Monday, August 10, 2026

Mumbai Cyber Security : मुंबईची सायबर सुरक्षितता राष्ट्रीय आर्थिक सुरक्षेची प्राथमिकता; भारत-इस्रायल सहकार्य वाढवण्याचे आवाहन

Mumbai Cyber Security : मुंबईची सायबर सुरक्षितता राष्ट्रीय आर्थिक सुरक्षेची प्राथमिकता; भारत-इस्रायल सहकार्य वाढवण्याचे आवाहन
मुंबई: मुंबईची सायबर सुरक्षितता ही केवळ माहिती तंत्रज्ञानापुरती मर्यादित बाब नसून देशाच्या आर्थिक सुरक्षेची महत्त्वपूर्ण प्राथमिकता बनली आहे. सुरक्षित मुंबई म्हणजे सुरक्षित भारत आणि सुरक्षित भारतीय अर्थव्यवस्था. त्यामुळे सायबर सुरक्षेसाठी धोरणकर्ते, तंत्रज्ञ, अभियंते, उद्योग क्षेत्र आणि तज्ज्ञांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले. (Mumbai Cyber Security)
मुंबईतील बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजच्या आंतरराष्ट्रीय अधिवेशन सभागृहात भारत-इस्रायल सायबर सुरक्षा क्षेत्रातील तज्ज्ञ आणि नवोन्मेषकांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भारत आणि इस्रायलमध्ये सामायिक लोकशाही मूल्ये, बौद्धिक वारसा आणि नवोन्मेषाची परंपरा असून, या समान मूल्यांच्या आधारे सायबर सुरक्षा क्षेत्रात दोन्ही देशांमधील सहकार्य अधिक मजबूत करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. (India Israel Cyber Security)

मुंबईच्या आर्थिक सुरक्षेसाठी सायबर सुरक्षा महत्त्वाची

मुंबई हे देशातील भांडवली बाजार, वित्तीय सेवा आणि उद्योग क्षेत्राचे प्रमुख केंद्र आहे. रिझर्व्ह बँक, सेबी, राष्ट्रीय शेअर बाजार आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज यांसारख्या महत्त्वाच्या वित्तीय संस्थांची मुख्यालये मुंबईत आहेत. त्यामुळे मुंबईच्या डिजिटल पायाभूत सुविधांवर होणाऱ्या सायबर हल्ल्याचा परिणाम केवळ एका संस्थेपुरता मर्यादित न राहता देशाच्या व्यापक आर्थिक व्यवस्थेवर होऊ शकतो. भौतिक पायाभूत सुविधांप्रमाणेच डिजिटल पायाभूत सुविधांचे संरक्षणही महत्त्वाचे आहे. त्यामुळे मुंबईची सायबर लवचिकता ही राष्ट्रीय आर्थिक सुरक्षेचा अविभाज्य भाग बनली आहे, असे ॲड. शेलार यांनी स्पष्ट केले.

AI आणि क्वांटम तंत्रज्ञानाचा सुरक्षित वापर गरजेचा

कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम संगणन आणि मोठ्या प्रमाणावरील माहितीचे विश्लेषण यांसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे ही काळाची गरज आहे. मात्र, डिजिटल परिवर्तनासोबत सायबर सुरक्षेलाही प्राधान्य देणे आवश्यक आहे. तंत्रज्ञान विकसित करतानाच सुरक्षेचा विचार सुरुवातीपासूनच केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. भारताकडे मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळ आणि प्रतिभावान संगणक अभियंते आहेत. हे अभियंते आणि सायबर सुरक्षा तज्ज्ञ डिजिटल यंत्रणांचे संरक्षण करण्याचे महत्त्वपूर्ण काम करत आहेत. महाराष्ट्रातील तरुणांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात संधी देतानाच त्यांच्या कौशल्याचा उपयोग सुरक्षित डिजिटल अर्थव्यवस्था उभारण्यासाठी केला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

भारत-इस्रायल सहकार्याला चालना

सायबर सुरक्षा क्षेत्रात भारत आणि इस्रायलमधील सहकार्य अधिक व्यापक करण्याची गरज असल्याचे ॲड. शेलार यांनी सांगितले. इस्रायलमधील तंत्रज्ञान कंपन्या, भारतीय उद्योग, संशोधन संस्था आणि तज्ज्ञ यांच्यात ज्ञानाची देवाणघेवाण, संयुक्त संशोधन, तंत्रज्ञान विकास आणि नवोन्मेषासाठी अधिक संधी निर्माण करण्यावर भर देण्याची आवश्यकता आहे. शासन, उद्योग, तंत्रज्ञान क्षेत्र, संशोधन संस्था आणि युवा तंत्रज्ञ यांनी एकत्रितपणे काम केल्यास सक्षम आणि लवचिक सायबर परिसंस्था उभारता येईल. भारत आणि इस्रायलने तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि सायबर सुरक्षेतील सहकार्य वाढवून नागरिकांच्या डिजिटल हक्कांसह देशाच्या आर्थिक सुरक्षेलाही बळ द्यावे, असे आवाहन मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा