Saturday, February 8, 2025
Homeसाप्ताहिककोलाजBattle Of Life : जीवनाची लढाई

Battle Of Life : जीवनाची लढाई

पल्लवी अष्टेकर

जगात प्रत्येकाचं आयुष्य सुखं-समृद्धीने युक्त असतेच असे नाही. कुणाला कौटुंबिक, कुणाला आर्थिक अशा निरनिराळ्या अडचणी येत असतात. जीवनाच्या लढाईकडे आपल्याला सकारात्मक दृष्टीने पाहता आले पाहिजे. ही गोष्टं सहजसाध्य नसली तरी, प्रयत्नाने आपल्याला नक्कीच साध्य करता येईल. अनेकदा असे आढळून येते की, कष्टकरी जमात, बांधकामावर काम करणारे मजूर, उपजीविकेसाठी लहान-सहान व्यवसाय करणारे लोक हे सुखासीन आयुष्य जगणाऱ्या लोकांपेक्षाही जास्त आनंदी दिसतात. सुखवस्तू घरातील मुलांना चांगल्या सोयी-सुविधा मिळतात, त्या गरीब परिस्थितीतील मुलांना मिळत नाहीत, त्यामुळे अशा परिस्थितील मुले अगदी पायाभूत सुविधांपासून वंचित राहू शकतात. कोल्हापुरातील, शिवाजी पार्कमध्ये राहणाऱ्या, उदबत्ती विकून उपजीविका करणाऱ्या विमला काकू अजूनही माझ्या स्मरणात आहेत. विमला काकूंना चार मुले होती. त्यांच्या पतीची नोकरी सर्वसाधारण होती. पतीच्या एकट्याच्या तुटपुंज पगारात कुटुंब चालविणे शक्य नव्हते. शिवाय विमला काकूंचा एक मुलगा अपंग होता. त्यांची बाकीची मुले शालेय शिक्षण घेत होती. विमलाकाकू स्वभावाने जिद्दी होत्या. आहे त्या परिस्थितीवर नाराज होण्यापेक्षा आपल्याला कुटुंबाकरिता काय करता येईल याकडे त्यांचे लक्ष होते. आपल्या एका जीवलग मैत्रिणीकडून त्यांनी विविध सुगंधी उदबत्त्या बनविण्याचे तंत्र शिकून घेतले.

आता आपल्या मुलांना मदतीला घेऊन त्या केवडा, मोगरा, जाई, जुई, चंदन अशा वेगवेगळ्या सुगंधाच्या उदबत्त्या बनवू लागल्या. घरातले कामकाज आवरून त्या भरदुपारी तर, कधी संध्याकाळी मोठ्या खादीच्या पिशव्यांमध्ये उदबत्त्यांचे पुडे ठेवून चालत, पायपीट करत ओळखीच्या घरांमध्ये उदबत्त्या विकायला जात. दोन पिशव्यांतील एवढे ओझे त्या उचलत. काबाडकष्टं केल्यावर कुठे त्यांना थोडे पैसे मिळत. आईचे असे सतत कष्टं मुलांनी पाहिले, त्यामुळे मुलेही स्वभावाने काटकसरी झाली. विमल काकूंचा मोठा मुलगा वटेश्वराच्या देवळापुढे बसून उदबत्त्या व कापूर विकण्याचे काम करीत असे. भरपूर कष्टं असूनही विमलाकाकू नेहमी हसत-मुख असत. विमलाकाकूंच्या मुली लग्नं होऊन सासरी गेल्या. त्यांचा मोठा मुलगा अजूनही उदबत्त्या विकतो व धाकटा कपड्यांच्या दुकानात नोकरी करतो. विमला काकू आता आपल्या कुटुंबासह समाधानी आयुष्य व्यतित करीत आहेत. वडिलांच्या बॅँकेतील नोकरीमुळे आम्ही सांगली येथे राहायला गेलो होतो, तेव्हाची गोष्ट. मी तेव्हा इयत्ता सहावीत होते. मला आजूबाजूला भरपूर मैत्रिणी मिळाल्या होत्या. शाळेतून घरी परतल्यावर आम्ही सर्वजणी तिथल्या मैदानात खेळायचो. यातील शुभांगी नावाच्या मैत्रिणीकडे मी अनेकवेळा जात असे. तेव्हा तिची वहिनी नुकतीच लग्नं होऊन आली होती. ती भिंतीवर लावण्यासाठी वाॅलपीस, टेबलक्लाॅथ, सामोसा आकाराच्या स्ट्राॅपासून बनविलेला पडदा अशा विविध गोष्टी बनवायची. घरकामालाही ती तत्पर होती. या वहिनीकडून मी सजावटीच्या अनेक गोष्टी शिकून घेतल्या. मला या गोष्टी शिकवायचा त्यांनी कधी कंटाळा केला नाही. मला अजूनही या गोष्टी पाहिल्या की शुभांगीच्या वहिनीची आठवण होते.

