Monday, August 10, 2026

BMC News : एच पूर्व विभागात पदपथ अतिक्रमण मुक्त मोहीम जोरात; नेहरू रोडवरील अतिक्रमणांवर संयुक्त कारवाई

BMC News : एच पूर्व विभागात पदपथ अतिक्रमण मुक्त मोहीम जोरात; नेहरू रोडवरील अतिक्रमणांवर संयुक्त कारवाई

- अनधिकृत बांधकामांसह फेरीवाल्यांचे साहित्य जागच्या जागीच केले जाते नष्ट

मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : सांताक्रूझ पूर्व भागातील पश्चिम द्रुतगती महामार्गालगतच्या सेवा रस्त्यावर तसेच आग्रीपाडा परिसरातील अनधिकृत अतिक्रमणांविरोधात मुंबई महापालिकेच्या एच- पूर्व विभागाच्या वतीने ८ ऑगस्ट रोजी संयुक्त कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या अतिक्रमण विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या पथकाने केलेल्या या कारवाईत अनधिकृत झोपड्या व बांधकामे हटविण्यात आली. तसेच फेरीवाल्यांचे साहित्य जप्त करून त्यातील लाकडी बाकडे, फळ्या या जेसीबीच्या माध्यमातून चक्काचूर करण्यात करण्यात आला. (BMC News)

महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांच्या आदेशानुसार उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली ही संयुक्त कारवाई मुंबई महापालिकेच्या एच- पूर्व विभागाच्या सहायक आयुक्त मृदुला अंडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईत अतिक्रमण विभाग, परवाना विभाग यांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

चक्की खान जंक्शन ते आग्रीपाडा परिसरादरम्यान पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या सेवा रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान ५ अनधिकृत झोपड्या व संरचना जमीनदोस्त करण्यात आल्या, तर ७ फेरीवाल्यांचे साहित्य अतिक्रमण विभागाने जप्त केले. तसेच रस्त्यालगत पडलेले लाकडी व इतर अनधिकृत साहित्यही हटविण्यात आले. आग्रीपाडा परिसरात १० ठिकाणच्या लाकडी सामान जेसीबीच्या सहाय्याने घटनास्थळीच तोडण्यात आल्या. या कारवाईमुळे सेवा रस्त्यावरील अनधिकृत अडथळे दूर होऊन वाहतुकीसाठी रस्ता मोकळा करण्यात आला आहे. मात्र, अतिक्रमण हटवल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी अतिक्रमण होऊ नये, यासाठी सातत्याने पाहणी करण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. (BMC News)

दरम्यान, याच रस्त्यावर अनधिकृत पार्किंगमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये यासाठी वाहतूक पोलिस विभागाने पार्किंगवर नियंत्रण ठेवावे, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत. अतिक्रमण आणि अनधिकृत पार्किंग या दोन्ही समस्यांवर समन्वयाने कारवाई झाल्यास सेवा रस्ता अधिक सुरक्षित व वाहतुकीसाठी सुरळीत होण्यास मदत होणार आहे आणि त्यादृष्टिकोनातून ही कारवाई सुरू असल्याचे एच पूर्व विभागाच्या सहायक आयुक्त मृदुला अंडे यांनी स्पष्ट केले. (BMC News)

बेकायदा बॅनर, हॉटेल्सवर महापालिकेची धडक कारवाई :

महापालिका एच पूर्व विभागाच्या सहायक आयुक्त मृदुला अंडे यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम द्रुतगती महामार्ग परिसरातील तसेच राम मंदिर रोड, खेरवाडी येथील मेंटेनन्स चौकी परिसरातील बेकायदा बॅनर हटविण्यात आले. याच परिसरात मेंटेनन्स विभागाच्या सहकार्याने संयुक्त कारवाई करण्यात आली. गोळीबार रोड परिसरात अग्निशमन विभागाच्या अधिकारी आणि आरोग्य विभागाच्या पथकाने संयुक्तपणे दोन हॉटेल्सविरोधात कारवाई केली. तसेच डावरी नगर परिसरातही अग्निशमन अधिकारी व आरोग्य विभागाच्या संयुक्त पथकाने एका हॉटेलवर कारवाई केली. संबंधित आस्थापनांकडून सुरक्षा, आरोग्य व इतर आवश्यक नियमांचे पालन होत आहे की नाही, याची तपासणी करण्यात आली.दरम्यान, ७ ऑगस्ट रोजी सांताक्रूझ रेल्वे स्थानक परिसरात पोलिस ड्युटीसाठीही महापालिका पथक तैनात करण्यात आले होते. (BMC News)

यापूर्वी ६ ऑगस्ट रोजी राम मंदिर रोड परिसरात चार ठिकाणी कारवाई करण्यात आली. वांद्रे पूर्व येथील अल सना बिल्डिंग कंपाऊंड परिसरात दोन ठिकाणी कारवाई करण्यात आली. तसेच पश्चिम द्रुतगती महामार्गावर बेकायदा बॅनर हटविण्यात आला. एअरपोर्ट कॉलनी परिसरात वैद्यकीय अधिकारी यांच्या सहकार्याने एका ठिकाणी संयुक्त कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या विविध विभागांकडून बेकायदा जाहिराती, अतिक्रमणे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरोधातील कारवाई सातत्याने सुरू असून, सार्वजनिक ठिकाणी नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. (BMC News)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >