मुंबई : गणराज स्टुडिओजने आणि एस वाय ७७ पोस्ट लैब आपल्या आगामी मराठी चित्रपट ‘जंतर मंतर छूमंतर’चा टाइटल मोशन पोस्टर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. सिनेमाच्या शीर्षकासह, चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर करण्यात आली. ‘जंतर मंतर छूमंतर’ हा चित्रपट १० जानेवारी २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
टायटल मोशन पोस्टरमध्ये चित्रपटाच्या अनोख्या थीमची झलक पाहायला मिळत आहे, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटात मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांचा सहभाग असून, अभिज्ञा भावे, प्रियदर्शन जाधव, किरण गायकवाड, निखिल चव्हाण, महेश जाधव आणि भाग्यश्री मोटे या कलाकारांच्या दमदार अभिनयाची झलक या चित्रपटात पाहायला मिळेल. हा एक हॅारर कॅामेडी असून यात मोठ्या प्रमाणात विएफएक्सची जादू अनुभवायला मिळणार आहे. पहिल्यांदाच मराठी चित्रपटांमध्ये अशा पद्धतीच्या AI आणि विएफएक्सचा वापर होत आहे.
दिग्दर्शक श्रेयश जाधव म्हणतात, “’जंतर मंतर छूमंतर’ हा एक वेगळ्या धाटणीचा चित्रपट आहे. हा चित्रपट केवळ मनोरंजनासाठी नसून प्रेक्षकांना नवीन अनुभव देण्याचे काम करेल. आम्ही या चित्रपटाचा पहिला लूक प्रेक्षकांसमोर आणत आहोत, याचा आम्हाला खूप आनंद आहे.”
गणराज स्टुडिओजचे मालक श्रेयश जाधव यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेल्या या चित्रपटाची कथा नितीन चव्हाण यांनी लिहिली आहे. छायाचित्रणाची धुरा प्रदीप खानविलकर यांनी सांभाळली आहे. तर, अभिनय जगताप यांनी या चित्रपटाला संगीत आणि पार्श्वसंगीत दिले आहे आणि चित्रपटाच्या निर्माती वैष्णवी जाधव आहेत ज्यांनी या आधी बघतोस काय मुजरा करची निर्मिती केली होती.