आमच्या घरी साधारण दोन-अडीच महिन्यांतून एकदा गुप्ते काकू येत. त्या कुरडया, सांडगे, साबुदाण्याच्या पापड्या, भरलेल्या सुक्या मिरच्या, मिरगुंड असे जिन्नस असायचे. त्यांची घरची परिस्थिती हालाखाची होती. माझी आई त्यांच्याकडून यातले काही ना काही सामान घेत असे. मधली बरेच वर्ष त्यांनी हा व्यवसाय केला. आता कुठे मुलगा नोकरीला लागल्यानंतर त्या जराशा स्थिरावल्या. आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी म्हणून झटणाऱ्या अशा अनेक महिला माझ्या परिचयातील आहेत. यात लोणची, पापड करून विकणाऱ्या स्त्रिया, इडली-डोसे करून विकणाऱ्या महिला, साड्यांना पिको-फाॅल लावून देणाऱ्या स्त्रिया आपण आपल्या आजूबाजूला पाहातो. जीवनाच्या लढाईशी समरस होऊन, त्यातून अनेक कुटुंबांचे संसार उभे करणाऱ्या साधनाताई आमटेंचा उल्लेख केल्याशिवाय मला राहवत नाही. बाबा आमटेंच्या प्रत्येक कार्यात हिंमतीने उभ्या असलेल्या साधनाताईंचे कर्तृत्व शब्दांत मांडणे खरोखरच कठीण आहे. आपल्या पिढीजात वैभवावर पाणी सोडून बाबा आमटेंनी अकल्पितपणे कुष्ठकार्याकडे घेतलेली झेप, त्यातून आनंदवनाची निर्मिती झाली. समाज, नातलग यांच्याकडून वाळीत पडलेल्या कुष्ठरोग्यांना औषधोपचार व सुश्रुषेद्वारे जगण्याची उमेद त्यांच्यात निर्माण करण्याचे काम या दांपत्याने केले. तसेच त्यांचे परावलंबत्व नष्टं करून त्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आपण सर्वसामान्य माणसे आपल्या जीवनाशी लढाई लढताना इतके थकून जातो, तर अनेक कुटुंबांचे पुनर्वसन करून, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम बाबा व साधनाताईंनी केले. त्यांच्यातील कार्यशक्ती, कलागुणांना प्रोत्साहन देणे हे काम जाणीवपूर्वक त्यांनी केले. या आव्हानांच्या गतिचक्राशी साधनाताईंनी कसे जुळवून घेतले असेल?

कुटुंबातील रीती-रिवाजांप्रमाणे साधनाताईंचे लग्नं झाले असते, तर त्यांना आरामशीर जीवन व्यतित करता आले असते. पण बाबांशी लग्नं केल्यामुळे त्यांना सुरळीत जीवन-प्रणालीचा त्याग करावा लागला. दारिद्र्याचे समूह-जीवन पत्करावे लागले. बाबा आमटेंकडे पत्नीला सर्व घरकामांमध्ये मदत करण्याचे सामर्थ्य होते. पाककर्म, धुणी-भांडी घासणे, झाडझूड यांसारखी कामे करण्यात कर्तव्याची भावना होती. साधनाताईंची जीवन-लढाई फक्त त्यांच्यापुरतीच मर्यादित नव्हती, तर त्यांनी संपूर्ण समाजालाच आपले कुटुंब मानले. साधनाताईंच्या मुलांना कधी आवडीचे खाणे मिळाले नाही, कधी बिस्किटांचा पुडा मिळाला नाही. त्यावेळी आनंदवनात स्वयंपाकी ही चाल नव्हती. कितीही पाहुणे आले तरी साधनाताईचं स्वयंपाक करणे, भांडी घासणे अशी कामे करायच्या. अतिशय हाल-अपेष्टा त्यांनी सोसल्या. या जोडप्याचे जीवन म्हणजे समाजापुढे आदर्श आहे. तरी, निराश, अस्वस्थ न होता आपण आपली जीवनाची लढाई आनंदी मनाने लढूया. प्रत्येक सुस्थितीतील एका कुटुंबाने किमान एका गरजू कुटुंबाच्या पाठिशी उभे राहण्याची गरज आहे. असा नवीन वर्षाचा संकल्प करूया.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -