Wednesday, April 29, 2026

पुलांच्या बांधकामात तंत्रज्ञानाचा समन्वय

पुलांच्या बांधकामात तंत्रज्ञानाचा समन्वय

मुंबईचा एल्फिन्स्टन पूल हा केवळ लोखंड आणि दगडांचा ढाचा नव्हता, तर शहराच्या प्रगतीचा साक्षीदार होता. नव्या पुलामुळे मुंबईच्या वाहतुकीला नवी दिशा मिळेल; पण त्याच वेळी जुन्या पुलाचा इतिहास जपणे ही सामूहिक जबाबदारी आहे.

स्वातंत्र्योत्तर काळातील पुलांची बांधकामे फार तर तीस-चाळीस वर्षे टिकतात; परंतु रेल्वेचे पूल, अनेक ठिकाणचे नद्यांवरचे पूल शंभर-सव्वाशे वर्षे सेवा देत राहिले. अलीकडचे पूल उद्घाटनापूर्वीच पडतात, धोकादायक ठरतात, हे पाहता कामात प्रामाणिकपणा, बांधकामात नव्या-जुन्याची सांगड घातली असता पूल जादा काळ टिकतील आणि सरकारचा, पर्यायाने जनतेचाही पैसा वाचेल.

मुंबईसारख्या गतिमान शहरात विकास आणि इतिहास यांचा संघर्ष नेहमीच दिसून येतो. एल्फिन्स्टन रोड ओव्हरब्रीजचे (प्रभादेवी पूल) अलीकडील विसर्जन हा त्याचाच एक जिवंत पुरावा आहे. ब्रिटिशकालीन अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमुना असलेला हा पूल केवळ एक वाहतूक मार्ग नव्हता, तर मुंबईच्या औद्योगिक आणि नागरी विकासाचा साक्षीदार होता. १९१३ मध्ये बांधण्यात आलेला एल्फिन्स्टन पूल त्या काळातील प्रगत अभियांत्रिकीचा उत्तम नमुना होता. स्टीलचे मजबूत गर्डर्स, आर्च-आधारित रचना आणि अचूक मोजमाप यामुळे हा पूल अत्यंत भक्कम बनवण्यात आला होता. त्या काळात वाढत्या रेल्वे वाहतुकीमुळे लेव्हल क्रॉसिंग धोकादायक ठरत असल्यामुळे अशा ओव्हरब्रीजची गरज निर्माण झाली. विशेष म्हणजे या पुलाची उभारणी करताना दीर्घकालीन वापर आणि सुरक्षिततेचा विचार केला होता. यावरून ब्रिटिशकालीन नियोजनाची दूरदृष्टी स्पष्ट होते.

एल्फिन्स्टन उड्डाणपुलाने तब्बल शंभर वर्षांहून अधिक काळ मुंबईकरांची सेवा केली. परळ आणि प्रभादेवी या महत्त्वाच्या भागांना जोडणारा हा पूल गिरणगावातील कामगार, व्यापारी आणि प्रवासी यांच्यासाठी जीवनवाहिनी ठरला होता. इतक्या दीर्घ काळ टिकून राहणे हे त्याच्या दर्जेदार बांधकामाचे आणि नियमित देखभालीचे द्योतक आहे. या पुलाप्रमाणे नगर रेल्वे स्टेशनकडे जाणारा सीनेवरचा लोखंडी पूल, कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याजवळचा पूल यांनी शंभर वर्षांहून अधिक काळ सेवा दिली. रेल्वेचे पूल तर दीडशे वर्षे सेवा देत आहेत. आजकाल तर उद्घाटन होण्याअगोदरच पूल कोसळतात. पणजीनजीकचा मांडवी नदीवरचा पूल असो, की बिहारमधील पूल; कामाच्या गुणवत्तेचा आरसा त्यांनी दाखवला. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या तुलनेत जुनी साधने वापरूनही इतका टिकाऊ पूल उभारणे ही त्या काळातील अभियंत्यांची मोठी कामगिरी म्हणावी लागेल.

