राज्यपाल, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज शुक्रवारी (ता. ०६ डिसेंबर) ६८ वा महापरिनिर्वाण दिन आहे. आजच्या दिवशी आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भीमअनुयायी दादर, चैत्यभूमी येथे पोहोचले आहेत. अशातच राज्याचे नवेनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा चैत्यभूमी येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी पोहोचले. यावेळी राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन सुद्धा उपस्थित होते. नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यानंतर हा पहिलाच शासकीय कार्यक्रम आज चैत्यभूमी येथे पार पडला.
सकाळी ०८ वाजता राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दादर, चैत्यभूमी येथे पोहोचले. यावेळी त्यांनी तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला. यानंतर चैत्यभूमी येथील विहारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन केले. यानंतर विहाराच्या बाहेर पोलिसांच्यावतीने आंबेडकरांना मानवंदना देण्यात आली. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर हा पहिलाच मोठा शासकीय कार्यक्रम २४ तासांच्या आत पार पडला. त्यामुळे आजच्या या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागून होते. यानंतर चैत्यभूमीच्या आवारात असलेल्या दीपस्तंभाजवळ उभारण्यात आलेल्या व्यापीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी भाषण करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना उजाळा दिला.