रतन टाटा यांचे निधन ही काळजाला चटका लावून जाणारी बाब. त्यांनी ‘टेल्को’ या कंपनीत किरकोळ कामे करत आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. जे. आर. डी. टाटा यांनी टाटा उद्योगसमूहाचे प्रमुखपद स्वीकारण्यास योग्य ठरणाऱ्या त्यांच्यामधील गुणांची पारख केली. रतन टाटा यांनी ती सार्थ ठरवत पुढील तीस वर्षे समूहाचा नावलौकिक वाढता ठेवला. आता हे नाव काळाच्या पडद्याआड गेले आहे. अशा या भारतीय रत्नास भावपूर्ण श्रद्धांजली.
डॉ. उदय निरगुडकर – ज्येष्ठ अभ्यासक
रतन टाटा यांच्या निधनाने भारताने उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या प्रक्रियेनंतरचा एक आश्वासक चेहरा गमावला आहेच, खेरीज केवळ औद्योगिकच नव्हे तर भारताच्या शालीन सभ्यतेच्या, सर्जनशीलतेच्या परंपरेतील एक मोठा उद्योजकही गमावला. थोडक्यात, भारताने खऱ्या अर्थाने ‘भारत रत्न’असणारा माणूस गमावला आहे. रतन टाटा यांचा जन्म ‘टाटा’ या एका जादूई आडनावाच्या घराण्यात झाला असला तरी त्यांचे बालपण काहीसे वादळीच म्हणावे लागेल. दहा वर्षांपर्यंत त्यांचे आयुष्य सुरळीत गेले असले तरी पुढे आई-वडिलांचा घटस्फोट झाला आणि आयुष्याची दिशाच बदलली. आईने दुसरे लग्न केल्यानंतर आजी आणि वडिलांनी त्यांना वाढवले. लहानाचे मोठे केले. मात्र सर्वसामान्य कुटुंबात असतात तसेच त्यांच्यात आणि वडिलांमध्ये काही बाबतीत मतभेद होते. रतनजींना व्हायोलिन शिकायचे होते पण वडिलांना त्यांना पियानो शिकण्यास भाग पाडले. त्यांना अमेरिकेला जाऊन आर्किटेक्ट व्हायचे होते पण वडील इंग्लंडमध्ये मेकॅनिकल इंजिनीअरिग करण्यासाठी भाग पाडत होते. अशा एक ना अनेक मुद्द्यांवर त्यांना संघर्ष करावा लागला. इतकेच नव्हे, तर आई-वडील वेगळे झाल्यानंतर वर्गातील मुले आईवर बोलून त्यांच्या बालमनावर आघात करत होती, टोमणे मारत होती. पण या सगळ्याला अतिशय धीराने आणि विलक्षण संयमाने सामोरे कसे जायचे हे रतनजींना आजीने शिकवले आणि तोच त्यांचा आयुष्यभराचा बाणा ठरला. अपमान झाला तरी गिळून टाकायचा आणि कृत्याने, कर्तृत्वाने उत्तर द्यायचे हे ब्रिद त्यांनी अखेरपर्यंत जपले.
टाटा मोटर्स ही समूहातील कंपनी अतिशय तोट्यात आली असताना फोर्ड कंपनीला विकण्याच्या हेतूने टाटा यांनी बिल फोर्ड यांची भेट घेतली. त्यावेळी बिल फोर्ड यांनी तोट्यातील कंपनी विकत घेण्याचा करार करून आम्ही एक प्रकारे तुमच्यावर उपकार करत आहोत, अशा प्रकारची भाषा वापरली आणि एक प्रकारे त्यांचा अपमान केला. अर्थात पुढे तो करार पूर्णत्वास गेला नाही, ही गोष्ट वेगळी. पण रतन टाटा यांनी तो अपमान अतिशय शांतपणे गिळला. पुढे दहा वर्षांनंतर चित्र पालटले. आता फोर्ड यांची कंपनी डबघाईला आली तर इकडे ‘टाटा मोटर्स’ने नवनवे उच्चांक गाठले. पुढे ‘जॅग्वार’आणि ‘लँड रोव्हर’ हे फोर्ड यांचे दोन ब्रँड विकायला काढण्याची वेळ आली आणि ती खरेदी करण्यासंदर्भातील बोलणी करण्यासाठी फोर्ड यांना टाटांच्या मुंबईतील ‘बाॅम्बे हाऊस’ या मुख्य कार्यालयात यावे लागले. रतन टाटांनी त्यांची भेट घेतली आणि अत्यंत शांतपणे हे दोन्ही ब्रँड्स विकत घेतले. व्यवहार पूर्ण झाला. त्यावेळी बिल फोर्ड म्हणाले, ‘ही कंपनी विकत घेऊन तुम्ही माझ्यावर फार मोठे उपकार केले आहेत.’ त्यावेळी टाटांच्या चेहऱ्यावर उमटलेले भाव वा त्यांनी उच्चारलेली वाक्ये कोणती होती, हे काही ठाऊक नाही पण त्यांनी ही बाब किती संयमाने आणि शालीनतेने घेतली असेल हे आपण नक्कीच समजू शकतो. याचा विचार करताना त्यांचा शांत आणि निगर्वी चेहरा डोळ्यांसमोर येतो. रतनजी टाटा इतकेच महान होते. व्यक्तिमत्त्वातील अशी अनेक वैशिष्ट्ये त्यांचे मोठेपण समोर मांडून जातात. थोडक्यात, रतन टाटा काय किंवा सचिन तेंडुलकर काय, अशी माणसे नेहमीच आपल्या कर्तृत्वाने बोलत असतात.
१९९१मध्ये रतन टाटा उद्योगाच्या प्रमुखपदी नियुक्त झाले. त्याआधीची त्यांची ‘टाटा’मधील कारकीर्द फारशी चमकदार नव्हती. त्यांच्याकडे समूहातील ‘एम्प्रेस मील’चे काम सोपवण्यात आले होते. कारभार सुधारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्या काळी अवघी ५० लाखांची गुंतवणूक केली असती तरी फार मोठा फायदा झाला असता. पण टाटा उद्योग समूहाने तसा निर्णय न घेतल्याची खंत रतन टाटा यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत बोलून दाखवली. समूहाने हा निर्णय न घेतल्याचा परिणाम अखेर टाटा समूहाला टेक्स्टाईल उद्योगातून बाहेर पडण्यात झाला होता. त्याही आधी रतन टाटा यांनी ‘टेल्को’ या कंपनीत साधी साधी कामे करत आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. तिथेही त्यांना युनियन वा इतर गोष्टींमुळे त्रास सहन करावा लागला होता. काही बाबतीत अपयश आले होते. पण न डगमगता त्यांनी काम सुरू ठेवले. जे. आर. डी. टाटा यांचे कौशल्य म्हणजे त्यांनी रतन टाटा यांच्यामधील टाटा उद्योगसमूहाचे प्रमुखपद स्वीकारण्यास योग्य ठरणाऱ्या गुणांची पारख केली. रतनजी समूहाच्या प्रमुखपदासाठी आवश्यक असणाऱ्या मापदंडांमध्ये चपखल बसत असल्याचे हेरले आणि या पदासाठी निवड केली. रतन टाटा यांनी ती सार्थ ठरवत पुढची तीस वर्षे समूहाचा नावलौकिक वाढता ठेवला. २०११-१२ मध्ये अध्यक्षपदावरून पायउतार झाले तेव्हा या उद्योगसमूहाचा विस्तार जवळपास १०० बिलियन डॉलर एवढा प्रचंड होता. विशेष म्हणजे त्यातील ६० टक्के व्यवहार आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा होता. यामुळेच ही खऱ्या अर्थाने बहुराष्ट्रीय कंपनी बनली.
याव्यतिरिक्त टाटा यांनी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत अनेक सामाजिक उपक्रमांना मदत करत टाटा उद्योगसमूहाची सामाजिक भान राखण्याची परंपरा अखंड ठेवली. त्यांनी स्वभावातील शालीनता, ऋजुता, विनम्रता कधीही गमावली नाही. दुसऱ्यांकडून काही तरी शिकायचे असते, हा भाव त्यांनी कायमच बाळगला. प्राणीमात्रांवर प्रेम करण्याचा त्यांचा स्वभाव तर सर्वज्ञात आहे. कुत्र्यांवर त्यांचे विशेष प्रेम होते. यापलीकडे जाऊन अगदी अलीकडच्या काळात त्यांनी समाजातील ज्येष्ठांना मदत करण्यासाठी एका उपक्रमात पैसे गुंतवले. हेदेखील वयाच्या ८५ व्या वर्षी कार्यरत असणाऱ्या त्यांच्यातील सर्जनशीलतेचे उत्तम उदाहरण आहे. त्यांच्यानंतर टाटा उद्योगसमूहाच्या अध्यक्षपदी आलेल्या सायरस मिस्त्री या अध्यक्षांनी समूहाचे मापदंड डावलून काही करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा रतन टाटा यांनी अत्यंत कठोरपणे त्यांना बाजूला केले आणि कोणतीही किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण आपला समूह मूल्यांशी तडजोड स्वीकारणार नाही, हा विश्वास भारतीय जनतेला दिला. यामुळेच ‘टाटा’ ही केवळ दोन अक्षरे राहिली नाहीत, तर ते खऱ्या अर्थाने भारतातील एका विश्वासाचे, सर्जनशीलतेचे आणि हजारो वर्षांच्या सभ्यता आणि परंपरेचे द्योतक बनले. आता या द्योतकाचा मुकुटमणी निखळून पडल्याचे दु:ख फार मोठे आहे.
१९९१ मध्ये समूहाचा प्रमुख झाल्यानंतर ‘टाटा स्टील’चे रूसी मोदी किंवा नानी पालखीवाला, अजित केरकर, दरबारी सेठ यापैकी कोणीही त्यांना नेता मानायला तयार नव्हते. मात्र पुढच्या पाच वर्षांमध्ये वयाचा निकष लावून त्यांनी या सगळ्यांना दूर केले आणि त्यानंतर रतनजींचे कार्यकर्तृत्व खऱ्या अर्थाने झळाळले. एक प्रकारे हा तावून-सुलाखून निघालेल्या सोन्यासारखा, आयुष्यभर संघर्ष करत राहिलेला माणूस होता. आता हा नक्षीदार दागिना भारतमातेच्या मुकुटातून निखळून पडला आहे. यापुढे त्यांचे आयुष्य हीच आपल्यासाठी सर्वात मोठी प्रेरणा राहणार आहे. त्यांनी सांगितलेल्या मूल्यांचा अवलंब करत जगणे हीच त्यांना वाहिलेली
श्रद्धांजली असेल.