नवी दिल्ली : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये दणदणीत विजयाची नोंद केली. जिथे धावांचा पाऊस पडत असताना आरसीबी च्या गोलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी करून दिल्ली कॅपिटल्सला ७५ धावांवर गुंडाळले. जोश हेझलवूड व भुवनेश्वर कुमार यांनी मिळून ७ विकेट्स घेऊन दिल्ली कॅपिटल्सला पॉवर प्लेमध्येच बॅकफूटवर फेकले. बंगळुरूने ६.३ षटकांत १ बाद ७७ धावा करून बाजी मारली.तब्बल १३.३ षटके आणि नऊ बळी राखून आरसीबीने दिल्लीचे पानिपत केले.
आरसीबीला त्यांच्या नावावरील ४९ ऑल आऊटचा नकोसा विक्रम, सोमवारी पुसण्याची संधी होती. पण, दिल्ली कॅपटल्सने अभिषेक पोरेलने ( ३०) तसे होऊ दिले नाही. मात्र, आरसीबीला विजयापासून दूर राखणे दिल्लीला जमले नाही. बंगळुरूने हा विजय मिळवून आयपीएल २०२६च्या गुणतालिकेत १२ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावरील पकड मजबूत केली. दिल्ली कॅपिटल्सचा हा ८ सामन्यातील चौथा पराभव ठरला. आयपीएलच्या इतिहासात दिल्लीची ही तिसऱ्यांदा निचांकी धावसंख्या ठरली आहे. यापूर्वी दिल्लीने २०१७च्या आयपीएलमध्ये दिल्ली मुंबईविरुद्ध ६६ धावांवर तर पंजाबविरुद्ध ६७ धावांवर ऑलआऊट झाली होती. दिल्लीच्या फलंदाजांनी आरसीबीच्या गोलंदाजांसमोर शरणागती पत्करली. ६ फलंदाज १३ धावांवर माघारी परतल्यानंतर आयपीएल इतिहासातील सर्वात निचांक ( ४९) धावसंख्येचा विक्रम मोडला जाईल असे वाटत होते. पण, आरसीबीने त्यांच्या नावावरील हा डाग मिटवण्याची संधी गमावली. दिल्ली कॅपिटल्सने १६.३ षटकांत ७५ धावांपर्यंत मजल मारली. जोश हेझलवडू ( ४-१२) आणि भुवनेश्वर कुमार ( ३-५) यांनी पॉवर प्लेमध्ये दिल्लीला ६ धक्के दिले. आयपीएल इतिहासातील पॉवर प्लेमधील सर्वात निचांक ( ६-१३) धावसंख्येचा विक्रम दिल्लीच्या नावावर नोंदवला गेला. यापूर्वी २००९ मध्ये केप टाऊन येथे राजस्थानने १४ धावांत २ फलंदाज ( वि. आरसीबी) गमावले होते.
डेव्हिड मिलर व अभिषेक पोरेल यांनी दिल्लीचा गडगडलेला डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु ही जोडी रसिख सलामने मोडली. मिलर १९ धावांवर बाद झाला आणि पोरेलसोबत त्याची ३५ धावांची भागीदारी तुटली. त्यानंतर कायले जेमिन्सन याने १२ धावांचे योगदान दिले. पोरेल दुसऱ्या बाजूला उभा होताच आणि त्याची विकेट हेझलवूडने घेऊन दिल्लीचा डाव गुंडाळला. पोरेलने ३३ चेंडूंत ३० धावांची खेळी करून संघाला ७५ धावांपर्यंत पोहोचवले.
आयीएलमधील दिल्लीची ही तिसरी निचांक धावसंख्या ठरली. २०१७ मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध ते दुसऱ्या डावात ६६ धावांवर ऑल आऊट झाले होते. त्यानंतर २०१७ मध्ये पंजाबविरुद्ध पहिल्या डावात ६७ धावांत ऑल आऊट झाले होते. जेकब बेथेल व विराट कोहली यांनी आक्रमक सुरुवात करताना ३ षटकांत ३३ धावा फलकावर चढवल्या. बेथेल २० धावांवर कायले जेमिन्सनच्या गोलंदाजीवर बाद झाला. फॉर्मात असलेल्या देवदत्त पडिक्कलने आक्रमक फटकेबाजी करून ७ षटकांच्या आत आरसीबीचा विजय निश्चित केला. पडिक्कलने १३ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ३४ धावा केल्या. तर विराट १५ चेंडूंत २३ धावांवर नाबाद राहिला.
पॉवर प्लेमधील निचांकी धावसंख्या (१ ते ६ षटके)
१३/६ - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध आरसीबी, दिल्ली, २०२६*
१४/२ - राजस्थान रॉयल्स विरुद्ध आरसीबी, केप टाउन, २००९
१४/३ - सनरायर्झस हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स, पुणे, २०२२
१५/२ - सीएसके विरुद्ध केकेआर, कोलकाता, २०११
१६/१ - सीएसके विरुद्ध दल्ली कॅपिटल्स, रायपूर, २०१५
१६/१ - सीएसकेविरुद्ध आरसीबी, चेन्नई, २०१९






