पुणे : नाश्ता आणि पोहे हे समीकरण जुळलेले आहे. दिवाळीनंतर घाऊक आणि किरकोळ बाजारात पोह्यांच्या दरात वाढ (Poha Price Hike) झाली असल्याने सामान्यांचा नाश्ता महाग (Inflation) झाला आहे. किरकोळ बाजारात पोह्यांच्या दरात किलोमागे पाच ते सात रुपयांनी वाढ झाल्याने नागरिकांना नाश्त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत.
पुणे, मुंबई ठाण्यासह राज्यातील प्रमुख शहरांत दररोज हजारो किलो पोह्यांची विक्री होते. पुणे शहरापुरता विचार केल्यास मार्केट यार्डातील भुसार बाजारात गुजरात, छत्तीसगड या दोन राज्यांतून दररोज ५० ते ६० टन पोह्यांची आवक होते. गेल्या काही दिवसांपासून बाजारात पोह्यांची आवक कमी झाल्याने क्विंटलमागे ५०० ते ७०० रुपयांनी वाढ झाली आहे, असे मार्केट यार्डातील पोहे व्यापारी दीपक बोरा यांनी सांगितले.
Egg Price Hike : थंडी वाढली, अंडी महागली! मागणी वाढल्याने भाव वधारले
छत्तीसगडमधील भाटापारा आणि गुजरातमधील नवसारी भागातून पोह्यांची आवक होते. या दोन राज्यांतून संपूर्ण देशभरात पोहे विक्रीस पाठविले जातात. साळीवर (धान) प्रक्रिया करून पोहे तयार केले जातात. भाटापारा आणि नवसारी भागात प्रक्रिया उद्योग (मिल) आहेत. दिवाळीनंतर साळीचा तुटवडा जाणवत असल्याने तेथील प्रक्रिया उद्योग बंद ठेवण्यात आले होते. आता ते सुरू झाले आहेत. गुजरात आणि छत्तीसगडमधील शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नसल्याने त्यांनी यंदा उत्पादन कमी घेतले. परिणामी साळींचा तुटवडा जाणवत आहे.
घाऊक बाजारात एक क्विंटल पोह्याचा दर
- आताचे दर – एक क्विंटल – ५००० ते ५२०० रुपये
- महिनाभरापूर्वीचे दर – ४३०० ते ४००० रुपये
- किरकोळ बाजारातील किलोचे दर – ५५ ते ६० रुपये