Wednesday, May 6, 2026

'Agricultural Mall' : राज्यातील टोल नाक्यांवर उभे राहणार 'कृषी मॉल', सार्वजनिक बांधकाम विभागाची योजना

'Agricultural Mall' : राज्यातील टोल नाक्यांवर उभे राहणार 'कृषी मॉल', सार्वजनिक बांधकाम विभागाची योजना

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या शेतमालाला थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत अभिनव आणि महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व प्रमुख रस्ते आणि महामार्गांवरील टोल नाक्यांच्या परिसरात सुसज्ज 'कृषी मॉल' (Agricultural Mall) उभारण्यात येणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने (Department of Public Works) या मॉल्सच्या उभारणीसाठी हालचाली सुरू केल्या असून, लवकरच ही सुविधा राज्यभरात कार्यान्वित होणार आहे.

अनेकदा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आपला शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समिती (Agricultural Produce Market Committee) किंवा शहरांमधील बाजारपेठेत नेण्यासाठी मोठा वाहतूक खर्च करावा लागतो. तसेच प्रवासात बराच वेळ आणि श्रमही वाया जातात. अशावेळी टोल नाक्यांवरच थेट विक्रीची सोय उपलब्ध झाल्यामुळे, शेतकऱ्यांना शेताच्या जवळच हक्काची बाजारपेठ मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च कमी होऊन थेट नफ्यात वाढ होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

ग्राहकांसाठी 'स्वस्त आणि मस्त' खरेदी

- महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेकदा दर्जेदार आणि ताजी फळे किंवा भाजीपाला मिळणे कठीण जाते. मात्र, या कृषी मॉल्समुळे प्रवाशांना अगदी ताजी भाजी आणि फळे उपलब्ध होणार आहेत.

- विशेष म्हणजे, यामध्ये मध्यस्थांचा कोणताही हस्तक्षेप नसल्यामुळे बाजारपेठेच्या तुलनेत येथे शेतमाल स्वस्त दरात मिळण्याची शक्यता आहे. यामुळे प्रवाशांच्या खिशालाही दिलासा मिळणार आहे.

- शहरांमध्ये राबवण्यात आलेला 'शेतकरी ते ग्राहक' हा आठवडी बाजाराचा प्रयोग यापूर्वीच राज्यात अत्यंत यशस्वी ठरला आहे. याच धर्तीवर महामार्गांवरील ही नवीन बाजारपेठ शेतकऱ्यांसाठी क्रांतीकारी पाऊल ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >