कादंबरीवर त्यांनी दिग्दर्शित श्री पार्टनर चित्रपटाचे दिग्दर्शन केले. या चित्रपटामुळे ते दिग्दर्शक म्हणून स्थिरावले; परंतु चित्रपट चालला नाही. निर्माता म्हणून त्यांना खूप नुकसान सोसावे लागले. हा त्यांच्या जीवनातला टर्निंग पॉइंट ठरला. त्यानंतर त्यांचे दोन सिनेमे निर्मात्यांच्या व्यक्तिगत समस्येमुळे रखडले. त्यांच्याकडे काम नव्हते. त्यातच त्यांना ‘नचनिया’ हा भोजपुरी चित्रपट दिग्दर्शनासाठी मिळाला. त्या चित्रपटाचे भोजपुरी कलाकारांनी खूप कौतुक केले. एक वेगळ्या पद्धतीचा तो चित्रपट होता. त्यानंतर शुभमंगल सावधान हा चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला. नीला सत्यनारायण यांच्या पुस्तकावर जजमेंट चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला.
‘मिशन अयोध्या’ हा चित्रपट ते प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आले आहेत. त्याला विचाराची जोड दिलेली आहे. या चित्रपटाचे शूटिंग अयोध्या येथे करण्यात आले. मे महिन्यात तेथे शूटिंग करण्यात आले. अयोध्याला गेल्यावर त्यांच्या असे लक्षात आले की प्रभू श्रीराम यांची फक्त अयोध्या नसून गौतम बुद्ध, जैनांची देखील अयोध्या आहे. प्रभू श्रीराम हे कोणत्याही जाती धर्मापुरते सीमित नाही. ते प्रत्येक भारतीयाचे आहेत. मिशन अयोध्या हा चित्रपट नसून राष्ट्र मंदिराच्या संरक्षणाची व त्याच्या महत्त्वाची जाणीव जागविणारी प्रेरणादायी कलाकृती आहे. प्रभू श्रीरामाचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि त्याच्या रामराज्याची संकल्पना पुढे नेण्यासाठी प्रेरणादायी ठरणारा चित्रपट त्याच्या सशक्त कथेमुळे प्रेक्षकांचे मनोरंजन नक्कीच करेन असा विश्वास या चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे यांनी व्यक्त केला.
निर्माता कृष्णा शिंदे आणि योगिता कृष्णा शिंदे यांच्या आर. के. योगिनी फिल्म्स प्रोडक्शन प्रा. ली. निर्मित ‘मिशन अयोध्या’ या चित्रपटातील साहस दृश्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. हे साहस दृश्य जीवावर उदार होऊन चित्रपटात कारसेवक विचारे ही प्रमुख भूमिका साकारणारे कलावंत डॉ. अभय कमत यांच्यावर चित्रित झाले आहे. कोणताही डमी न वापरता त्यांनी हे दृश्य साकारले आहे. हा केवळ मनोरंजनात्मक चित्रपट नसून, रामभक्ताच्या हृदयातील प्रभू श्रीरामाशी जोडणारा आणि त्यांचे विचार नव्या पिढीपर्यंत नेणारा एक प्रेरणादायी प्रवास आहे. लेखक व दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे यांना त्यांच्या मिशन अयोध्या चित्रपटाच्या यशासाठी हार्दिक शुभेच्छा!