बदलत्या काळानुसार मुंबईतील वाहतुकीच्या गरजा झपाट्याने वाढल्या. वाढती लोकसंख्या, वाहनांची संख्या आणि उपनगरी रेल्वेवरील ताण यामुळे जुना पूल अपुरा ठरू लागला. याच पार्श्वभूमीवर नवीन दुमजली उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. नागपूरमध्ये तर तीन मजली पूल आहेत. स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये सुधारणा झाल्या असल्या, तरी तंत्रज्ञानात जुन्या-नव्याची सांगड घातल्यास टिकावूपणा वाढू शकतो. आता एल्फिन्स्टन पुलाच्या जागी तयार होणारा नवीन पूल वरळी-शिवडी उड्डाणपूल प्रकल्पाचा भाग आहे. तो अधिक क्षमतेचा आणि आधुनिक सुविधांनी युक्त असेल. यामुळे पूर्व-पश्चिम जोडणी अधिक सुलभ होईल आणि वाहतूक वेगवान होईल. जुना पूल हटवल्यामुळे कुर्ला ते परळ दरम्यान दोन अतिरिक्त उपनगरी रेल्वे मार्गांसाठी जागा उपलब्ध झाली आहे. यामुळे रेल्वेची क्षमता वाढेल, गर्दी कमी होईल आणि प्रवाशांचा वेळ वाचेल. तसेच नवीन उड्डाणपुलामुळे रस्ते वाहतुकीवरील ताणही कमी होईल. वाहतूक कोंडी कमी होऊन शहरातील हालचाल अधिक सुसूत्र आणि जलद होण्यास मदत होईल. एल्फिन्स्टन पूल पाडणे म्हणजे एका युगाचा अंत आहे; मात्र या प्रक्रियेत त्यावरील ऐतिहासिक शिलालेख जतन करून नव्या पुलात समाविष्ट करण्याचा निर्णय सकारात्मक आहे. विकासाच्या नावाखाली इतिहास पुसून टाकणे योग्य नाही; उलट तो जपून पुढे जाणे आवश्यक आहे. एल्फिन्स्टन रोड उड्डाणपुलाचे शेवटचे गर्डर पाडण्यात आले, तेव्हा एक युग इतिहासजमा झाले. तब्बल ११३ वर्षे परळ आणि प्रभादेवी दरम्यान प्रवाशांच्या हालचाली सुलभ करणारा हा पूल इतिहासजमा झाला. हा बदल केवळ एक पायाभूत सुविधा बदल नाही, तर शहराच्या बदलत्या गरजांचे प्रतीक आहे. मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला या अत्यंत व्यस्त मार्गावर पाच ब्रिटिशकालीन पूल हटवण्याचे काम पूर्ण केले आहे. हे काम मुंबईच्या उपनगरी रेल्वे सेवांचा विस्तार आणि आधुनिकीकरण करण्यासाठी अत्यावश्यक मानले जात आहे. विशेष म्हणजे, एल्फिन्स्टन पूल हटवताना रेल्वे वाहतुकीत कमीत कमी अडथळा निर्माण होईल, याची पूर्ण काळजी घेण्यात आली. रात्रीच्या विशेष ब्लॉकमध्ये हे काम पूर्ण करून सकाळी सेवा सुरळीत सुरू करण्यात आली. पूल हटवल्यामुळे कुर्ला ते परळ दरम्यान दोन अतिरिक्त उपनगरी रेल्वे मार्गांसाठी जागा उपलब्ध झाली. ते पुढे सीएसएमटीपर्यंत वाढवले जाणार आहेत.

तांत्रिक दृष्टिकोनातून पाहता १९१३ मध्ये बांधलेला हा पूल त्या काळातील अभियांत्रिकी कौशल्याचे उत्कृष्ट उदाहरण होता. स्टील गर्डर, क्रॉस सपोर्ट आणि आर्च सिस्टीम यांचा वापर करून तयार करण्यात आलेली ही रचना आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या तुलनेत जुनी वाटली, तरी तिचे योगदान अमूल्य होते. या पुलाच्या पाडकामासाठी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्यात आले. जवळपास वीस वेळा रेल्वे ब्लॉक्स घेऊन डेक स्लॅब, पाइपलाइन, केबल्स आणि इतर संरचना हटवण्यात आल्या. अंतिम टप्प्यात ८०० टन क्षमतेच्या क्रेनच्या साहाय्याने मुख्य गर्डर्स काढण्यात आले. यासाठी विविध विभागांमधील अधिकाऱ्यांचे समन्वय आणि ९५ कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे ठरले.

हा संपूर्ण उपक्रम एक गोष्ट स्पष्ट करतो, की शहराचा विकास ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. जुन्या आणि कालबाह्य झालेल्या संरचना बदलणे आवश्यक असते. त्यामुळे सुरक्षितता आणि कार्यक्षमता वाढेल; मात्र या प्रक्रियेत इतिहास आणि वारसा जपणेही तितकेच महत्त्वाचे आहे. एल्फिन्स्टन पूल आज राहिला नाही; पण त्याने घडवलेला इतिहास कायम स्मरणात राहील. मुंबईसारख्या गतिमान शहरासाठी हा बदल अपरिहार्य आहे. विकासाच्या या नव्या टप्प्यात आधुनिक सुविधा आणि ऐतिहासिक जाण यांचा समतोल राखणे हीच खरी कसोटी आहे.

प्रा. सुखदेव बखळे

Comments
Add Comment