Saturday, April 25, 2026

अश्वत्थाम्याच्या वेदनेवर रंगभाषेची फुंकर...

अश्वत्थाम्याच्या वेदनेवर रंगभाषेची फुंकर...

राजरंग : राज चिंचणकर

महाभारत या महाकाव्यात जीवनाचे संपूर्ण सार सामावले आहे, असे म्हटले जाते. हजारो वर्षे उलटली तरी 'महाभारत' हा आजही अनेक जणांच्या अभ्यासाचा विषय आहे. साहजिकच, हे सर्व दृगोच्चर करणाऱ्या या महाकाव्यातल्या व्यक्तिरेखा त्यादृष्टीने अतिशय महत्त्वाच्या ठरतात. महाभारतातल्या अनेक व्यक्तिरेखांचे प्रतिबिंब कलियुगातही पडलेले दिसते. या व्यक्तिरेखा जगाला काही ना काही सांगू पाहात असतात.

महाभारतात अनेक व्यक्तिरेखा असल्या तरी या महाकाव्याचा अंतिम चरण मात्र अशा एका व्यक्तीच्या नावावर लिहिला गेला आहे; जी व्यक्ती आजही जीवित असल्याचे सांगण्यात येते. 'सप्तचिरंजीव' या संकल्पनेतली ही व्यक्ती म्हणजे 'अश्वत्थामा'...! त्याला चिरंजीवित्व लाभले असले, तरी ते शापित आहे. श्रीकृष्णाने त्याच्या कपाळावरचा मणी काढून घेतल्यानंतर हा अश्वत्थामा, भाळी झालेल्या जखमेवर उतारा म्हणून तेल मागत आजही पर्वतरांगांमध्ये फिरतो, अशी एक आख्यायिका आहे. आता तो तसा तिथे फिरत असो किंवा नसो; पण महाभारतातला हाच अश्वत्थामा आता मराठी रंगमंचावर मात्र भ्रमण करताना दिसणार आहे. कारण महाभारतातल्या या महत्त्वाच्या व्यक्तिरेखेवर 'मी अश्वत्थामा चिरंजीव' हे मराठी नाटक निर्माण होत आहे. नाटककार, कादंबरीकार, निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते असा विस्तृत संचार करणारे ज्येष्ठ रंगकर्मी अशोक समेळ हे नाटक घेऊन रंगभूमीवर येत आहेत. संपूर्ण भारतभर प्रचंड गाजलेल्या त्यांच्याच 'मी अश्वत्थामा चिरंजीव' या कादंबरीवर हे नाटक आधारित आहे.

अशोक समेळ यांनी केवळ या नाटकाचा ध्यासच घेतलेला नाही, तर त्यामागे त्यांचा प्रचंड अभ्यास आहे. सातपुडा पर्वतरांगांमधल्या 'अस्तंबा' पर्वतावर अश्वत्थाम्याचे अस्तित्त्व असल्याचे सांगण्यात येते. याचा सुगावा लागताच अशोक समेळ यांनी संशोधनासाठी थेट अस्तंबा पर्वत गाठला. या सगळ्या अभ्यासाच्या दरम्यान त्यांच्या अंतर्मनाने अश्वत्थाम्याला दृश्य स्वरूपात रंगमंचावर आणण्याची प्रेरणा दिली आणि त्यातून त्यांनी महाभारतातल्या अश्वत्थाम्याला थेट नाट्य माध्यमातून मंचित करण्याचे नक्की केले. 'मी अश्वत्थामा चिरंजीव' या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन अशोक समेळ यांनी केले आहे. नाटकाचे प्रोजेक्टर नेपथ्य विश्वास पिंपळे यांनी केले असून, प्रकाशयोजना शीतल तळपदे यांची आहे. नाटकाला संग्राम समेळ यांनी पार्श्वसंगीत दिले आहे. अशोक समेळ व धनश्री दामले या नाटकात भूमिका साकारत आहेत. 'ऋग्वेद' या नाट्यसंस्थेने या नाटकाची निर्मिती केली आहे. या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग ३० एप्रिल रोजी दुपारी ठाणे येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात होत आहे.

अश्वत्थाम्यासारख्या इतिहासातल्या व्यक्तिरेखेला रंगभाषेच्या परिघात आणणे आणि अश्वत्थाम्याची भूमिका साकारणे ही खचितच सोपी गोष्ट नाही. मात्र गेली अनेक दशके रंगभूमीवर कार्यरत असलेले अशोक समेळ हे मात्र ही भूमिका साकारताना प्रचंड उत्साही असल्याचे जाणवते. या नाटकाच्या निमित्ताने त्यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणतात, "माझ्या 'मी अश्वत्थामा चिरंजीव' या महाकादंबरीने अनेक विक्रम केले. तिच्या नऊ आवृत्या निघाल्या. याचे कारण म्हणजे महाभारतातल्या 'अश्वत्थामा' या व्यक्तिरेखेबद्दल वाचक व रसिकांमध्ये विलक्षण गूढ आहे, कुतूहल आहे. कारण आजही महाभारतातला हा काळपुरुष अनेकांना दिसतो; इतकेच नव्हे, तर अडचणीत त्यांना मदतही करतो; असे मानले जाते. हा महापराक्रमी, महापंडित, वेदशास्त्रसंपन्न ब्राह्मण, द्रोणपुत्र अश्वत्थामा असा का झाला; या विषयावर मी जवळजवळ गेली २५ वर्षे सखोल अभ्यास आणि संशोधन केले आहे. सन २०१५ मध्ये माझी कादंबरी आली आणि आता मी त्यावर नाटक लिहिले आहे. माझी कादंबरी प्रकाशित झाली असताना, आता त्यावर नाटक का; तर त्याचेही एक कारण आहे. माझ्या अनेक बंधूभगिनींना आणि चाहत्यांना काही कारणास्तव ही महाकादंबरी वाचणे शक्य होत नाही. त्यांना हा अश्वत्थामा रंगमंचावर पाहता यावा, ही यामागची प्रामाणिक इच्छा आहे. तसेच, अगदी संपूर्ण भारतातून माझ्या अनेक मित्रमैत्रिणींचाही हे नाटक करण्याबाबत आग्रह होता आणि म्हणून मी हे नाटक करायला घेतले आहे.

वास्तविक, श्रीकृष्णाने अश्वत्थाम्याला जो शाप दिला तो तीन हजार वर्षांचा होता; परंतु आता पाच हजार वर्षे झाली तरी त्याला मुक्ती का दिली जात नाही; हा आणि अशाप्रकारचा संघर्ष या नाटकात अश्वत्थामा करताना दिसेल. अश्वत्थाम्याचा प्रवास त्याच्या 'अस्तंबा' या पर्वतस्थानापासून हिमालय, द्वारका, कुरुक्षेत्र इत्यादी अनेक स्थानांवर आहे आणि त्याचे वेगळे सादरीकरण या नाटकात आहे. तो स्वतःच्या पापमुक्तीसाठी श्रीकृष्णाला शोधतोय; पण श्रीकृष्ण त्याला दर्शन देत नाही. मग अश्वत्थाम्याला श्रीकृष्ण भेटतो का; भगवान परशुराम आणि व्यास यांचा यात असलेला सहभाग; तसेच अश्वत्थाम्याचा गूढ प्रवास यावरचे आगळ्यावेगळ्या पद्धतीने सादर होणारे हे नाटक आहे.

Comments
Add Comment