Monday, April 27, 2026

Fire News : ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यात भीषण अग्नितांडव

Fire News : ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यात भीषण अग्नितांडव

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यात ( Hapur district of Uttar Pradesh ) भीषण अग्नितांडवाची घटना घडली आहे. आतापर्यंत या अग्नितांडवात तब्बल ७० झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. या आगीचं स्वरूप इतकं भीषण होतं की, धुराचे लोट १० किलोमीटर अंतरावरूनही स्पष्टपणे दिसत होते. हापूर जिल्ह्यातील पिलखुवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोदीनगर रोडवरील एका कापड कारखान्याजवळ असलेल्या झोपडपट्टीत सकाळी ही आग लागली. आग लागल्यानंतर काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केलं.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ९ च्या सुमारास झोपड्यांमध्ये असलेलं प्लास्टिक, पॉलिथिन, लाकूड आणि भंगार यांसारख्या ज्वलनशील पदार्थांमुळे आग अधिकच भडकली आणि वेगात पसरली. या आगीच्या कचाट्यात जवळच असलेल्या 'गायत्री लॉजिस्टिक ट्रान्सपोर्ट', 'युनायटेड ट्रान्सपोर्ट' आणि एका जीन्स शिवण्याच्या कारखाना देखील आला. गोदामांमध्ये असलेला मोठ्या प्रमाणावरील कापडाचा साठा जळून खाक झाला आहे.

पैसे आणि महत्त्वाची कागदपत्रंही जळून खाक

आगीची घटना समजताच अग्निशमन विभागाच्या (Fire Department) गाड्यांचे पाचारण झाले. अनेक तास अथक परिश्रम केल्यानंतर अखेर अग्निशमन विभागाला आगीवर नियंत्रण मिळवता आलं. पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी झोपडपट्टीत राहणाऱ्या कुटुंबांना वेळेत सुरक्षित बाहेर काढल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र या आगीत झोपड्यांमधील घरगुती सामान, कपडे, पैसे आणि महत्त्वाची कागदपत्रं जळून खाक झाली आहेत, ज्यामुळे या कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचं मोठं संकट उभं राहिलं आहे.

प्राथमिक अंदाजानुसार या आगीत कोट्यवधी रुपयांचं मोठं नुकसान झाल्याची शक्यता आहे. या झोपडपट्टीत राहणारे अनेक लोक मूळचे पश्चिम बंगालचे असून ते मतदानासाठी आपल्या गावी गेले होते. त्यांच्या अनुपस्थितीत ही घटना घडल्याने त्यांची महत्त्वाची कागदपत्रंही जळाली आहेत. प्रशासनासमोर आता या बाधितांच्या पुनर्वसनाचे मोठं आव्हान आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने आर्थिक मदत आणि निवाऱ्याची सोय करण्याची मागणी केली आहे.

सर्कल ऑफिसर (CO) अनिता चौहान यांनी घटनास्थळी भेट देऊन मदतकार्याचा आढावा घेतला. त्यांनी सांगितलं की, आग लागण्याचं कारण स्पष्ट झालेलं नाही, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

Comments
Add Comment