Wednesday, March 19, 2025
Homeताज्या घडामोडीइस्त्रो २०२८ पर्यंत प्रक्षेपित करणार १० टनाचे उपग्रह

इस्त्रो २०२८ पर्यंत प्रक्षेपित करणार १० टनाचे उपग्रह

नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) जगाच्या बरोबरीने झेप घेण्याची तयारी करीत आहे. इस्त्रो २०२८ पर्यंत १० टन वजनाचे उपग्रह स्वतःच्या बळावर प्रक्षेपित करणार आहे. सध्ये इस्त्रोला ४ टनांहून अधिक वजनाचे उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी नासाची मदत घ्यावी लागते. परंतु, येत्या ३ वर्षात हे चित्र बदलणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली.

यासंदर्भात त्यांनी सांगितले की, येत्या ५ वर्षात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचे आमचे पहिले मॉड्यूल कक्षेत प्रक्षेपित केले जाईल. नासाच्या नंतर इस्रोचा जन्म होऊनही नासाने इस्रोच्या यशाची कबुली देण्यास सुरुवात केली आहे. इस्त्रोची क्षमता दिवसेंदिवस वाढत आहे. इस्रोने आतापर्यंत ४३२ हून अधिक उपग्रह प्रक्षेपित केले आहेत, त्यापैकी 397 गेल्या १० वर्षांत प्रक्षेपित केले आहेत. इस्रोने सन २०२५ साठी आपले लक्ष्यही निश्चित केले आहे. त्यानुसार २०२५ मध्ये, नाविक ०२, युएस सॅटेलाईट फॉर मोबाईल आणि बायोमिना हे प्रमुख उपग्रह इस्त्रो जानेवारील प्रक्षेपित करणार आहे. इस्रो, नासाच्या सहकार्याने, फेब्रुवारी-मार्चमध्ये मोबाईल फोनची सुविधा देण्यासाठी एक उपग्रह पाठवणार आहे. सध्या वापरले जात असलेले सेल्युलर नेटवर्क जगाच्या सुमारे १५ टक्के भाग आहे. त्यामुळे ऑफ-द-ग्रिड ठिकाणी प्रवास करताना, मोबाइल नेटवर्क उपलब्ध नसते. पण जेव्हा ते थेट उपग्रहाद्वारे जोडले जाईल तेव्हा या समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही.

अंतराळ क्षेत्रात झेप घेण्यासाठी भारताने जानेवारी महिन्यात ‘नाविक-०२’ प्रक्षेपित करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. ही भारताची स्वदेशी उपग्रह नेव्हिगेशन प्रणाली आहे. ही स्वदेशी नेव्हिगेशन प्रणाली भारताला अमेरिका, युरोप, रशिया आणि चीन यांच्या बरोबरीत आणेल. यासह, भारत आपल्या सध्याच्या प्रादेशिक नेव्हिगेशन उपग्रह प्रणालीच्या पुढे जाईल. तसेच जगाच्या नेव्हिगेशन क्षेत्रात वर्चस्व मिळवू शकेल. तसेच भारत २०२६ पर्यंत मानवी उपग्रह पाठवू शकणार आहे. या दिशेने पावले उचलत इस्रोने पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीत बायोमिना टीव्ही डी-२ पाठवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. हा एक मानवरहित उपग्रह असेल. जे अंतराळात जाईल आणि सुरक्षितपणे परत येईल. त्यात मानवी गुण असलेला रोबोट पाठवण्यात येणार आहे. तो सुरक्षित परत आल्यानंतर अभ्यास केला जाईल आणि पुढील प्रक्रियेत मानवी उपग्रह पाठवण्याची तयारी केली जाईल.

भारताच्या अंतराळ क्षेत्राचा जागतिक अवकाश अर्थव्यवस्थेत सध्या ८ ते ९ टक्के वाटा आहे. येत्या दहा वर्षांत ते तीनपट वाढण्याची अपेक्षा आहे. सध्याच्या भारतीय अंतराळ अर्थव्यवस्थेचे मूल्य अंदाजे ८.४ अब्ज डॉलर आहे. आगामी २०३३ पर्यंत भारताची अंतराळ अर्थव्यवस्था ४४ अब्ज डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता आहे. युरोपियन उपग्रह प्रक्षेपणातून देशाला २९२ दशलक्ष युरो मिळाले. अशाप्रकारे, लवकरच भारतीय अर्थव्यवस्थेत अवकाश क्षेत्राचे योगदान सर्वात महत्त्वाचे ठरणार असल्याचे जितेंद्र सिंह यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -